कांदा अनुदानाची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

सोलापूर - कांद्याचे दर घसरल्याने राज्य शासनाने १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत विक्री झालेल्या शेतकऱ्यांचा कांद्याला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण ही मुदत आता आणखी पंधरा दिवसांनी म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथे शासनाच्या विविध योजनातील लाभार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम सोमवारी (ता. २१) मंत्री देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. खासदार अमर साबळे, जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, पंचायत समितीच्या सभापती संध्याराणी पवार, उपसभापती रजनी भडकुंबे यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

मंत्री देशमुख म्हणाले, की कांद्याचे दर घसरल्याने गेल्या महिन्यात शासनाने १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत विक्री झालेल्या कांद्याला हे अनुदान जाहीर केले होते. पण आजही कांद्याचे दर काहीसे कमीच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मुदत वाढवण्याची मागणी होत होती. यापूर्वीच या अनुदानासाठी अर्ज करण्याची मुदत २५ जानेवारीपर्यंत वाढवली होती. आता अनुदानाच्या लाभाची मुदतही ३१ डिसेंबरपर्यंत म्हणजे १५ दिवसांनी वाढवण्यात येणार आहे.  या वाढीव मुदतीसाठी मुख्यमंत्र्यांना आपण कल्पना दिली आहे. मंगळवारी (ता. २२) मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होईल. त्यानंतर लगेच त्याची अंमलबजावणी सुरू होईल. या निर्णयामुळे आणखी काही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. 

२५ जानेवारीपर्यंत करा अर्ज
संबंधित शेतकऱ्यांनी ज्या बाजार समितीकडे कांदा विक्री केला आहे. त्याच्या पट्टीची मूळ प्रत, कांदा पीक पेरा नोंद असलेबाबतचा सात-बारा उतारा, बँक पासबुक झेरॅाक्स या कागदपत्रांसह संबंधित बाजार समितीकडे अनुदानासाठी अर्ज करावयाचा आहे. २५ जानेवारी हा त्यासाठी शेवटचा दिवस आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The onion grant will be extended till December 31