मांडेकर झाले लॉन शेतीत `मास्टर`

काढणी केल्यानंतर दुसऱ्यांदा उगवून आलेले तजेलदार लॉन.
काढणी केल्यानंतर दुसऱ्यांदा उगवून आलेले तजेलदार लॉन.

मुळशी तालुक्‍यातील हिंजवडी आयटी पार्कलगत असणाऱ्या चांदे गावातील प्रमोद मनोहर मांडेकर या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देऊन हिरवळीची (लॉन) शेती सुरू केली. ग्राहक व बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास करून परिसरातील शेतकऱ्यांनाही लाॅन शेतीसाठी प्रेरित केले. त्यामुळे आज चांदे परिसराची लॉनच्या शेतीसाठी ओळख निर्माण होत आहे.

मुळशी (जि. पुणे) तालुक्‍यातील माण, हिंजवडी, चांदे व नांदे हा परिसर पूर्वी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचा. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पिंपरी चिंचवड किंवा पुण्यामध्ये नोकरी करण्याकडे येथील तरुणांचा अोढा असतो.

चांदे येथील प्रमोद मनोहर मांडेकर यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण मुळशी तालुक्‍यातील घोटावडे येथे पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणाची गैरसोय असल्यामुळे सुमारे तेरा वर्षे कुरिअर सेवेमध्ये नोकरी केली. दरम्यान, हिंजवडी परिसरात आयटी क्षेत्राचा विकास आणि विस्तार झाला. देशी विदेशी आंतरराष्ट्रीय कंपन्या या ठिकाणी सुरू झाल्या. काळाची पावले ओळखून प्रमोद यांनी २००८ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन शेती करण्यास सुरवात केली. सुरवातीच्या काळात पालेभाज्या व फळभाज्यांची पारंपरिक शेती केली जायची; मात्र त्यातून अपेक्षित मोबदला मिळत नसल्याने गावातीलच नर्सरी व्यवसायातील गणेश जाधव यांच्याकडून प्रेरणा घेऊन लाॅन शेती करण्याचा निर्णय घेतला.

अाॅनलाइन विक्रीसाठी संकेतस्थळ
शैक्षणिक ज्ञान व अनुभवाचा उपयोग लॉनच्या शेतीमध्ये करत सुरवातीला मोबाईलवर संपर्क करून ग्राहक जोडले. त्यानंतर इंटरनेटवर स्वतःचे संकेतस्थळ (वेबसाइट) तयार करून मोठमोठ्या शहरातील गार्डन कॉन्ट्रॅक्‍टर, डेव्हलपर्स, बिल्डर्स व लॅन्डस्केपर्सशी थेट संवाद साधला. वेबसाइटवर दर व लॉनची संपूर्ण माहिती मिळत असल्याने मध्य प्रदेश, मुंबई, गोवा, गुजरात या  राज्यांतील मोठमोठ्या शहरातील ग्राहकांशी प्रमोद यांचे व्यावसायिक नातेबंध तयार झाले.

ग्राहकांचा मिळवला विश्‍वास
प्रमोदकडून ग्राहकांना मिळणारी सेवा दर्जेदार आहे. मागणीनुसार केव्हाही ग्राहकांना सेवा देण्यासाठी ते तत्पर राहतात. प्रमोद यांनी यात वर्षात सुमारे तीन हजारहून अधिक ग्राहक मिळवले अाहेत.

येथे केली जाते विक्री 
प्रमोद सध्या कोकण, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, बंगळूर, पुणे व पिंपरी-चिंचवडसह आयटी परिसरात लॉनची विक्री करतात. तत्पर सेवेमुळे ग्राहक कायम त्याच्यामार्फतच लॉन घेतात. 

विविध पुरस्कारांनी गौरव 
प्रमोद यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल अाजवर अनेक पुरस्कारांनी गाैरविण्यात अाले अाहे. यामध्ये २०१३ साली संग्राम कृषी गौरव पुरस्कार, २०१४ साली ‘थागून नर्सरी'चा उत्तम गुणवत्ता पुरस्कार अाणि तुळजाभवानी कृषी मित्र पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा सिंचन सहयोग पुरस्कार, अभिनव कृषी भूषण यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.  

सामाजिक उपक्रमातून लाॅनचा प्रसार 
साक्षी लाॅनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाॅन शेती करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. यासाठी प्रमोद अनेक ठिकाणी जाऊन लाॅन शेतीच्या प्रयोगााची माहिती देतात. त्याचप्रमाणे सामाजिक जबाबदारी म्हणून दरवर्षी एक शाळा, मंदिर, हाॅस्पिटल अशा सार्वजनिक ठिकाणी लॉन किंवा झाडे लावण्याचा उपक्रम राबवला जातो.

