शेतीतही जपली नियोजनाची शिस्त

राजकुमार चौगुले
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर शहर वाहतूक शाखेत पोलिस निरीक्षक असणाऱ्या अशोक धुमाळ यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा जसा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न स्वतःच्या शेतीमध्ये पीक व्यवस्थापनासाठी केला. काटेकोर नियोजन आणि प्रयोगशीलता जपत अपेक्षित पीक उत्पादन घेण्याकडे त्यांचा कल आहे.

कोल्हापूर शहर वाहतूक शाखेत पोलिस निरीक्षक असणाऱ्या अशोक धुमाळ यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा जसा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न स्वतःच्या शेतीमध्ये पीक व्यवस्थापनासाठी केला. काटेकोर नियोजन आणि प्रयोगशीलता जपत अपेक्षित पीक उत्पादन घेण्याकडे त्यांचा कल आहे.

सातारा जिल्ह्यातील सोनके (ता. कोरेगाव) या सुमारे पाच हजार लोकसंख्या असणाऱ्या गाव शिवारात अशोक विश्वासराव धुमाळ यांची शेती आहे. या ठिकाणी त्यांची वडिलोपार्जित पंचवीस एकर शेती असून त्यातील पंधरा एकर बागायती शेती आहे. जमीन काळी कसदार आहे. उर्वरित शेती जिरायती आहे. पंधरा एकरापैकी अडीच एकर द्राक्ष, दोन एकर आले आणि सात एकरांवर ऊसलागवड आहे. ही शेती विविध ठिकाणी विभागली आहे. शेतीमध्ये पाणीपुरवठ्यासाठी दोन विहिरी आणि दोन कूपनलिका आहेत. शेती वसना नदीच्या काठी आहे, त्यामुळे शेतातील विहिरीची पाणी पातळी टिकून रहाते. वर्षभर पिकांना पाणी देणे शक्‍य झाले आहे.

अशोक धुमाळ हे दापोली कृषी महाविद्यालयाचे बी.एस.एस्सी.(कृषी)पदवीधर आहेत. वडिलोपार्जित शेती असल्याने त्यांना लहानपणापासून शेतीमधील पीकपद्धती आणि व्यवस्थापनाचा अनुभव होताच. त्यामुळे त्यांनी पोलिस खात्यातील नोकरी सांभाळत पीक नियोजनही योग्य पद्धतीने केले. शेती नियोजनाचा अनुभव असल्याने कोणत्या कामाला किती मनुष्यबळ लागते? ते किती वेळात पूर्ण होते याची त्यांना माहिती आहे. जमिनीच्या प्रत आणि पिकाची गरज लक्षात घेऊन त्यांनी पाणी व्यवस्थापनाचे गणित बसविले आहे. मजुरांना पीक आणि पाणी नियोजनाचा आराखडा दिला जातो. सुट्टीच्या दिवशी मजुरांच्याबरोबरीने त्यांचा शेती नियोजनात वेळ जातो.

सर्व शेती ठिबक सिंचनाखाली ...
पीक व्यवस्थापनाबाबत अशोक धुमाळ म्हणाले की, पंधरा एकर शेतीला ठिबक सिंचनाने पाणी पुरवठा केला जातो. माती परिक्षण, पिकाच्या गरजेनुसार रासायनिक आणि सेंद्रीय खतांचा वापर केला जातो. जमिनीची सुपिकता टिकून रहाण्यासाठी ताग लागवड केली जाते. फुलोऱ्यातील ताग गाडून पुढील पीक घेतले जाते.आमचा भाग संमिश्र पावसाचा आहे. यामुळे ऊस, द्राक्ष या पिकांच्या लागवडीवर भर आहे. आमच्या भागात मजुरांची कमतरता असल्याने मला भाजीपाला लागवड आणि व्यवस्थापनाच्या अडचणी आहेत. त्यामुळे ऊस आणि द्राक्ष लागवडीवर भर दिला आहे. पीक व्यवस्थापनाचा खर्च कमी करण्यासाठी उसामध्ये कांदा, हरभऱ्याचे आंतरपीक घेतले जाते. उसाच्या को-८६०३२ जातीची पट्टा पद्धतीने पुर्व हंगामी लागवड असते. उसाला ठिबक सिंचन केले आहे. सन २००२ पासून अडीच एकरावर द्राक्षाच्या तास ए गणेश जातीची लागवड आहे. सुधारित पद्धतीने पीक व्यवस्थापन असल्याने उसाचे एकरी साठ टन,द्राक्षाचे एकरी वीस टन उत्पादनात सातत्य ठेवले आहे. द्राक्षाची विक्री जागेवरच खासगी व्यापाऱ्यांना केली जाते. गेल्यावर्षी दोन एकरावर सातारी आल्याची लागवड केली होती. परंतू दर अत्यंत कमी मिळाल्याने नफा काही उरला नाही. यंदा पुन्हा दोन एकरावर लागवड आहे, दराचा अंदाज घेऊनच विक्रीचे नियोजन करणार आहे.

