माळरानात एकरी १२० टन ऊस उत्पादन

सुनील पाटील
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - जिल्ह्यात एकरी सरासरी पस्तीस ते चाळीस टन उसाचे उत्पादन घेतले जाते; पण या सरासरीच्या गणिताला बगल देत पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील उद्योजक आणि प्रयोगशील शेतकरी नारायण जाधव यांनी एक एकर शेतात तब्बल १२० टन उसाचे उत्पादन घेतले. 

कोल्हापूर - जिल्ह्यात एकरी सरासरी पस्तीस ते चाळीस टन उसाचे उत्पादन घेतले जाते; पण या सरासरीच्या गणिताला बगल देत पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील उद्योजक आणि प्रयोगशील शेतकरी नारायण जाधव यांनी एक एकर शेतात तब्बल १२० टन उसाचे उत्पादन घेतले. 

श्री. जाधव यांनी शेती करण्यात बदल करून जास्तीतजास्त उत्पादन मिळविण्याचा चंग बांधला. यावर्षी कारखाना सुरू झाल्यानंतर ऊसतोड सुरू झाली आणि त्यांना श्री. जाधव यांनी एकरी १२० टन ऊस उत्पन्न  काढले. 

 जाधव यांनी वडिलोपोर्जित ६ एकर शेती कसण्यासाठी अर्ध्यातूनच शाळेला रामराम केला. जी शेती आहे, ती खडकाळ असल्याने उत्पन्न फारसे निघत नव्हते. श्री जाधव यांनी बायोगॅस प्लॅंटनिर्मितीत बस्तान बसवले. मिळणाऱ्या नफ्यातून त्यांनी पुन्हा शेतीची सुरवात केली. खडक फोडून त्यात गाळाची माती भरली, आणखी ६ एकर शेतजमीन भावाच्या मदतीने विकत घेतली. 

बायोगॅसचा व्यवसाय मुलगा हिंमत याच्या स्वाधीन करून पूर्ण वेळ शेती करू लागले. शेतीची योग्य पद्धतीने बांधबंदिस्ती करून घेतली. सुरवातीला उसाचे २० ते २५ टनांचे मिळणारे उत्पादन शेती तंत्रात बदल करत गेल्याने ६० टन, ८० टन, १०० टन आणि यंदा १२० टन उत्पादन काढले. 

प्रयोगशीलता जपत ऊस शेती : 

जिल्ह्याचे सरासरी ऊस उत्पादन एकरी ३५ ते ४० टनांपर्यंतच आहे. याला अपवाद असणारेही काही शेतकरी आहेत, ते मात्र नवनवीन प्रयोग करत जास्तीत जास्त उसाचे उत्पादन कसे काढता येईल यासाठी प्रयत्न करत राहतात. नारायण जाधव हे यापैकीच एक प्रयोगशील शेतकरी असून, त्यांनी एकरी १२० टन उत्पादन घेत परिसरातील शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. 
अशी केली ऊस लागण : 

यंदा जाधव यांच्याकडे ४६ गुंठ्यातील आडसाली लागणीची ऊसतोड सुरू आहे. यासाठी त्यांनी मे २०१६ मध्ये पूर्वमशागत केली. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेतात मेंढ्या बसवल्या, शेणखत मिसळले. त्यानंतर साडेचार फुटाची सरी सोडली. लागणीवेळी रासायनिक आणि ऑरगॅनोफॉस हे सेंद्रिय खत मिसळून डोस बनवला. तो सरीत टाकून जुलै २०१६ च्या पहिल्या आठवड्यात ८६०३२ या जातीच्या उसाची लागण केली. पाणी व्यवस्थापनासाठी स्वतःची सरीसिंचन पद्धती विकसित केली. ठिबकच्या वापरातील अडथळे यामुळे दूर झाले. पाटपाण्यापेक्षा कमी कमी श्रमात हे पाणी देणे त्यांना शक्‍य झाले. रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर करून त्यांच्या जोडीला लेंडीखत, शेणखत आणि तयार स्वरूपातील सेंद्रिय खते वापरून अधिकाधिक उत्पादन घेता येते, हे जाधव यांनी सिद्ध केले. 

Web Title: Narayan Jadav successes story