बहूपीक पद्धतीतून शेती केली फायद्याची

राजकुमार चौगुले
रविवार, 8 जानेवारी 2017

अनेकदा शेतीची आवड असूनही नोकरी आणि शेतीचा मेळ घालणे अनेकांना जमत नाही. परंतु जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील शिक्षक प्रमोद कवठेकर यांनी भिलवडी (जि. सांगली) येथील वडिलोपार्जित शेती चांगल्या प्रकारे फुलविली आहे. बहूपीक पद्धती आणि सुधारित तंत्रातून त्यांची शेतीमध्ये प्रगतीची वाटचाल सुरू आहे.

अनेकदा शेतीची आवड असूनही नोकरी आणि शेतीचा मेळ घालणे अनेकांना जमत नाही. परंतु जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील शिक्षक प्रमोद कवठेकर यांनी भिलवडी (जि. सांगली) येथील वडिलोपार्जित शेती चांगल्या प्रकारे फुलविली आहे. बहूपीक पद्धती आणि सुधारित तंत्रातून त्यांची शेतीमध्ये प्रगतीची वाटचाल सुरू आहे.

प्रमोद भूपाल कवठेकर हे गेल्या २२ वर्षांपासून कोथळी (जि. कोल्हापूर) येथील आदर्श विद्यालयात विज्ञान विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सुरवातीला काही वर्षे कोथळी येथे राहून आता ते जयसिंगपूर येथे स्थायिक झाले. परंतु गेल्या बावीस वर्षांपासून त्यांनी शेतीची नाळ सोडली नाही. नोकरीच्या वेळेत शिक्षकी पेशाचे कामयोग्य प्रकारे सांभाळून सुटीच्या दिवशी शेतीचे नियोजन त्यांनी केले आहे.

शनिवारी शाळा सुटली की, प्रमोद कवठेकरांना वेध लागतात ते शेतीचे. घरी आल्यावर काही वेळ थांबून ते भिलवडी (जि. सांगली) या गावातील शेतशिवारात जातात. शेती व्यवस्थापनासाठी दोन कायमस्वरूपी मजूर त्यांनी ठेवले आहेत. शेतावर त्यांची राहण्याची सोय केली आहे. शेतीवर गेल्यावर मजुरांच्या बरोबरीने शेती कामाचा आढावा घेतला जातो. शेतीमध्ये फिरून पीक परिस्थितीनुसार नियोजन केले जाते. दुसऱ्या दिवशीच्या कामांची यादी करून जादा मजुरांचे नियोजन केले जाते. खतांच्या मात्रा, फवारणीची कीडनाशके, पाण्याचे नियोजन याबाबत वेळापत्रक तयार केले जाते. पीक व्यवस्थापनात कशा पद्धतीने सुधारणा अपेक्षित आहेत याची चर्चा ते प्रयोगशील शेतकऱ्यांशी करतात. पुढच्या पाच दिवसांचे नियोजन मजुरांना वहीमध्ये लिहून दिले जाते. शेतावर गोठा असून गाई, म्हशी मिळून दहा जनावरे आहेत. त्याचे दूध गावातील डेअरीला दिले जाते. दूध वाहतुकीसाठी मजुरांना दुचाकी गाडीची सोय केली आहे. त्यांना संपर्कासाठी मोबाईल घेऊन दिलेला आहे.

बाजारपेठेनुसार पीक नियोजन :
प्रमोद कवठेकर यांच्याकडे वडिलोपार्जित आणि विकत घेतलेली अशी एकूण नऊ एकर शेती आहे. तीन ठिकाणच्या शेतीमध्ये विहिरी आहेत. शेतीवर पाणीपुरवठा योजनेचे पाणी येते. हे पाणी शेतातील विहिरीत सोडलेले आहे. नऊ एकराला ठिबक सिंचनाने पाणी दिले जाते. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन पीक नियोजन केले जाते.

पीक लागवडीबाबत प्रमोद कवठेकर म्हणाले की, सध्या नऊ एकरांपैकी चार एकरावर हळदीच्या सेलम जातीची गादीवाफ्यावर लागवड आहे. मी एप्रिलमध्ये लागवड करतो. या पिकाला ठिबक सिंचन केले आहे. शिफारशीनुसार विद्राव्य खतमात्रा दिल्या जातात. जास्तीत जास्त सेंद्रिय खतांच्या वापरावर भर आहे. हळदीमध्ये जून महिन्यात आंतरपीक म्हणून स्वीट कॉर्नची लागवड करतो. साधारणपणे ९० दिवसांत हे पीक तयार होते. एकरी पाच टनाचे उत्पादन मिळते. व्यापारी जागेवर येऊन स्वीटकॉर्न खरेदी करतात. या पिकाचा खर्च वजा जाता पंचवीस हजार नफा मिळाला आहे. हळदीची काढणी मार्चमध्ये होते. एकरी ३५ क्विंटल हळकुंडे मिळतात. शीतगृहात हळदीची साठवण करतो. दर पाहून विक्री केली जाते. हळदीतून चांगला नफा मिळतो.

