विविध पिकांच्या बीजोत्पादनातून हुकमी उत्पन्नाचा पर्याय

विविध पिकांच्या बीजोत्पादनातून हुकमी उत्पन्नाचा पर्याय

पडेगाव (जि. परभणी, ता. गंगाखेड) येथील शेषराव निरस यांचे पाच भावांचे एकत्रित कुटुंब आहे. शेषराव थोरले असून त्यांच्याकडे शेतीची संपूर्ण जबाबदारी आहे. धाकटे गोविंदराव अडत व्यापार करतात. ज्ञानोबा यांचे ‘मशिनरी स्टोअर’ आहे. सुनील यांचे कृषी सेवा केंद्र आहे, तर गोपाळ वकील  आहेत. पडेगाव शिवारात निरस कुटुंबाचे १२५ एकर क्षेत्र आहे. त्यापैकी ३० एकर सिंचनाखाली आहे. कोरडवाहू व पाणी यांची परिस्थिती लक्षात घेऊन ऊस, कापूस, गहू, सोयाबीन, मूग, तूर आदी पिके घेतली जातात. 

बीजोत्पादन झाले मुख्य  
उसाला जास्त पाणी लागते. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होऊ लागली. या परिस्थितीत निरस यांनी कोरडवाहू क्षेत्रातील सोयाबीन, मूग, तूर, हरभरा आदींच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले. बीजोत्पादनातून अधिक फायदा होतो हे लक्षात आल्यानंतर ते या शेती पद्धतीकडे वळले. ग्रामबीजोत्पादनाद्वारे क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपयांपर्यंत अधिक पैसे मिळतात ही  बाबदेखील मूल्यवर्धानाच्या दृष्टीने महत्त्वाची होती. 

शेतकरी गटाची स्थापना 
ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी शेतकरी गट असणे आवश्यक होते. त्या दृष्टीने कुटुंबातील तसेच गावातील शेतकऱ्यांना एकत्र करून निरस यांनी बळिराजा शेतकरी ग्रामबीजोत्पादक गटाची स्थापना व अधिकृत नोंदणीही केली. सचिन शेषराव निरस गटाचे अध्यक्ष आहेत. आज गटात सुमारे ४० शेतकरी आहेत. 

गटाचे बीजप्रक्रिया केंद्र 
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात दरवर्षी १८ मे रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या खरीप शेतकरी मेळाव्यात बियाण्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. याशिवाय कृषी प्रदर्शने तसेच परिसरातील गावांतील शेतकऱ्यांकडूनदेखील बियाणास मागणी असते. अन्य शेतकरी गटांना बीजोत्पादनासाठी दरवर्षी विविध पिकांच्या १०० ते २०० बॅग्स पायाभूत बियाण्याचा पुरवठादेखील गटामार्फत केला जातो. गेल्या दोन-तीन वर्षांत दुष्काळामुळे बीजोत्पादनात काही प्रमाणात घट आली आहे. परंतु या गटाने बीजोत्पादनात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

बीजप्रक्रिया केंद्राची उभारणी
 गटामार्फत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर बीजोत्पादन घेतले जाते. परंतु गावात किंवा जवळच्या परिसरात बीजप्रक्रियेची व्यवस्था नसल्यामुळे ५० किलोमीटर अंतरावरील परभणी येथील बीजप्रक्रिया केंद्रामध्ये बियाणे न्यावे लागत असे. त्यासाठी वाहतूक खर्च लागत असे. प्रक्रिया करून पॅकिंग, टॅगिंग करण्यासाठी वेळ लागत असे. हे सर्व श्रम आणि वेळेत बचत करण्यासाठी निरस यांनी गटामार्फत बीजप्रक्रिया केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला. सन २०१६-१७ मध्ये महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गंत कृषी उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये बीजप्रक्रिया यंत्रसामग्रीसाठी सादर केलेला प्रस्ताव मंजूर झाला. ‘क्लिनिंग- ग्रेडिंग’ यंत्रसामग्री ५० टक्के अनुदानावर उपलब्ध झाली. हरियाणाहून उच्च दर्जाची आधुनिक यंत्रसामग्री मागविण्यात आली. आता पडेगाव शिवारात शेतातील एका गोदामात बीजप्रक्रिया केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या सोयाबीनचे ३५० क्विंटल, तुरीचे ३६ क्विंटल, मुगाचे ३२ क्विंटल एवढ्या बियाण्यावर प्रक्रिया, पॅकिंग करून विक्री करण्यात आली. आॅगस्ट महिन्यात गेल्या वर्षीच्या हंगामात हरभऱ्याच्या १२० क्विंटल बियाण्यावर प्रक्रिया करून पॅकिंग करण्यात आले. 

शेषरावांची प्रयोगशील शेती 
जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी अशी निरस यांची ओळख आहे. सन १९९९-२००० मध्ये त्यांना राज्य स्तरावरील गहू उत्पादनाचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. सन २०१३-१४ मध्ये वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सोयाबीनचे एकरी ८ ते १० क्विंटल, तुरीचे ५ ते ६ क्विंटल, गव्हाचे २० क्विंटलपर्यंत उत्पादन ते घेतात. बीजोत्पादन घेण्याचे अनेक फायदे ते सांगतात. यात फाउंडेशन बियाण्याचा वापर केल्याने उत्पादन चांगले मिळते. तसेच बियाणे विक्रीतून क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपये उत्पन्न अधिक मिळते. परभणीसह गरजेनुसार अकोला, राहुरी येथील कृषी विद्यापीठांतूनही बियाणे आणले जाते, असे निरस यांनी सांगितले. 

दर्जेदार बियाण्यांची खात्री 
बीजप्रक्रिया केंद्रामध्ये आधुनिक यंत्रामार्फत बियाणे स्वच्छ करून त्याची प्रतवारी केली जाते. त्यानंतर ३० किलो वजनाच्या बॅगमध्ये पॅकिंग करून त्यांना टॅग लावला जातो. त्यानंतर बॅग विक्रीसाठी उपलब्ध होते. बीजप्रकियेचे काम जिल्हा बीज प्रमाणीकरण कार्यालयातील पर्यवेक्षकांच्या उपस्थित केले जाते. विशेषतः वेगवेगळ्या लाॅटचे पॅकिंग, टॅगिंग यांची नोंद पर्यवेक्षक घेत असतात. शेतामध्येच बीजप्रक्रिया केंद्र उभारल्यामुळे वाहतूक खर्च कमी झाला आहे. चार व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. गटाद्वारे उत्पादित बियाण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अन्य शेतकरी मंडळांमार्फत उत्पादित बियाण्यांवर  प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी प्रति बॅग ४०० रुपयांपर्यंत शुल्क मिळणार आहे. यातून उत्पन्नाचा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.

गटाने राबविलेले उपक्रम 
सन २००७ वर्षापासून खरिपात सोयाबीन, मूग, तूर, उडीद 
तर रब्बीत ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे ग्रामबीजोत्पादन 
यंदाच्या खरिपात सोयाबीन, मूग, तूर या पिकांचा ५५ एकरवर ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
गेल्या तीन वर्षांत सर्व पिकांचे 
सरासरी २४० ते ७०० क्विंटलपर्यंत बीजोत्पादन घेतले. 

शेषराव निरस- ९७६३२८४४४४.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com