पावसामुळे डाळिंब आगार काळवंडले

Pomegranate farm losses due to rain
Pomegranate farm losses due to rain

सोलापूर - कोरडवाहू शेतीचा आधार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या डाळिंबाला कधी नव्हे, तो यंदा पावसाच्या अतिरेकाने चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. अनेक ठिकाणी बागांमध्ये पाणी साचले आहे. कुठे मुळकूज, फळकूजसह फुलगळीचे प्रकार घडले आहेत. परिणामी, डाळिंबाचे आगार असणाऱ्या सोलापूर, सांगली, नाशिक, नगरसह  पुणे, उस्मानाबाद आणि जालना भागांतील डाळिंबाचा मृगासह हस्त बहार चांगलाच काळवंडून गेला आहे. सततच्या पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील सुमारे ५० हजार एकर क्षेत्रांवरील डाळिंबाचे नुकसान झाले आहे. डाळिंब उत्पादकांना यातून आता टनभरही उत्पादन मिळणार नाहीच, उलट एकूण नुकसानीच्या क्षेत्राचा आणि उत्पादनाचा विचार करता सुमारे तीन हजार ५०० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पावसाने पाणी फेरल्याचे चित्र आहे. 

यंदा पावसाने बहुतांश भागात उशिरा सुरवात केली. त्यामुळे आधीच पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने काहीसा दिलासा दिला, पण गेल्या पंधरवड्यापासून मॉन्सूनोत्तर पावसाने अगदी ठरवून हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांना दिलासाऐवजी सर्वाधिक नुकसानीला तोंड देण्याची वेळ आली आहे. राज्यात सुमारे ८० हजार एकर इतके डाळिंबाचे क्षेत्र आहे. त्यात सर्वाधिक ४० हजार एकरपर्यंतचे क्षेत्र एकट्या सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यानंतर सांगली, पुणे, नगर, नाशिक, उस्मानाबाद, जालना, बीड जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. 

डाळिंबामध्ये प्रामुख्याने जूनमध्ये मृग, सप्टेंबरमध्ये हस्त आणि जानेवारीत अंबिया असे तीन बहार धरले जातात. पण, राज्यात सर्वाधिक हस्त बहार अधिक धरला जातो आणि नेमक्‍या हस्त बहारामध्येच सध्या पावसाने हजेरी लावून प्रचंड नुकसान केले आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे ५० हजार एकरवर सध्या हस्त बहार आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ३० हजार एकर, सांगलीतील १० हजार एकर, पुणे, नगर आणि नाशिकसह मराठवाड्यातील १० हजार एकरचा समावेश आहे. 

या भागात प्रामुख्याने १५ सप्टेंबरपासून हस्त बहाराची छाटणी, पानगळ केली जाते. अनेक ठिकाणी ही कामे होऊन आता डाळिंबही चांगली सेटिंगमध्ये आहेत. काही ठिकाणी फळ तयार झाले आहे. पण, सततच्या पावसाच्या माऱ्याने फूलगळती आणि तयार झालेल्या फळात पाणी शिरल्याने फळकूजचे प्रकार झाले आहेत, बागेत पाणी साठल्याने मूळकूजही होत आहे. बहार धरल्यानंतर पहिल्या ६० दिवसांतच डाळिंब उत्पादकांचा सुमारे ७० टक्के खर्च होतो. पण, आता हा सगळा खर्च पाण्यात गेल्याचे दिसते. शिवाय सध्या हस्तच्या आधीच्या मृग बहारातील फळांची काढणीही काही भागांत सुरू आहे. मृग बहारही जवळपास १५ हजार एकरवर घेतला गेला आहे. पण, पावसामुळे मृग बहारातील फळे काढणीत अडथळा येत आहे. शिवाय फळे खराब होण्याचे प्रकार वाढले आहे. अनेक बागांत फळांचा सडा पडला आहे.

