नाशिकमधून दीड लाख टन द्राक्ष निर्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आटोपला असून यंदा विक्रमी निर्यात झाली आहे. हंगामात सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी, वाढलेली थंडी, यामुळे काही काळ निर्यात मंदावली होती. मात्र त्यानंतर वाढलेली मागणी, सुरळीत झालेली निर्यात व दरात झालेली सुधारणा, यामुळे यंदा (ता. ९ मेअखेर) विक्रमी एक लाख ४६ हजार ११३ टन निर्यात झाली. यापैकी युरोपियन देशात एक लाख ११ हजार ६४७ टन तर इतर देशांमध्ये ३४ हजार ४६६ टन निर्यात झाली आहे.

नाशिक - नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आटोपला असून यंदा विक्रमी निर्यात झाली आहे. हंगामात सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी, वाढलेली थंडी, यामुळे काही काळ निर्यात मंदावली होती. मात्र त्यानंतर वाढलेली मागणी, सुरळीत झालेली निर्यात व दरात झालेली सुधारणा, यामुळे यंदा (ता. ९ मेअखेर) विक्रमी एक लाख ४६ हजार ११३ टन निर्यात झाली. यापैकी युरोपियन देशात एक लाख ११ हजार ६४७ टन तर इतर देशांमध्ये ३४ हजार ४६६ टन निर्यात झाली आहे. 

देशात द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र अव्वल आहे. राज्यातील एकूण द्राक्ष निर्यातीपैकी नाशिक जिल्ह्याचा ९१% वाटा आहे. जिल्ह्यामध्ये द्राक्षाचे एकूण ५८ हजार ३६७.४३ हेक्टर क्षेत्र आहे. त्यात निफाडमध्ये २१ हजार ९४१ हेक्टर, दिंडोरीत १५ हजार ७५८.९३ हेक्टर, नाशिक तालुक्यात ११ हजार ६७१ हेक्टर तर चांदवडमध्ये ५ हजार १४८ क्षेत्रावर लागवड आहे. यापैकी यंदा निर्यातीसाठी २४ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष प्लॉट नोंदणी करण्यात आली. याअंतर्गत ग्रेपनेट प्रणालीमध्ये ३८ हजार ४७८ द्राक्ष प्लॉटची नोंदणी करण्यात आली होती. जिल्ह्यात द्राक्ष लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास ६० टक्के क्षेत्रावरील द्राक्ष निर्यातीसाठी पूर्वनोंदणी झाली.

हंगामाच्या सुरुवातीला वाढलेल्या थंडीमुळे द्राक्ष निर्यात मंदावली होती. मात्र नंतर द्राक्ष उत्पादकांच्या यशस्वी प्रयत्नांतून दर्जेदार द्राक्ष उत्पादनास निर्यातीची आशादायी स्थिती तयार झाली. नेदरलँड, जर्मनी, युनायटेड किंगडम, रशिया, कॅनडा, चीन , डेन्मार्क, फिनलँड, दुबई, थायलंड या देशात द्राक्षाला अधिक मागणी होती. 

नाशिकची द्राक्षे युरोपीय देशांसह रशिया, चीन, कॅनडा, दुबई, जर्मनी, मलेशिया आदी देशांत पाठविण्यात येतात. जागतिक बाजारपेठेत भारतीय द्राक्षांची मागणी टिकून राहावी यासाठी कृषी विभागाने द्राक्ष निर्यातीबाबत जनजागृती केली. तसेच निर्यातीसंबंधीचे निकष तपासून काटेकोरपणे कामकाज पार पाडले. नाशिकमध्ये यंदा द्राक्ष पिकाला पोषक वातावरण होते. त्यामुळे ६० टक्के क्षेत्रातील पिकाची आधीच निर्यातीसाठी नोंदणी झाली.

द्राक्ष निर्यातीच्या आजवरच्या इतिहासात या हंगामातली ही सर्वाधिक निर्यात ठरली. तब्बल एक लाख ४६ हजार ११३ मेट्रिक टन इतकी विक्रमी द्राक्षे परदेशात गेली.

चालू हंगामात अनेक निर्यातदारांनी युरोप बाजारपेठेवर फोकस केला होता. मात्र क्षमतेपेक्षा जास्त माल पाठविल्याने गेल्या दीड महिन्यात दर पडले. युरोप बाजारात सफेद द्राक्षांना ३५% तर रंगीत द्राक्षांना ६५% मागणीचे प्रमाण दिसून आले. आगामी हंगामात रंगीत वाणांवर भर द्यावा लागेल. सोबतच नवीन बाजारपेठा शोधाव्या लागतील व विकसित कराव्या लागतील.
- विलास शिंदे, चेअरमन, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कं., मोहाडी (नाशिक) 

यंदा द्राक्षाची विक्रमी निर्यात 
झाली. जागतिक बाजारपेठेत चांगल्या संधी निर्माण झाल्या. या वर्षी चीन, कॅनडामध्ये निर्यातीला चांगला वाव मिळाला. कृषी विभागाने वेळोवेळी कामकाजात लक्ष दिले. त्यामुळे निर्यातीचे हे चित्र भविष्यासाठी अधिक फायदेशीर व निर्यातदारांसाठी आशादायी आहे. 
- नरेंद्र आघाव, कृषी उपसंचालक, नाशिक

यंदाच्या हंगामातील ठळक घडामोडी
चालू हंगामात द्राक्षांसाठी पोषक वातावरण निर्यातक्षम द्राक्ष क्षेत्राच्या नोंदणीत लक्षणीय वाढ
बंपर क्रॉप निघाल्याने उत्पादन वाढले
थंडीमुळे काही काळ निर्यातीला फटका
रशियामध्ये तांत्रिक अडचणीमुळे काही दिवस निर्यात संथ 
हंगामाच्या प्रारंभी प्रतिकिलो ८० ते १०० रुपयांपर्यंत दर, आवक वाढल्यानंतर ५० ते ६० रुपयांपर्यंत घसरण 
युरोपियन बाजारात अधिक निर्यात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Grapes Export