भूमिहीन मापारी यांची कोकणात कलिंगड शेती

Mapari-Family
Mapari-Family

मूळ कोकणातले म्हणजे वेरळ (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग)) येथील सुरेश मापारी यांनी सुमारे २० वर्षे मुंबईत ‘प्रेस’ चा व्यवसाय केला. काही कारणांमुळे तो अडचणीत आला. मग त्यांनी गावीच जाऊन काहीतरी करण्याचे ठरवले. वेरळ हे मालवणपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील गाव आहे. पारंपारिक पद्धतीने येथे भात, नाचणा, भुईमूग, कुळीथ, उडीद, आंबा काजू ही पिके घेतली जातात. मापारी यांना शेतीची आवड होती. त्यात काही करू शकू असा स्वतःला विश्‍वासही होता. पण घरची एक गुंठाही शेती नव्हती. काही शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. ज्यांनी जमीन पडीक आहे अशांनी त्यांना जमीन कसण्यास देण्याची तयारी दर्शवली.

दुसऱ्यांच्या क्षेत्रावर सुरू झाली शेती 
सुमारे पाच एकर जमीन कसायला मिळाल्यानंतर सुुरवातीला भातासह मिरचीचे उत्पादन घेण्यास सुरवात केली. मात्र मजुरांची अडचण येऊ लागली. शोधक वृत्तीतून त्यांना कलिंगडाचा पर्याय दिसून आला. शेतीचा अनुभव काहीच नाही. शिवाय तांत्रिक मार्गदर्शनाचाही अभाव होता. पण चिकाटी व कष्ट सुरूच ठेवले. एकरी पाच ते सात टनांपर्यंत उत्पादन मिळू लागले. किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्र वेरळ गावापासून जवळ आहे. येथील तज्ज्ञांच्या संपर्कात आल्यानंतर मापारी यांना सुधारित तंत्रज्ञानाद्वारे शेती करण्याचा मार्ग मिळाला.  

कलिंगड झाले मुख्य पीक 
पाच एकरांतील चार एकरांत कलिंगड हेच मुख्य पीक असते. उर्वरित क्षेत्रात चाऱ्यासाठी मका घेण्यात येतो. कलिंगडाची सर्व लागवड एकाचवेळी न करता एक ते दीड एकरांचे प्लॉट पाडून थोड्या थोड्या अंतराने केली जाते. त्यामुळे उन्हाळाभर कलिंगडे विक्रीस उपलब्ध करता येतात. दरांचाही फायदा अशावेळी घेता येतो. एका प्लॉटमधील किडींचा प्रादुर्भाव दुसऱ्या प्लॉटला होऊ नये यासाठी दोन प्लॉटमध्ये शेडनेटचा वापर केला आहे. प्रत्येक वर्षी आलेल्या अनुभवातून सुधारणा करीत उत्पादनात सातत्य टिकवले आहे.

बेसल डोसच्या वेळीच रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्यानंतर गोमूत्र, शेणखत, जीवामृत, मिरी पावडर, हळद पावडर आदी सेंद्रिय घटक पिकाला दिले जातात. ठिबक सिंचन तसेच पॉली मल्चिंगचा वापर वापर केला जातो. दरवर्षी एकरी १५ ते २० टन व कमाल २५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. 

अशी होते विक्रीे 
कणकवली- मालवण रस्त्यावर मसदे फाटयानजिक मापारी यांची छोटी शेडवजा जागा आहे. या रस्त्यावर प्रवासी, पर्यटकांची मोठी गर्दी असते. हीच संधी मापारी यांनी उचलली. येथे कलिंगडाची थेट ग्राहकांना किलोला २० रुपये दराने विक्री केली जाते. व्यापाऱ्यांना माल दिला जातो. त्याला सात ते दहा रुपयांपर्यंत दर मिळतो. फोडी स्वरूपात प्रति प्लेट दहा रुपये दरानेही ग्राहक कलिंगडांचा आनंद घेतात. वीस रुपयांत पोटभर कलिंगड खा, अशी ग्राहकांना प्रोत्साहित करणारी योजना राबवूनही मापारी यांनी आपल्या फळांची विक्री वाढवली आहे. विहिरीच्या पाण्याचा वापर, सेंद्रिय पदार्थांचा ऐंशी टक्क्‍याहून अधिक वापर या कारणांमुळे कलिंगडाला चांगली गोडी येते. त्यामुळे ग्राहक पुन्हा पुन्हा येथे कलिंगड खाण्यासाठी येतातच. शिवाय स्वतःसाठी व पाहुण्यांना देण्यासाठी अनेकजण खरेदी करूनही घेऊन जातात. दर्जा कायम चांगला राखल्याने व या परिसरात चांगली ओळख झाल्याने विक्रीचा बराचसा प्रश्‍न मार्गी लागल्याचे मापारी सांगतात. 

सर्व काही कलिंगडातून 
कलिंगड शेतीतूनच आर्थिक प्रगती झाल्याचे मापारी सांगतात. विहिरीवरून पाईपलाईन, ठिबक, मल्चिंग व कौटुंबिक असा सारा खर्च याच पिकातून पार पडत असल्याचे मापारी सांगतात. त्यांच्याकडे लहान-मोठी सुमारे २५ जनावरे देखील आहेत. त्यांच्या शेणखताचा वापर शेतीत होतो.

- सुरेश मापारी, ९४२११८९७६३

घरच्यांची साथ, तज्ज्ञांचा सल्ला
मापारी यांना शेतीत पत्नी सौ. सुविधा, मुलगा प्रसन्न यांची मोलाची साथ मिळते. विक्री हंगामात शेतातील कामे सकाळी लवकर आटोपून सकाळी नऊ वाजता मापारी कलिंगड विक्री स्टॉलवर येतात. संध्याकाळी सात वाजेंपर्यंत याच कामात ते व्यस्त असतात. दिवसाला सुमारे एक ते दोन हजार रुपयांची विक्री सहज होते. एकूण उत्पन्नात ५० टक्के नफा होतो. कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), किर्लोस येथील कार्यक्रम समन्वयक डॉ. मंदार गीते, उद्यान विद्या तज्ज्ञ सरीता बेळणेकर, कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक व्ही.सी. चौधरी आदींची शेतीच्या वाटचालीत मोठी मदत झाली आहे. कृषी विभागाच्या शेतीशाळा, केव्हीकेची प्रात्यक्षिके यांचे आयोजनही मापारी यांच्या शेतात झाले आहे. 

कोकणात कलिंगडाच्या शेतीत सातत्य ठेऊन 
त्यातील तज्ज्ञ शेतकरी म्हणून मापारी यांनी ओळख मिळवली आहे. भूमिहीन असतानाही दुसऱ्यांची पडीक शेती कसायला घेत ती यशस्वी केली. अशा रितीने शेतीवरील निष्ठा कायम ठेवली. कोकणासारख्या ठिकाणी शेतीतून चांगली रोजगार निर्मिती केली.  
- डॉ. विलास सावंत कृषी विस्तार तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com