कोरटेक झाले स्वच्छ, सुंदर, पर्यावरण संतुलित गाव

कोरटेक झाले स्वच्छ, सुंदर, पर्यावरण संतुलित गाव

परभणी जिल्ह्यात सोनपेठ तालुक्यात कोरटेक गाव वसले आहे. पूर्वी बोरना नदीकाठी वसलेल्या या गावचे १९९१ मध्ये गंगाखेड-सोनपेठ रस्त्यावर पुनर्वसन झाले आहे. सुमारे साडेसहाशे लोकसंख्या आणि ११३ उंबऱ्यांचे हे गाव आहे.

बिनविरोध निवडीची परंपरा 
सुरवातीच्या काळात कोरटेक-मव्हळा या दोन गावांची गट ग्रामपंचायत होती. सन १९९५ मध्ये कोरटेकसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली. तेव्हापासून आजतायागत या ठिकाणी ग्रामपंचायत, सहकारी सोसायटी यांच्या निवडणूक बिनविरोध होतात. पुनर्वसन झाल्यामुळे गावात पूर्वी मूलभूत सुविधांची वानवा होती. तत्कालीन सरपंच तथा सोनपेठ पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथराव सूर्यवंशी यांनी लोकसहभागातून गावाचा कायापालट करण्याचा निर्धार केला.

वृक्षलागवड आणि संवर्धन....
स्वच्छतेचे महत्त्व समजलेले कोरटेकचे ग्रामस्थ पर्यावरण संतुलनासाठी केवळ वृक्षलागवड करून थांबले नाहीत, त्यांनी जबाबदारीने वृक्षसंवर्धनही केले आहे. गावातील प्रत्येक घरासमोर, रस्त्यांच्या दुतर्फा तसेच परसबागांमधून जांभूळ, चिंच, आंबा, बदाम, लिंबू, पेरू आदी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबावर लागवड केलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळे लागवड केलेली फळझाडे सद्यस्थिती जिवंत आहेत. गावाच्या लोकसंख्येच्या तीनपट झाडांची लागवड करण्यात आली आहे. म्हणूनच संपूर्ण गाव हिरवाईने नटलेले दिसते.

निर्यातक्षम भेंडीचे उत्पादन...
शेतकरी कापूस, सोयाबीन, तूर, मूग, ऊस तसेच भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. दररोज नगदी पैसे हाती येतो. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचा भर भेंडी, काकडी, टोमॅटो आदी भाजीपाला उत्पादनावर आहे. तीन- चार वर्षांपूर्वी गावात भेंडी उत्पादकांची संख्या सुमारे ४० होती. आज १०० एकरांवर भेंडीची लागवड आहे. त्यावेळी मुंबई येथील व्यापारी बांधावरून २० रुपये प्रति किलो दराने भेंडी खरेदी करायचे. पाच किलोच्या बाॅक्समधून येथील भेंडीची निर्यात लंडन येथे करण्यात आली. गेल्या तीन वर्षांपासून या भागात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती उद्भवली होती. सिंचनासाठी पाणी कमी पडू लागल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भेंडीचे उत्पादन थांबवावे लागले. सध्या ८ ते १० मोजके शेतकरी भेंडीची शेती करतात. 

फूलशेती बहरली 
गेल्या तीन-चार वर्षांत काही शेतकरी फूलशेतीकडे वळले असून शिवारात गलांडा, बिजली, निशिगंध आदी फुले फुलताना दिसत आहेत. नांदेड त्यासाठी बाजारपेठ आहे. भाजीपाल्याप्रमाणेच फूलशेतीतून दररोजच्या उत्पन्नाचा स्राेत निर्माण झाला आहे.

सेवा केंद्र 
ग्रामपंचायत कार्यालयात सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. ग्रामस्थांना विविध प्रकारची संगणकीकृत प्रमाणपत्रे दिली जातात. ग्रामपंचायतीचे सर्व कर ग्रामस्थ वेळोवेळी भरतात. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती तसेच अन्य सुविधांसाठी निधी उपलब्ध होतो.

