‘३८ गाव पाणीपुरवठा योजने`ला आंध्र प्रदेशातील समितीची भेट

प्रतिनिधी
गुरुवार, 6 जुलै 2017

येवला, जि. नाशिक - पाणी येते शंभर किलोमीटरहून... त्यावर बाभूळगाव येथे प्रकिया करून ते शुद्ध केले जाते आणि पूर्ण क्षमतेने येवला परिसरातील २५ ते ३० किलोमीटर परीघातील ४५ पेक्षा जास्त गावांना पुरवले जाते. गावकरी पाणीपट्टी नियमित भरतात, अन योजना नफ्यात चालते...असा नावलौकिक प्राप्त केलेल्या येवला तालुक्यातील ‘३८ गाव पाणीपुरवठा योजने`ला विशाखपट्टणम (आंध्रप्रदेश) येथून आलेल्या समितीने मंगळवारी (ता. ४) भेट दिली.  

आंध्र प्रदेशमध्ये या योजनेप्रमाणेच पाणी योजना राबवली जाणार अाहे. यासाठी विशाखपट्टणममधील पदाधिकाऱ्यांच्या एका समितीने नुकतीच ‘३८ गाव पाणीपुरवठा योजने`ची पाहणी करून संपूर्ण माहिती जाणून घेतली. जागतिक बँकेने भारतातील सामूहिक पाणीपुरवठा योजनांचे सर्वेक्षण करून येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा ही एकमेव योजना देशातील सर्वोत्कृष्ट पाणीपुरवठा योजना असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे ही समिती या योजनेचे कामकाज पाहण्यासाठी आली.

विशाखपट्टणम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ए. अप्पाराव, कृषी सभापती के. दामोदरराव यांच्यासह ४० सदस्यांनी प्रकल्पाला भेट दिली. या समितीने बाभूळगाव येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि अनकाई येथील एम.बी.आर. येथे भेट दिली. अनकुटे गावातील प्रत्येक घरी भेट देऊन योजनेचे पाणी कसे पोचते आणि वसुली कशी केली जाते, या विषयीदेखील समितीच्या सदस्यांनी माहिती घेतली. 

३८ गाव पाणीपुरवठा समितीचे पाणी वितरण, पाणीपट्टी वसुली आणि कामाचे नियोजन पाहून अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या समितीने विशेष कौतुक केले. या वेळी ३८ गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष सचिन कळमकर, उपाध्यक्ष मोहन शेलार, याचबरोबरीने संभाजी पवार, अनकुटेच्या सरपंच जिजाबाई गायकवाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: nashik news agrowon news water

टॅग्स