भाव मिळत नसल्याने कापसाची साठवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

स्वदेशी कापूस वेचणीकडे मजुरांची पाठ
सोयगाव तालुक्‍यात बी. टी. बोलगार्ड कापसापाठोपाठ स्वदेशी कापसाचीही मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. भावात मोठी तफावत असलेल्या कापसाची बोंडे वजनाने हलकी भरत असल्याने स्वदेशी कापसाची लागवड केलेल्या शिवारात वेचणीसाठी मजूर पाठ फिरवीत आहेत.

जरंडी - सोयगाव परिसरात खरीप पिकांच्या काढणीसोबतच कापूस वेचणीचीही कामे जोरात सुरु आहेत. सात रुपये प्रतिकिलोप्रमाणे मजूर कापसाची वेचणी करत आहेत. वेचणीनंतर शेतीच्या बांधावरच मोजणी करण्यात येत असल्याने मजुरांमध्ये उत्साह आहे.

सोयगाव परिसरात कापसाची विक्रमी लागवड करण्यात आली आहे. सध्या कापूस वेचणीसाठी सर्वांचीच धावपळ सुरु असल्याने मजुरांची कमतरता भासत आहे. कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने वेचणी केलेल्या कापसाची साठवणूक करावी लागत आहे. परंतु साठवणूक करण्यासाठी गोदामही भाडेतत्वावर घ्यावे लागत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. 

वेचणीपोटी आगाऊ रक्कम देऊनही मजूर मिळत नसल्याने अनेकांना प्रतीक्षेत ठेवण्यात येत आहे. साठवणूक केलेल्या कापसाची रखवालदारी करण्यासाठी स्वतंत्र मजूर ठेवावा लागत आहे.

भाव नसल्याने वेचणी केलेल्या कापसाची केवळ साठवण करावी लागत आहे. कापूस वेचणीनंतर वजनात तफावत येत असल्याने यामध्येही मोठी घट शेतकऱ्यांना सहन करावी लागत आहे. सोयगाव शिवारात दोन प्रकारच्या वाणांच्या कापसाची लागवड करण्यात आली आहे. 

बोलगार्ड बी. टी. कापसासोबतच स्वदेशी वाणाचीही मोठी लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे स्वदेशी कापसाचीही आवक वाढली, परंतु वजनाला हलके भरत असल्याने मजूर वेचणी करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. केवळ तीनशे रुपये जास्त भाव असलेल्या स्वदेशी कापसाच्या वेचणीसाठी प्रतिकिलो दहा रुपये मजुरी द्यावी लागत आहे.

पहिल्यांदाच स्वदेशी वाणाची कापूस लागवड करण्याचा प्रयोग राबविला असून कापूस बहारदार आला आहे, परंतु वेचणीची मोठी चिंता सतावत आहे. वजन कमी भरत असल्याने मजूर वेचाणीसाठी येण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे प्रतिकिलो दहा रुपये वेचणीचा भाव देऊनही हा कापूस घरी आणावा लागत आहे.
- अक्षय काळे, कापूस उत्पादक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathwada news cotton farmer