कोरटेकचे शेतकरी म्हणतात...
माझी अडीच एकर शेती आहे. कमी दिवसांत किफायतशीर उत्पादन मिळते म्हणून भेंडी घेतो. एकरभर भेंडीचा एक दिवसाआड तोडा केल्यास प्रत्येक तोड्यास तीन क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. या पिकामुळे शेतीचे अर्थकारण सुधारण्यास मदत झाली आहे. 
- नागनाथ नरवाडे

एक एकर शेतीपैकी दहा गुंठ्यांवर बिजली, गलांडा आदी फुलांचे उत्पादन घेतो. उर्वरित क्षेत्रात कापूस किंवा सोयाबीन असते. मात्र पारंपरिक पिकांपेक्षा फूलशेती आश्वासक आहे. दररोज उत्पन्न मिळण्याचे हे साधन आहे. 
- भागवत नरवाडे

माझी नऊ एकर शेती आहे. त्यापैकी एक एकर क्षेत्रावर आलटून पालटून वर्षभर भेंडी घेतो. त्यातून सुमारे ५० ते ६० हजारांचे एकूण उत्पन्न मिळते. सेंद्रिय पद्धतीवर भर दिल्याने रासायनिक निविष्ठांवरील खर्च कमी करणे शक्य झाले आहे. 

माझी सव्वा एकर शेती आहे. चार म्हशी घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. गंगाखेड येथे दूध विक्रीस नेतो. त्यातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्राेत मिळाला आहे.  
- रामेश्वर नरवाडे  

अन्य प्रतिक्रिया 
ग्रामपंचायतीच्या सर्व प्रकारच्या करांची वसुली होते. गावाच्या विकासकामांत ग्रामस्थांचे मोठे सहकार्य मिळते.
- आर. बी. पवार, ७५८८५७१६२७. ग्रामसेवक, कोरटेक

लोकसहभागातून गावात विविध उपक्रम राबविता आले. आमच्या गावापासून प्रेरणा घेत अनेक गावे पाणंदमुक्त झाली. आता संपूर्ण तालुकाच पाणंदमुक्त झाला आहे.
दशरथ सूर्यवंशी, ९८५०२६०९३१ 
माजी उपसभापती,पं. स. सोनपेठ,

येत्या काळात गावात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणार आहोत. शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे आरओ (रिव्हर्स आॅसमॉसीस) यंत्रणा बसविणार आहोत. गटशेतीच्या माध्यामातून निर्यातक्षम भाजीपाला, फळांचे उत्पादन घेण्याचा मानस आहे. शिवारात जलसंधारणाच्या कामांवर भर देणार आहोत.
- मनीषा आनंदराव सूर्यवंशी, ९४२२७४२७५६ सरपंच, कोरटेक

अशी झाली विकासाची कामे 
गावचा विकास करण्याच्या प्रयत्नांमध्ये सर्वप्रथम गावच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला. रस्ते, वीज, पाणी आदी पायाभूत सुविधा निर्माण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने गावाची वाटचाल विकासाच्या दिशेने सुरू झाली.
ग्रामसभेच्या माध्यमातून स्वच्छ, सुंदर गावाचे महत्त्व ग्रामस्थांना समजून सांगण्यात आले. प्रत्येक कुटुंबासाठी स्वच्छतागृह बांधून त्याचा वापर सुरू झाला. गाव पाणंदमुक्त झाले.
काळी कसदार जमीन असल्यामुळे पक्के रस्ते बांधणे आवश्यक होते. सर्व गावांतून सिमेंटचे रस्ते बांधण्यात आले. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटार व्यवस्था करण्यात आली. चार ठिकाणी शोषखड्डे तयार करण्यात आले. यामुळे गाव चिखलमुक्त झाले.
गावातील पक्क्या रस्त्यांमुळे शेतातून घरांमध्ये आणि घरांतून बाजारांमध्ये शेतमाल नेणे सोपे झाले. 
गावकऱ्यांनी स्वच्छतेचा घेतलेला वसा कायम ठेवला आहे. त्यामुळे स्वच्छ 

गावाची संकल्पना  टिकून आहे.

पुरस्कारांनी सन्मान 
निर्मल ग्राम पुरस्कार - २००७
महात्मा गांधी तंटामुक्त गाव- २०१०
पर्यावरण संतुलित समृद्ध गाव- २०१०-११
जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम- २०१६-१७
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय प्रथम- २०१६-१७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com