नाशिकला डाळिंबाचे दर वधारले

नाशिकला डाळिंबाचे दर वधारले

नाशिक - गत सप्ताहात येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाची आवक सरासरी १८७० क्विंटल होती; तर परफेक्‍ट या खासगी बाजार समितीत ही आवक २१०० क्विंटल झाली. या वेळी डाळिंबाला प्रतिक्विंटलला ३५० ते ६५०० व सरासरी ३७५० रुपये दर मिळाले. प्रति २० किलो वजनाच्या क्रेटला हे दर ७० ते १३०० व सरासरी ७५० असे होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

मागील महिन्याच्या तुलनेत डाळिंबाचे दर २० टक्‍क्‍यांनी वधारले आहेत. येत्या रविवार (ता.२८)पासून मुस्लिम रमजान मास सुरू होत आहे. या काळात डाळिंबाला विशेष मागणी वाढते. सद्यस्थितीत बाजाराला रमजानचे वेध लागले आहेत. पुढील आठवड्यापासून मागणी व दरात अजून वाढ होईल, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात नाशिक, पिंपळगाव बसवंत, नामपूर, सटाणा व खासगी परफेक्‍ट हे डाळिंबाचे बाजार आहे. या बाजारात मिळून गत सप्ताहात सरासरी १० हजार क्विंटल डाळिंबाची आवक झाली. ही आवक नाशिकसह नगर, पुणे  जिल्ह्यांतून झाली. मागील पंधरवड्यात ही आवक दुपटीने वाढली होते. त्या काळात दरही उतरले होते. मात्र मागील सप्ताहापासून दरात चांगली सुधारणा झाल्याचे दिसून आले. या काळात डाळिंबाची गुणवत्ता साधारण राहिली. रंग, टिकवणक्षमता कमी असल्याने व्यापाऱ्यांची संख्याही कमी राहिली. मात्र या काळात परराज्यातील बाजारपेठेतून मागणी वाढल्याने दरात वाढ झाली. मात्र डाळिंबाला हंगाम खऱ्या अर्थाने जून महिन्यापासून सुरू होईल. 

मे महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात रमजानचा सण सुरू होतोय. रमजानचे उपवास हे पुढील महिनाभर चालतात. या काळात फळांमध्ये डाळिंबाला विशेष मागणी वाढते. हे गृहीत धरून शेतकरी व व्यापाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. येत्या सप्ताहाअखेरपासून डाळिंबाच्या दरात अजून वाढ होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

मागील महिन्याच्या तुलनेत डाळिंबाचे दर वधारले आहेत. रविवार (ता.२८) रमजान मासारंभ होत आहे. त्या काळात मागणी वाढते. त्यामुळे येत्या काळात डाळिंबाच्या आवकेत व दरात अजून वाढ होईल.

- मनोज झाडे, बाजार निरीक्षक- फळबाजार विभाग, नाशिक बाजार समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com