दूध टिकविण्यासाठी इन-कॅन, सरफेस, बल्क टँक कूलर पद्धती

डॉ. संदीप रामोड, सचिन मुळे
गुरुवार, 12 जानेवारी 2017

अयोग्य पद्धतीने दुधाची हाताळणी, दुधाची प्रत टिकविण्यासाठी आधुनिक यंत्रणेचा अाभाव, अयोग्य वाहतूक व्यवस्था यामुळे योग्य त्या प्रमाणात दूध प्रक्रिया उद्योगाला उपलब्ध होत नाही. दुधाचे शीतकरण करून टिकवणे अावश्यक अाहे, त्यामुळे दुधावर प्रक्रिया करून अधिक फायदा मिळू शकेल. 

दूध टिकविण्यासाठी दुग्धशाळा, सहकारी व संघटित डेअरी उद्योगामध्ये दुधावर योग्य तापमानाला शीतकरण प्रक्रिया केली जाते. त्यामुळे दूध अधिक काळ टिकविणे शक्य होते. 

दुधाचे शीतकरण का करावे? 
सामान्य वातावरण (२५ ते ३५ अंश सेल्सिअस) दुधातल्या जिवाणूंची वाढ होण्यास उपयुक्त ठरते. दुधामध्ये सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढल्यामुळे दूध नासण्यास सुरवात होते. जिवाणूंची संख्या वाढू नये म्हणून दूध ५ अंश सेल्सिअस तापमानाला शीतकरण करणे अत्यंत आवश्यक असते. 

दूध शीतकरणाच्या पद्धती - 
१) इन-कॅन पद्धत - 
दूध कॅनमध्ये ओतून कॅन थंड पाण्याच्या टाकीत ठेवले जाते. 
फायदे - 
- दूध शीतकरण व दूध साठवणे या दोन्ही क्रिया एकाच ठिकाणी, एकाच संयंत्रात होतात. 
- छोट्या डेअरी फार्मसाठी उपयुक्त आहे. 
- दूध जास्त काळ टिकते व जिवाणूंची संख्या वाढत नाही. 
त्रुटी - 
- दूध शीतकरण अतिशय संथगतीने होते. 
- दुर्लक्ष केल्यास टाकीतील पाणी दुधात मिसळून दूध खराब होण्याची शक्यता असते. 

२) सरफेस कूलर पद्धत - 
- या प्रकारच्या शीतकरणात स्टेनलेस स्टीलच्या नळ्यातून थंड पाणी सोडले जाते. 
- बाहेरील पृष्ठभागावरून दुधाची लहान धार सोडली जाते, ते दूध गुरुत्वाकर्षणामुळे खाली वाहते व नळ्यातून थंड पाणी हे विरुद्ध दिशेने वाहते. नंतर थंड झालेले दूध एकत्र केले जाते. 
फायदे - 
- शीतकरण इन-कॅन पद्धतीपेक्षा जलद होते. सरफेस कूलरची रचना साधी व सरळ असते. 
- दुधाला चांगला वास येतो व दूध जास्त काळ टिकते. 
त्रुटी - 
- दुधाचा प्रवाह कायम नियंत्रित करावा लागतो, कारण दुधाचा प्रवाह वाढल्यास दुधाचे तापमान जास्त राहते. दुधाचा प्रवाह जर कमी असला तर दूध जास्त थंड होते. 

३) बल्क - टँक कूलर - 
या पद्धतीत दूध काढल्यानंतर लगेचच स्टेनलेस स्टीलच्या टाकीत ओतले जाते व दूध टाकीच्या बाहेर जोडलेल्या थंड पाण्याच्या जॅकेटमार्फत थंड केले जाते. 
फायदे - 
- मोठ्या फार्मसाठी अतिशय उपयुक्त. 
त्रुटी - 
- सुरवातीला खरेदी किंमत जास्त असते. 
 
४) बर्फ वापरून थंड करणे - 
बर्फ तयार करून दुधाच्या मध्यभागी असलेल्या भांड्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकून दूध थंड करता येते. खूप कमी प्रमाणात क्षमता असते. 
फायदे - 
ज्या वेळी वीज बंद असते, तेव्हा बर्फ वापरून दूध थंड करता येते. 
त्रुटी - 
- खूप जुनी पद्धत आहे. 

५) ट्यूब कूलर पद्धत - 
या पद्धतीत स्टेनलेस स्टीलची एक नळी ही दुसऱ्या नळीच्या आतमध्ये बसवलेली असते. एका नळीतून थंड पाणी, तर दुसऱ्या नळीतून दूध विरुद्ध दिशेने वाहत असते. 
फायदे - 
- अतिशय प्रभावीपणे दूध थंड केले जाते. 
त्रुटी - 
- सुरवातीला खरेदी किंमत जास्त असते. 

संपर्क - डॉ. संदीप रामोड, ८२७५९३८८८६ 
(पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) 

Web Title: milk preservation methodsc