पोल्ट्री उद्योग ठरतोय शेतीला जोडधंदा

बाळासाहेब लोणे
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

शेतीस पूरक व्यवसाय म्हणून कोंबडीपालन आमच्यासाठी उपयोगी ठरत आहे. परिस्थिती बिकट असल्याने सुरवातीचे भांडवल गोळा करण्यामध्ये अनेक अडचणी आल्या; परंतु खडकेश्‍वरा हॅचरीस कंपनीचे संजय नळगेकर यांनी वेळोवेळो मदत केली.
- देवीदास काळे, पोल्ट्री उद्योजक

रायपूर येथील देवीदास काळे दांपत्याचा अनोखा प्रयोग

गंगापूर : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत रायपूर (ता. गंगापूर) येथील अशिक्षित शेतकरी दांपत्याने कुक्कुट पालन व्यवसायातून शेतीला जोड देत दुष्काळात आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण केला आहे.

येथील देवीदास काळे व पत्नी सिंधूबाई यांनी वर्ष 2006 मध्ये हा व्यवसाय सुरू केला. श्री. काळे यांनी 1987 ते 2006 पर्यंत गावातील एका पोल्ट्री उद्योगावर मजूर म्हणून काम केले होते. हा दीर्घकालीन अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वतःच व्यवसाय करण्याचे ठरवले. कुठलेही प्रशिक्षण न घेता केवळ अनुभवाच्या जोरावर सुरवातीला एक हजार पक्षी आणले. त्यासाठी त्यांना खडकेश्वरा हॅचरीज कंपनीचे संजय नळगेकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. व्यवसाय उभारण्यासाठी सेंट्रल बॅंकेचे दोन लाखांचे कर्जही मिळाले. शेतातच राहत्या घरासमोर 30 बाय 60 व 30 बाय 20 जागेत दोन शेड उभारले. सध्या 1600 पक्ष्यांची एक बॅच आहे. लगेचच 35 दिवसांनी दुसरी बॅच भरली जाते. चार आठवड्यांनंतर पक्ष्यांचे वजन एक किलो 1500 ग्रॅम होते. यातून मिळालेला नफा पुढील काळात पक्ष्यांच्या व्यवस्थापनाला उपयोगी ठरतो. यातून दरमहा पन्नास ते साठ हजारांची उलाढाल होते.

पिल्लांना उबवणी यंत्रात उबवून पिल्लांचे व त्यानंतर कोंबड्यांचे संगोपन व विक्री असे चक्र आहे. या यंत्राला लागणारा सततचा वीजपुरवठा व भारनियमन लक्षात घेऊन 16 हजार रुपयांचे इन्व्हर्टरही विकत घेण्यात आले आहे. पक्षी 40 ते 45 दिवसांत 2 ते 2.5 किलो वजन गाठतात. या पक्ष्यांना साधारणत 4 ते 4.5 किलो खाद्य प्रति पक्ष्यास 40-45 कालावधीत लागते. या पक्ष्यांना साधारणतः मोठेपणी एक चौरस फूट जागा लागते. पक्षी मोकळे सोडता येत नाहीत. ते नाजूक असल्याने त्यांचे खाद्य व्यवस्थापन, लसीकरण शिफारशीनुसार केले जाते. योग्य वजन झाल्यानंतर या कोंबड्यांची विक्रीही खुल्या बाजारात केली जाते. कोणत्याही खासगी कंपनीशी बांधून घेतलेले नसल्याने विक्रीही अधिक रक्कम देणाऱ्या व्यापाऱ्याकडे करता येते. येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी सतत संपर्क ठेवून पक्ष्यांची मागणी व किंमत याचा अंदाज घेत नियोजन केले जाते. त्यातून पक्ष्यांच्या बॅच जुळवल्या जातात. परिसरातील दहा ते पंधरा गावांत विक्री केली जाते. या व्यवसायाची पाहणी करण्यासाठी दूरवरून लोक येतात.

असा आहे प्रति पक्षी खर्च
एका पक्ष्याची किंमत: 20 ते 35 रुपये
चार किलो खाद्य: 120 रुपये
इतर खर्च: चार रुपये
पक्ष्यांची विक्री: 80 रुपये प्रति किलोप्रमाणे
उत्पन्न - तीन ते साडेतीन लाख. (1600 पक्षी)

डिसेंबरपासून जूनपर्यंत पक्ष्यांचे दर चांगले
पहिल्या शेडमध्ये साफसफाई करून पुढील पक्ष्यांची बॅच मागविली जाते. वर्षातून एकापाठोपाठ सहा बॅचेस घेतल्या जातात. साधारणपणे डिसेंबरपासून जूनपर्यंत पक्ष्यांचे दर चांगले राहतात. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन पक्ष्यांच्या बॅचेसचे नियोजन केले जाते.

Web Title: poultry complementary to agriculture