सोळा गावांतील दीडशे महिलांना मिळाला हक्काचा रोजगार

सूर्यकांत नेटके 
Thursday, 22 August 2019

मिरजगाव येथे हे रोजगार केंद्र उभारले असून वीस महिलांना शिवणकामांसाठी शिलाई यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 

नगर - सक्षमीकरणामध्ये महिला बचत गटांचा सहभाग वाढला आहे. या गटांना महिला आर्थिक विकास महामंडळाने पाठबळ दिले. महिलांची काम करण्याची उमेद पाहून नावीन्यपूर्ण उपक्रमांतून कर्जत (जि. नगर) तालुक्यातील सुमारे १६० महिलांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. मिरजगाव येथे हे रोजगार केंद्र उभारले असून वीस महिलांना शिवणकामांसाठी शिलाई यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 

ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांतील महिलांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाने महिला बचत गट चळवळ सुरू केली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत बचत गट उभारणीचे काम केले. नगर जिल्ह्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाने सुमारे साडेतीन हजार महिला बचत गट केलेले असून त्यातून पस्तीस हजार महिला एकत्र आल्या आहेत. महिलांना रोजगार मिळावा यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व राज्य शासनाचा पर्यावरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने मिरजगाव (ता. कर्जत, जि. नगर) येथे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमातून तालुक्यातील गुरव पिंप्री, कोकणगाव, निमगाव गांगर्डा, मांदळी, मिरजगाव, चिंचिली काळदात, डिकसळ, चापडगाव, भांडेवाडी, नागलवाडी, माहिजळगाव, बाभूळगाव या गावांतील १६० महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. 

या महिलांना हिंदुस्थान पेट्रोलियमकडून पाच हजार कापडी पिशव्या शिवण्याचे काम मिळाले. हे काम महिलांनी दोन दिवसांत पूर्ण केल्यानंतर आता प्रदूषण मंडळाकडून कापडी पिशव्या शिवण्याचे काम मिळाले आहे. महामंडळासह अन्य बाहेरची कामेही महिलांना मिळत आहेत, असे महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी संजय गर्जे यांनी सांगितले. महिलांना एका पिशवीच्या कामापोटी साधारण चार रुपये मिळतात. एक महिला दिवसभरात साधारण ७० ते ८० पिशव्या शिवते. ज्या महिलांकडे आर्थिक परिस्थितीमुळे शिवणकाम करण्यासाठी यंत्र उपलब्ध नाही अशा वीस महिलांसाठी मिरजगाव केंद्रात वीस शिवण यंत्रांची उपलब्धता महामंडळाने करून दिली आहे. बाकी महिला घरी कापड घरी नेऊन पिशव्या शिवण्याचे काम करतात. पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते नुकतेच या केंद्राचे उदघाटन झाले.

मिरजगाव येथे महिलांना रोजगार मिळावा, यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमातून केंद्र उभे केले आहे. येथे सोळा गावांतील महिलांना रोजगार मिळाला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ सातत्याने विविध उपक्रम राबवत आहेत.
- संजय गर्जे, जिल्हा समन्वय अधिकारी,  महिला आर्थिक विकास महामंडळ, नगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One hundred and fifty women got their rightful employment in Sixteen villages