चुलत भावांची मिळाली साथ...
अशोक धुमाळ यांचे चुलत भाऊ संभाजी आणि रवींद्र हे शेती नियोजनात मदत करतात. स्वत:ची शेती बघत ते अशोक धुमाळ यांच्या शेतीवर लक्ष ठेवून असतात. पीक व्यवस्थापनासाठी मजुरांची जुळणी, शेती कामाचे नियाजन करतात. कोणताही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न करता त्यांना भावाची मदत होते. हा मोठा आधार आहे. याचबरोबर सासरे अशोक पवार हेही पीक नियोजनसाठी मदत करतात. अशोक यांचे चुलत भाऊ रवींद्र धुमाळ हे प्रयोगशील द्राक्ष बागायतदार असल्याने बागेच्या व्यवस्थापनाचा सल्ला त्यांच्याकडूनच घेतला जातो. तसेच द्राक्ष बागेतील छाटणी, विरळणी, काढणीच्या कामासाठी परिसरातील मजुरांच्या गटाला काम दिले जाते. त्यामुळे मजूर शोधण्याची वेळ येत नाही. शेतीत दोन कायमस्वरूपी मजूर आहेत. यामुळे अशोक धुमाळ काही वेळा कोल्हापूर शहरात नोकरीत व्यस्त असल्यास एखाद्या रविवारी शेतीवर येवू शकले नाहीत तरी शेतीतील कामे थांबत नाहीत. मात्र शहरातील खरेदी विक्री असली तर मात्र स्वत: पुढाकार घेवून धुमाळ ती जबाबदारी स्विकारतात. धुमाळ यांचा भावांशी दररोजचा संपर्क असतो. शेतीवर गेले की, पुढील नियोजनानुसार मजुरांच्या पगाराची रक्कम भावाकडे ठेवली जाते. यामुळे शेतीचे काम अडत नाही. शेतीच्या खर्चासाठी पीक कर्ज घेऊन त्याचा उपयोग शेतीतील कामासाठी केला जातो.

शेती पडीक पडू न देण्याचा निर्धार
वडिलोपार्जित शेती असली तरी ती पडीक राहू द्यायची नाही, असा अशोक धुमाळ यांचा निर्धार आहे. त्या दृष्टीनेच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. खरं तर त्यांच्याकडे स्वत:च्या घरचे मनुष्यबळ कमी आहे. पूर्वी वडील शेती नियोजन करायचे, आता त्यांना जमत नाही. परंतु त्यांनी शेती सोडली नाही. धुमाळ यांनी चुलतभाऊ व सासऱ्यांचा आधार घेत शेतीमध्ये सुधारणा केली. शेती चांगल्या पद्धतीने टिकवायची, हा त्यांचा प्राथमिक प्रयत्न आहे. ज्या वेळी सेवानिवृत्त होईन, त्या वेळी सुधारित शेती हेच माझे भवितव्य असेल असे धुमाळ सांगतात.

उसातील आंतरपिकांवर भर ...
आंतरपीक पद्धतीबाबत अशोक धुमाळ म्हणाले की, केवळ उसाचे उत्पादन न घेता त्यामध्ये कांदा, हरभऱ्याचे आंतरपीक घेतले जाते. यामुळे जमीन, पाणी, खते आणि मजुरांचा योग्य वापर होता. आंतरपिकातून काही प्रमाणात ऊस व्यवस्थापनाचा खर्च निघून जातो. जमिनीच्या सुपीकतेलाही फायदा होतो. ऊसतोड झाल्यानंतर जमिनीची मशागत करताना पुरेश्या प्रमाणात शेणखत मिसळले जाते. हिरवळीचे खत म्हणून तागाची लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीचा पोत आणि ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता वाढत आहे. त्याचा पुढील पीक वाढीस फायदा मिळतो. काही वेळा बाजारपेठेत दर कमी झाल्याने बटाट्यासारखे पीक आर्थिकदृष्ट्या साधत नाही, परंतु पीकबदल म्हणून बटाटा लागवड काही क्षेत्रावर केली जाते.

सध्या नोकरीमुळे शेतीकडे पूर्णवेळ लक्ष देणे जमत नाही. पण निवृत्त झाल्यानंतर शेतीत विविध प्रकारच्या पीकपद्धतीच्या प्रयोगाचे नियोजन केले आहे. शेतीतील अनुभव आणि कृषी शिक्षण यांचा मेळ असल्याने पीक नियोजनातील बारकावे माहिती आहेत. यामुळे भविष्यात जमिनीची सुपिकता टिकवून शेतीतून उत्पन्न वाढवण्याचा माझा प्रयत्न आहे.

सुट्टीचा दिवस शेती नियोजनात...
अशोक धुमाळ कोल्हापूर शहर वाहतूक शाखेमध्ये पोलिस निरीक्षक म्हणून काम पहातात. कोल्हापूर शहराच्या सर्व वाहतूक व्यवस्थेचा ताण त्यांच्यावर असतो. शहरातील दैनंदिन कार्यक्रम, विविध सांस्कृतिक उत्सवामुळे पोलिस खात्यामधील हा विभाग चोवीस तास अलर्ट असतो. यामुळे नियोजनाची मोठी जबाबदारी असते. मात्र रविवारी किंवा इतर सुट्टीच्या दिवशी ते गावाकडे येतात. पहिल्यांदा शेतीवर भेट ठरलेली असते. तेथे नियोजनाच्या गोष्टी झाल्या की नाही हे पाहिले जाते. काही अडचण आल्यास चुलत भावांशी चर्चा करुन पुढील दिवसातील पीक व्यवस्थापनाचे नियोजन केले जाते.

संपर्क ः अशोक धुमाळ- ९९२३४१९७९९

Web Title: police inspector ashok dhumal's success stroy