पंजाबमध्ये कापसाची आवक वाढली 

पंजाबमध्ये कापसाची आवक वाढली 

चंडीगड : पंजाबमधील बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक वाढली आहे. आतापर्यंत विविध ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये ३.१९ लाख क्विंटल कापसाची आवक झाली आहे. 

दरम्यान, राज्य सरकारने नवीन कापसाची खरेदी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कापूस खरेदीचा नुकताच आढावा घेतला. राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून आवक होणाऱ्या संपूर्ण कापसाची प्रतिक्विंटल ४,२२० रुपये किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) खरेदी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री सिंग यांनी दिले आहे. त्यांनी कापूस खेरदीसंदर्भात कृषी विभाग तसेच बाजार समित्यांमधील अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. कापूस खरेदीची प्रक्रिया सुरळीत पाडण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. 

विविध ठिकाणी असलेल्या बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक वाढली आहे. आतापर्यंत ३.१९ लाख क्विंटल कापसाची आवक झाली आहे, अशी माहिती बाजार समिती सचिवांनी दिली आहे. यंदा राज्यातील कापूस उत्पादन वाढल्याचा अंदाज आहे. यामुळे सध्या होणारी कापूस आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने अधिक आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये प्रतिक्विंटल ४,२२०-४,३५० रुपये दराने कापसाची खरेदी केली जात आहे, अशी माहिती बाजार समिती सचिवांनी मुख्यमंत्री सिंग यांना दिली आहे. 

देशातील कापूस पीकक्षेत्रात वाढ 
देशात यंदा कापूस पीकक्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा १२२.५९ लाख हेक्टरवर कापूस पीक व्यापले आहे. गेल्या वर्षी १०२.७९ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. यंदा पीकक्षेत्र वाढल्याने उत्पादन वाढणार असल्याचा अंदाज आहे. पंजाबमध्ये ३.८५ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. गेल्या वर्षी २.५६ लाख हेक्टरवर कापूस पीकक्षेत्र होते, अशी माहिती कृषी मंत्रालयाने दिली आहे. 

पंजाबमधील कापूस पीकक्षेत्र (लाख हेक्टरमध्ये) 

  • २०१७-१८...३.८५ 
  • २०१६-१७...२.५६ 

स्रोत : कापूस विकास संचालनालय, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com