साडेतीन हजार कोटींचे नुकसान
राज्याचे सध्याचे हस्त बहाराचे क्षेत्र प्राथमिक अंदाजानुसार ५० हजार एकर गृहित धरता, डाळिंबाचे एकरी सरासरी ८ टन उत्पादन आणि सरासरी ७० रुपये प्रतिकिलोचा दर विचारात घेता, एकरी ५ लाख ५० हजारांचे उत्पन्न मिळू शकते, म्हणजे सुमारे ५० हजार एकराचे २७५० कोटी रुपये आणि मृग बहारातील १५ हजार एकर क्षेत्रांवरील ७५० कोटी रुपये याचा विचार करता एकूण सुमारे ३५०० कोटी रुपये इतके शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे दिसून येते. शिवाय यामध्ये निर्यातक्षम डाळिंबाच्या दराचा विचार करता हा आकडा आणखी वाढू शकतो. 

खर्च अन्‌ उत्पन्नही पाण्यात
गेल्या दोन वर्षांपासून आधीच पाऊस नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. पण, यंदा पावसाच्या भरवशावर बहुतांश शेतकऱ्यांनी डाळिंबाचा बहार धरला, शेतकऱ्यांना डाळिंबाचा बहार धरताना छाटणी, भेसळडोस, फवारण्या असा एका एकराला सरासरी किमान दीड लाख रुपयांचा खर्च येतो. पण, पावसामुळे आता उत्पन्न तर पाण्यात बुडालेच, पण केलेला सगळा खर्चही आता पाण्यात गेला आहे. 

सततच्या पावसामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढतो आहे. सध्या बागा सेटिंगमध्ये असल्याने फूलगळ, फळकूजसारखे प्रकार वाढले आहेत. ज्यांच्याकडे परिस्थिती सुधारण्यासारखी आहे. त्यांनी तातडीने प्रतिबंधात्मक फवारण्या घ्याव्यात. पण, फवारण्या करताना त्यात अंतर ठेवावे, लागोपाठ फवारण्या करू नये, बागेत साचलेल्या पाण्याला तत्काळ वाट करून द्यावी, हाच त्यावर पर्याय आहे.
- डॉ. ज्योत्सना शर्मा, केंद्र संचालक, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर

माझ्या तीन एकराहून अधिकच्या डाळिंब क्षेत्राला पावसाचा फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे फूलगळ, फळकूज झाली आहे. बागेत पाणी आहे, ते बाहेर काढतो आहे. पण, पाऊस कमी होत नसल्याने त्यात अडथळे येत आहेत. यंदा कधी नव्हे ते मोठे आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे. 
- ज्ञानेश्‍वर वाघमोडे, शेतकरी, चळे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर

माझी १५ एकर डाळिंब बाग आहे. सध्या ती पूर्णपणे पाण्यात आहे. आधी मृग बहार धरला, त्यानंतर दुसऱ्या बागेत महिनाभरापूर्वीच हस्त धरला होता. पण, दोन्हीही बहार पावसामुळे गेले. हाताला तर काहीच लागले नाही. आता निसर्गाला भांडावं की सरकारला आम्हाला काहीच कळत नाही.
- सर्जेराव खिलारी, कृषिभूषण, करगणी, ता. आटपाडी, जि. सांगली

आधीचीच मदत नाही, आता काय देणार?
पाच-सहा महिन्यांपूर्वीच कोरड्या दुष्काळामुळे फळबागांसाठी हेक्‍टरी १८ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारने केली आहे. त्यानुसार डाळिंब उत्पादकांना ही मदत  मिळणे अपेक्षित आहे. पण, अद्यापही हे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. विम्यातील घोळ तर तसाच आहे. तोवर आता ओल्या दुष्काळाने तोंड वर काढले आहे. आधीचेच पैसे सरकार देऊ शकले नाही, ते आता यात किती आणि कशी मदत करणार, हा प्रश्‍नच असल्याचे दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com