जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा बरं.. !

Marathi news Agriculture news in Marathi Agrowon news Diwali 2017
Marathi news Agriculture news in Marathi Agrowon news Diwali 2017

जळगाव : जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा बरं.. तुमी आसाच चमकत ऱ्हावोत दिवाईना लायटींगसारका... तुमनं तोंड आसेच गोड रावाले जोयजे सांजोरीसारकं... मन्हासंग आसाच पक्का ऱ्हाजात लाडूसारका... खानदेशात दीपोत्सव आर्थिक तंगी, नैसर्गिक आपत्तीच्या सावटाखाली साजरा होत असला तरी प्रकाशपर्व आपल्या पुढातला अंधार दूर करील आणि आपले जीवन प्रकाशमान होईल, अशा नव्या उमेदीने अहिराणी बोलीत शेतकरी मंडळी दीपोत्सवानिमित्त आपले नातेवाईक, जवळच्या मंडळीला शुभेच्छा देत आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदाही बसला आहे. धान्याची मोठी रास नाही किंवा घरात धन नाही..., अशाच स्थितीत शेतकऱ्यांनी डाळी, धान्याची पूजा करून धनत्रयोदशीला देवाला आता रब्बी तरी हाती लागू दे, अशीच आळवणी जणू केली. 

फराळ आणि बच्चेकंपनीला थोडेबहुत फटाके, अशी दिवाळी शेतकरी साजरा करीत आहेत. मोठी खरेदी, झगमगाट, असे चित्र कुठेही दिसत नाही. अनेक जण तर सकाळीच कापूस वेचणी, जेमतेम हाती आलेल्या सोयाबीन मळणीच्या कामासाठी शेतात जात आहेत. खरीप जोमात असला तर शेतकऱ्यांचा पोळा, दसरा, दीपोत्सव असतो.. हंगामच जमतेम होता. त्यामुळे तो आनंद, उत्साह दिवाळीला ग्रामीण भागात कुठेही दिसत नाही. 

कपाशीतही हार 
यंदा पूर्वहंगामी कपाशीची बोंडे उमलण्यास सुरवात होताच सप्टेंबरच्या मध्यात पाऊस आला आणि कापूस काळवंडला. ३० ते ३५ टक्के नुकसान झाले. कापूस घरात साठवला तर दर्जा आणखी घसरेल या भीतीने व्यापाऱ्याला कवडीमोल देण्याशिवाय पर्याय नाही... होता तो कापूस विकला. कापसाचे तालुक्‍यागणिक वेगवेगळे दर आहेत. शासकीय कापूस खरेदी केंद्रांचा अजून पत्ताच नाही. 

केळी उत्पादकही नुकसानीत
दर्जेदार केळी पिकवायला एकरी दीड लाख रुपये खर्च लागला. असा खर्च करूनही दर एक हजार रुपये क्विंटलपर्यंत मिळाला. यामुळे जळगाव जिल्ह्यात केळी परवडत नसल्याने क्षेत्र तीन हजार हेक्‍टरने घटले. व्यापारी व बाजार समित्यांच्या मगरमिठीत केळी उत्पादक पुन्हा एकदा सापडला. केळी नाशवंत असल्याने व्यापाऱ्यांच्या साखळीसमोर नमते घेत केळी उत्पादक मिळेल त्या दरात केळी देत आहेत. 

कर्जमाफीने जेरीस आणले
जगाची भूक भागविणाऱ्या पोशिंद्याला कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शासकीय यंत्रणांनी लांबच लांब रागांमध्ये भुकेल्या पोटी राहण्याची वेळ आणली. तरीही धुळे जिल्ह्यात जवळपास १३ हजार, नंदुरबारात ९ हजार आणि जळगाव जिल्ह्यात १९ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. 

प्रतिक्रिया
जशी छोट्या, कोरडवाहू शेतकऱ्याची अवस्था आहे, तशीच अवस्था मोठ्या, बागायतदार शेतकऱ्याची आहे. नोटाबंदीपासूनची संकटांची मालिका अजूनही सुरूच आहे. पावसाने दगा दिला आणि हातचे सगळेच शेतकरी राजा गमावून बसला आहे. सणालाही पैसे लागतात. दिवाळी सण साधेपणानेच साजरा होत आहे. 
- हिंमतअण्णा माळी, शेतकरी, न्याहली (जि. नंदुरबार)

ऑगस्टअखेर पूर्वहंगामी कपाशीला पावसाचे पाणी मिळाले नाही. हलक्‍या जमिनीत फूल, पातेगळ झाली. नंतर सप्टेंबरमध्ये पाऊस आला तो संकटे घेऊनच. त्याने कापूस काळवंडला. केळीलाही दर मिळत नाहीत. कर्जमाफीचे तर सांगूही नका आणि विचारूही नका. अशात कसली दिवाळी आणि कसला सण आला.
- भरत पाटील, शेतकरी, जापोरा, (ता. शिरपूर, जि. धुळे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com