मार्च महिन्यात हळद काढल्यानंतर मशागत करून काकडीची लागवड केली जाते. काटेकोर व्यवस्थापनावर माझा भर आहे. त्यामुळे एकरी २० टन काकडीचे उत्पादन मिळते. काकडी मुंबई बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना विकली जाते. काकडीला चांगला दर मिळाला तर सव्वा लाखाचे उत्पन्न मला मिळते. काकडी काढल्यानंतर मशागतकरून शेणखत मिसळून जूनमध्ये उसाच्या फुले-२६५ जातीची पाच फुटांवर सरी काढून लागवड करतो. हळद पिकाच्या बेवडाचा चांगला फायदा होता. पुढील पिकाला खतमात्रा फार कमी लागते. उसाला ठिबक सिंचनाने पाणी आणि विद्राव्य खते दिली जातात. उसाचे एकरी ४५ टन उत्पादन मिळते. उसानंतर पुन्हा हळद किंवा इतर पिकांच्या लागवडीचे नियोजन करतो. पीक फेरपालटावर माझा भर आहे.

सध्या दीड एकरात स्वीट कॉर्नची लागवड आहे. सप्टेंबरमध्ये लागवड असून आता उत्पादनाला सुरवात झाली आहे. दीड एकरावर आॅक्टोबर महिन्यात गावरान वांग्याची गादीवाफ्यावर लागवड केली आहे. सध्या वांग्याचे उत्पादन सुरू झाले आहे. मार्चपर्यंत वांग्याचे पीक चालेल. दर चांगला मिळाला तर वांग्यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. प्रत्येक पिकाच्या खर्चाचा हिशेब मी ठेवला आहे. कीडनाशकांचा वापर मी शिफारस आणि अभ्यासानुसारच करतो. त्यामुळे फार कमी प्रमाणात मी कीडनाशके वापरतो. पिकातील चुका सुधारत उत्पादन आणि नफा वाढविण्याचा माझा प्रयत्न असतो.

पुढच्या पिढीलाही शेतीचे संस्कार :
प्रमोद कवठेकर यांचा मोठा मुलगा साईराज हा सध्या बी.एसएस्सी.(कृषी)चे शिक्षण घेत आहे. वडिलोपार्जित शेतीची नाळ तुटू नये हाच यामागचा उद्देश असल्याचे ते सांगतात. भविष्यात हरितगृहांतील पीक लागवडीचे त्यांनी नियोजन केले आहे. त्यामुळे मुलाचे कृषी शिक्षण सुधारित शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे.

पालापाचोळा, शेणापासून खतनिर्मिती :
जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी प्रमोद कवठेकर यांचा एकात्मिक खत व्यवस्थापनावर भर आहे. याबाबत कवठेकर म्हणाले की, हळद काढणीनंतर पाला शिल्लक रहातो. हा पाला आठ गुंठे जमिनीवर पसरतो. त्यामध्ये उसाचे पाचटही मिसळतो. या पाल्यामध्ये दहा ट्राली मळीची माती, दहा ट्रॉली कच्चे शेण, दहा टन सेंद्रिय खत मिसळतो. याचे एकत्रित मिश्रण केले जाते. या मिश्रणाचे थर करताना सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया मिसळतो. मला या मिश्रणासाठी पाच पोती सिंगल सुपर फॉस्फेट आणि पाच पोती युरिया खत लागते. आठवड्यातून दोन वेळा या मिश्रणावर पाणी फवारतो. पाच महिन्यात चांगल्या प्रकारे सेंद्रिय खत तयार होते. हे खत दरवर्षी पाच एकरात मिसळून देतो. सुमारे ७० टक्के मी सेंद्रिय खतांचा वापर करतो.

माहिती तंत्राचा वापर :
सोमवार ते शनिवार शाळेमुळे प्रमोद कवठेकर यांना शेतीकडे जाण्यास वेळ नसतो. ज्या वेळी पिकांवर कीड, रोगांची लक्षणे दिसतात, त्या वेळी शेतातील मजूर त्याचा फोटो व्हॉटस अॅप वर पाठवून देतात. हा फोटो पीक तज्ज्ञांना दाखवून योग्य फवारणीचा सल्ला घेतला जातो. कवठेकर शेतीविषयक तज्ज्ञ तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या व्हॉटस ॲप गटाला जोडलेले आहेत. त्याचाही त्यांना पीक व्यवस्थापनात फायदा होतो.

ॲग्रोवन मार्गदर्शक ...
कवठेकरांच्या वाटचालीत ॲग्रोवन हा आधार बनला आहे. त्यांनी पीकनिहाय फाईल तयार केली आहे. त्यांची स्वतःची विविध विषयांच्या पुस्तकांची लायब्ररी आहे. येत्या काळात पॉलिहाऊस शेतीचे नियोजन असल्याने त्यांनी एसआयएलसीमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. तांत्रिक माहिती उपलब्ध होण्यासाठी राज्यभरातील विविध कृषी प्रदर्शनांना ते आवर्जून भेट देतात.

संपर्क : प्रमोद कवठेकर, ९४०४९६११४५

Web Title: pramod kawthekar's agro news