शेतकऱ्यांवर कोणताही कर नाही - नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

मांजरी, जि, पुणे - ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर शेतकऱ्यांकडून बॅंकेत पैसा भरला जाईल व त्यानंतर केंद्र सरकारकडून त्यावर कर लादला जाईल, असा गैरसमज पसरविला जात आहे. शेतकऱ्यांना भ्रमित केले जात अाहे. मात्र, देशातील शेतकऱ्यांवर केंद्र सरकारकडून कोणताही कर लावला जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.

मांजरी, जि, पुणे - ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर शेतकऱ्यांकडून बॅंकेत पैसा भरला जाईल व त्यानंतर केंद्र सरकारकडून त्यावर कर लादला जाईल, असा गैरसमज पसरविला जात आहे. शेतकऱ्यांना भ्रमित केले जात अाहे. मात्र, देशातील शेतकऱ्यांवर केंद्र सरकारकडून कोणताही कर लावला जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.

“शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन २०२५ शुगर” नावाने मांजरी येथे व्हीएसआयच्या प्रांगणात आयोजिलेल्या चारदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन रविवारी (ता. १३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. व्हीएसआयचे संस्थापक माजी मुख्यमंत्री (कै.) वसंतदादा पाटील यांना पंतप्रधान मोदी यांनी आदरांजली वाहिली. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘‘उसातील कांडीचे अंतर आपल्याकडे खूप कमी अाहे. यामुळे उत्पादकताही कमी अाहे. जैवतंत्रज्ञानाच्या अाधारे ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी कांडीतील अंतरही वाढविण्याची गरज अाहे. याद्वारे उसाची उत्पादकता आणि साखर उतारा वाढविण्यास मदत होईल. ठिबकखालील ऊस क्षेत्र वाढविण्यासाठी महाराष्ट्रात काम सुरू अाहे. याकरिता धोरणात्मक नियोजन करावे लागेल.’’

देशातील साखर उद्योगाच्या विकासात सहकारी साखर कारखान्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, आता जागतिकीकरणाच्या वाटचालीत केवळ साखरेवर आपल्या उद्योगाला अवलंबून राहता येणार नाही. त्यासाठी उपपदार्थांतील संशोधन व बाजारपेठेवर लक्ष द्यावे लागेल. केंद्र सरकारने त्यासाठीच इथेनॉल खरेदीसाठी महत्त्वाकांक्षी धोरण राबविले आहे, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले. जागतिक स्तरावर बांबू पिकाच्या उत्पदानांना मोठी मागणी अाहे. व्हीएसआयमध्ये उसाबरोबरच बांबू संशोधनालादेखील चालना द्यावी, असे अावाहनही त्यांनी केले.  

पंतप्रधान मोदी म्हणाले, की ३० डिसेंबरपर्यंत प्रत्येकाला नोटा बदलून मिळतील. तुमची कष्टाची ५०० ची नोट देताना ४९९ रुपयेदेखील घेऊ नका किंवा १००० रुपयांची नोट देताना दहा रुपयेदेखील कमी घेऊ नका. आमच्या निर्णयामुळे सामान्य जनतेला थोडा त्रास होईल. मात्र, दहशतवाद आणि परकीय शत्रूंनी नकली नोटांच्या मार्फत आखलेले भारताला उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र हाणून पाडायचे आहे. तसेच, काळे धन साठवणाऱ्यांनादेखील या निर्यणामुळे धडा शिकवायचा आहे.’’ 

इथेनालॅच्या सवलती पुन्हा द्याव्या लागतील - शरद पवार
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारकडून इथेनॉल खरेदीसाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे सांगितले. मात्र, शरद पवार यांनी पंतप्रधानांचे भाषण संपताच पुन्हा इथेनॉल व साखर उद्योगाविषयीची समस्या मांडली. ‘केंद्र सरकारने इथेनॉल खरेदीचे दर ४९ रुपये प्रतिलिटरवरून ३९ प्रतिलिटरवर आणले आहेत. इथेनॉल खरेदी प्रक्रियेत साखर कारखान्यांना मिळणारी सवलत काढून टाकल्यामुळे आता पुढील वर्षी देशातील कारखान्यांकडून इथेनॉलचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटेल. पेट्रोलसाठी पर्याय म्हणून जास्तीत जास्त इथेनॉल पुरविण्याच्या सरकारच्या धोरणासाठी आम्ही इथेनॉल तयार करण्यास तयार आहोत; परंतु काढलेल्या सवलती पुन्हा द्याव्या लागतील,’ असे श्री. पवार यांनी या वेळी सांगितले.

Web Title: No tax on farmers