उच्चशिक्षित युवा शेतकरी करतोय, दर्जेदार, सेंद्रिय गूळनिर्मिती

उच्चशिक्षित युवा शेतकरी नीलेश बोरगे स्वतः गुळव्याच्या कामात कुशल झाला आहे.
उच्चशिक्षित युवा शेतकरी नीलेश बोरगे स्वतः गुळव्याच्या कामात कुशल झाला आहे.

सातारा जिल्ह्यातील निगडी येथील नीलेश प्रमोद बोरगे या बीई (मेकॅनिकल) पदवीधारक युवा शेतकऱ्याने नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे गुऱ्हाळघर उभारून दर्जेदार गूळनिर्मिती सुरू केली आहे. सुमारे पंधरा वर्षांपासून त्याचे वडील सेंद्रिय ऊसशेतीत आहेत. नीलेशने हीच परंपरा वाढवली. याच उसापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय गुळाची वर्षाला सुमारे चार टनांपर्यंत तर काकवीची ५०० किलोपर्यंत विक्री करण्यापर्यंत त्याने मजल मारली आहे. येत्या वर्षांत दहा टन गूळविक्रीचे उद्दिष्ट त्याने ठेवले आहे.

सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगाव हा बागायती पट्टा आहे. या परिसरात ऊस, आले तसेच भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. याच कोरेगाव तालुक्यातील निगडी हे दोन हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथील नीलेश प्रमोद बोरगे हा तरुण शेतकरी आपल्या घरच्या शेतची धुरा सांभाळतो आहे. सन २०१४ मध्ये ‘बीई मेकॅनिकल’ ही पदवी त्याने घेतली. त्यानंतर नोकरीच्या मागे न लागता वडिलांच्या बरोबरीने शेती करण्यास सुरवात केली. 

सेंद्रिय शेती, गूळनिर्मिती
नीलेशचे वडील प्रमोद सुमारे पंधरा वर्षांपासून सेंद्रिय शेती करतात. याच उसापासून ते पूर्वी दुसऱ्यांच्या गुऱ्हाळघरावरून सेंद्रिय गूळ तयार करायचे. नीलेशने देखील हा वारसा पुढे नेण्याचे ठरवले. एकदा दुसऱ्यांकडे गूळनिर्मितासाठी नीलेश गेले असता करार संपल्याने मजूर सोडून गेल्याचा अनुभव पाहण्यात आला. दुसऱ्यांवर विसंबून राहण्यापेक्षा आपणच गुऱ्हाळघर उभारले तर? असा विचार नीलेश यांच्या डोक्यात आला. तो घरात बोलून दाखविला. वडील आणि आईने अधिक चर्चेअंती त्यास होकारही दिला. नीलेशचा उत्साह वाढला. मग जिल्ह्यातील शिवडे, तळबीड, पुणे व इंदापूर परिसरातील गुऱ्हाळघरांना भेट देऊन त्यांनी व्यवसायाची आवश्यक माहिती घेतली. 

गुऱ्हाळ घराचा श्रीगणेशा
सुमारे २५ दिवसांत गुऱ्हाळघराचे बांधकाम पूर्ण करण्यात नीलेश यशस्वी झाले. क्रशर, अन्य साहित्य, गुऱ्हाळघराचे बांधकाम आदी सर्व मिळून सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च आला. नीलेश अभियंता असल्याने त्यांचे तांत्रिक ज्ञान चांगले होते. त्यामुळे व्यवसायाची उभारणी त्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न झाला. अनुभव नसल्याने सेंद्रिय गूळ जास्त दिवस टिकला नाही. मात्र न खचता प्रयत्न सुरू ठेवले. सन २०१७ मध्ये मात्र चुकांमध्ये सुधारणा करून टिकाऊ सेंद्रिय गुळाची यशस्वी निर्मिती केली. यातून आत्मविश्वासात वाढ झाली. 

