पिंपरी बुटी गावाला अक्षयकुमार घेणार दत्तक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

एक हजार ४०० लोकवस्तीच्या या गावातील बहुतांश लोकांच्या उपजीविकेचे साधन शेती हेच आहे. त्यातच ७० टक्‍के क्षेत्र कोरडवाहू असल्याने एकाच पिकावर अवलंबून राहावे लागते. सिंचन सुविधा वाढल्यास या भागातील अर्थकारण पालटेल.

- प्रफुल्ल बोबडे, सरपंच, पिंपरी बुटी

यवतमाळ - मुख्यमंत्र्यांनी रात्र घालविल्याच्या दुसऱ्या दिवशीच शेतकरी आत्महत्या झालेले पिंपरी बुटी (ता. बाभूळगाव) गाव आता पुन्हा चर्चेत आले आहे. या गावातील वाढत्या आत्महत्या नियंत्रणासाठी अभिनेता अक्षयकुमार हे गाव दत्तक घेणार असल्याने या गावाकडे पुन्हा अनेकांच्या नजरा वळल्या आहेत.

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, तसेच अभिनेता अक्षयकुमार यांच्यात १६ ऑक्‍टोबर रोजी मुंबईत चर्चा झाली होती. या चर्चेत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांवर चिंता व्यक्‍त करण्यात आली. त्याच वेळी अक्षयकुमार यांनी या जिल्ह्यातील एक गाव दत्तक घेण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांसमोर मांडला होता. अर्थमंत्र्यांनी त्यानंतर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांना जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेल्या गावाचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पिंपरी बुटी गावाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला अद्याप हिरवा कंदील मिळाला नसला, तरी ग्रामस्थांमध्ये मात्र अक्षयकुमारला पाहण्याची उत्सुकता लागली आहे. त्याच्या माध्यमातून गावाचा कायापालट होईल, अशी अपेक्षाही ग्रामस्थांना आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गावातील शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्‍वभूमीवर या गावात मुक्‍काम केला होता. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री जाताच गावात शेतकरी आत्महत्या झाली होती. 

Web Title: Pimpri-buti adopted village will Akshay kumar