लाॅनची लागवड
शेतात सोळा फूट लांबीचे पाट तयार करून त्यामध्ये पाणी सोडले जाते. या पाटामध्ये लाॅनचे छोटे- छोटे शीट्स रोवले जातात. लागवडीनंतर पंधरा दिवसांनी लॉन फुटायला लागल्यानंतर सिमेंटचा पाइप किंवा रोलर फिरवला जाते. त्यामुळे रोपांची मुळे जमिनीत खोलवर जातात. त्यानंतर वीस दिवसांनी कटिंग मशीन फिरवून लाॅन एका समान पातळीवर आणले जाते. अधूनमधून नत्र अाणि कोंबडी खताची मात्रा दिली जाते. दर आठ दिवसांनी पाणी दिले जाते. जवळच मुळा नदी असल्यामुळे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. सहा महिन्यानंतर लाॅनची कापणी होते. एकदा लागवड केल्यानंतर दुसऱ्यांदा लागवड करावी लागत नाही. एकदा लाॅन काढल्यानंतर खोलवर गेलेल्या मुळ्यांमुळे पुन्हा ते उगवतात. सहा महिन्यात ते पुन्हा कापणीला येतात. मशीनद्वारे लाॅनची कापणी करून लॉनच्या शीट्सची विक्री केली जाते.    

लाॅन शेतीतून चांगले उत्पन्न
लॉनची विक्री शीटनुसार होते. ६ ते ६.५ स्केअर फुटाच्या एका शीटला जास्तीत जास्त १० रु. अाणि कमीतकमी ६ रु. भाव मिळतो. लॉनच्या माध्यमातून एकरी चार लाखांची वार्षिक उलाढाल होते. त्यासाठी सुमारे सव्वा ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. खर्च वजा जात त्यातून अडीच ते पावणे तीन लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते. दरवर्षी ते स्वतःचे एक लाख बेड उत्पादित करत असून, ग्राहकांच्या मागणीनुसार इतर शेतकऱ्यांच्या मालाचीही विक्री करतात. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही उत्पन्नाचा स्राेत मिळाला. यातून त्यांनी लाॅन शेती करणाऱ्या ८० शेतकऱ्यांचा गट तयार केला आहे.

लाॅन शेतीला सुरवात 
प्रमोद यांची एकूण १० एकर शेती अाहे. सुरवातीला एक गुंठा क्षेत्रावर लॉनसाठीच्या गवताची लागवड केली. मागणी वाढल्यानंतर दीड एकर क्षेत्र वाढवले. सध्या त्यांच्याकडे एकूण अाठ एकरावर लॉनची लागवड अाहे. स्वतःकडील पाच एकर अाणि तीन एकर भाड्याने घेतलेल्या क्षेत्रावर लाॅनची लागवड असते. उर्वरित पाच एकर क्षेत्रावर भात, भाजीपाला, भुईमूग अशी पिके घेतली जातात. लॉनची शेती मुळशीसाठी तशी नवीन. नोकरीतून मिळालेला मार्केटींगचा अनुभव लॉनशेतीमध्ये उपयोगात आणला. वर्ष- दोन वर्षांत लॉन शेतीमध्ये चांगला जम बसल्यानंतर त्यांनी `साक्षी लॉन नर्सरी' या नावाने फर्म तयार केले. त्या माध्यमातून ग्राहकांना लॉनसाठीच्या गवताची विक्री सुरू केली. यामध्ये त्यांना तीन भाऊ अाणि पत्नी यांची मोठी मदत होते. लागवड, व्यवस्थापनाची जबाबदारी कुटुंबीय पाहतात तर मार्केटींगची जबाबदारी प्रमोद यांच्याकडे असते. 

शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले
व्यवसाय वाढल्यामुळे प्रमोदकडे स्वतःच्या शेतीतील लॉन कमी पडू लागले. त्यामुळे त्यांनी गावातील इतर शेतकऱ्यांनाही या व्यवसायासाठी प्रेरित केले. इतर शेतकऱ्यांकडून लॉनचे शीट विकत घेऊन ते ग्राहकांना लॉन पुरवतात. त्यामुळे गावातील इतरांनाही रोजगाराच्या संधी मिळाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नेटवर्क तयार झाले. सध्या ते शेकडो शेतकऱ्याशी जोडले गेले अाहेत. 

- प्रमोद मांडेकर, ९८५०४६९७६६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com