नीलेश स्वतःच झाले गुळवे 
गूळनिर्मितीसाठी गुळव्या होता. मात्र एका हंगामात शाळेची सहल गुऱ्हाळास भेट देण्यासाठी येणार होती. त्या वेळी गुळव्यास कामानिमित्त अचानक अन्यत्र जावे लागले. मुलांना गूळनिर्मिती कशी दाखवयाचे, असा प्रश्न उभा राहिला. मात्र नीलेश यांनी प्रसंगावधान राखून हा प्रसंग पार पाडला. शिकण्याची व अभ्यासवृत्ती यातून ते स्वतःच गुळव्याचे काम शिकू लागले. अनुभव व प्रयत्नांतून त्यात कुशलताही येत गेली. मग पुढील सर्व हंगामांसाठी नीलेश आता स्वतः गुळव्याचे काम यशस्वीरीत्या करू लागले आहेत.

प्रातिनिधिक अर्थशास्त्र
प्रतिवर्षी सुमारे दोन लाख ८० हजार रुपयांचे एकूण उत्पन्न मिळते. अन्य  शेतकऱ्यांना गूळ तयार करून देण्यासाठीही दहा टन ऊस गाळपापासून सव्वा ते दीड लाख रुपये मिळतात. सर्व प्रकारचा मिळून सुमारे पावणेदोन लाख रुपये खर्च येतो. स्वतः गुळव्याचे काम करत असल्याने त्या खर्चात बचत होते. 

व्यवसायात कुटुंबाचा पाठिंबा
नीलेश यांना आई-वडिलांचा मोठा पाठिंबा व आधार या व्यवसायात मिळाला आहे. पुढील काळात गुऱ्हाळ घर अद्ययावत तसेच अधिक क्षमतेचे बनवण्याचे उद्दिष्ट आहे. गुळाची साठवणूक करता यावी यासाठी मोठे गोदाम बांधायचे आहे. पुढील हंगामात दहा टन सेंद्रिय गूळनिर्मितीचे उद्दिष्ट आहे.   
- ९०११७०४०६९, नीलेश बोरगे

व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी 
 शेतात जास्तीत जास्त शेतखताचा वापर. घरच्या एकूण २५ पर्यंत गीर गायी. वर्षाला सुमारे सात ट्रॉली शेण उपलब्ध होते. 
 लागवडीबरोबर खोडवा उसापासूनही गूळनिर्मिती 
 कोणत्याही रसायनांचा वापर नाही. केवळ भेंडी, चुना, एंरडेल तेलाचा वापर. 
 गुळाचे साचे रोजच्या रोज स्वच्छ. गुऱ्हाळ घरात सुरक्षितता व स्वच्छतेला प्राधान्य. 
 इंधन म्हणून उसाच्या चोयट्यांचा वापर. त्यामुळे प्रदूषण कमी. 

नीलेश यांचा गूळव्यवसाय- ठळक बाबी 
  नीलेश घरच्या उसाबरोबर अन्य शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप करून गूळ तयार करून देतात. 
  गूळनिर्मिती साधारणपणे पाच महिने सुरू राहते. 
  यातून सहा ते सात जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. स्थानिक मजुरांना प्रशिक्षित केल्याने कामे विनाखंड सुरू असल्याचे नीलेश सांगतात. 
  को ८६०३२ वाणाची शेती करतात. त्यापासून उत्तम गोडीचा गूळ तयार होत असल्याचे नीलेश सांगतात.
  उसाचे एकरी २५ ते ३० टन उत्पादन
  एक टन उसापासून १०० किलो गूळनिर्मिती
  हंगामात सुमारे चार टनांपर्यंत गूळविक्री
  सेंद्रिय गुळाच्या २५० ग्रॅम वजनाच्या वड्या, एक किलो, पाच किलो, दहा किलोच्या ढेपा असे पॅकिंग.
  दर- स्थानिक- ८० रुपये प्रति किलो. अन्य शहरांत ९० ते १०० रुपये.
  गूळ पावडर (मागणीनुसार) व काकवीचीही निर्मिती. त्याचे एक किलो बॅाटल पॅकिंग. काकवीची १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री

घरबसल्या मार्केट
वडील पूर्वीपासूनच गूळनिर्मिती करत असल्याने अनेक ग्राहक जोडलेले होते. नीलेश यांनी ग्राहकांचे हे नेटवर्क कायम ठेवले. त्यामुळेच घरूनही विक्री होतेच. शिवाय पुणे, मुंबईसह स्थानिक बाजारपेठेत विक्री सोपी होते. या शहरांतील ग्राहक ‘माउथ पब्लिसिटी’द्वारे वाढले आहेत. काकवीस स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने ‘मार्केटिंग’ची फारशी गरज पडत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com