दहा एकरांतील जांभूळवनातून समृद्धी

Navandar-Family
Navandar-Family

नगर जिल्ह्यात उंबरी बाळापूर येथील नावंदर कुटुंबाने काही वर्षांपूर्वी उसासारख्या पिकात बदल करून जांभूळ पिकाचा पर्याय निवडला. आज दहा एकरांत जांभळाच्या पाचशे झाडांचे जांभूळवन त्यांनी फुलवले आहे. कमी खर्च, कमी पाणी व कमी देखभालीत या पिकाने त्यांच्या फळबागकेंद्रित शेतीचे अर्थकारण सक्षम केले आहे.

नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या परिसरात उंबरी बाळापूर हे बागायती गाव वसले आहे. निळवंडे, भंडारदरा धरणामुळे पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असल्याने उसाचे सर्वाधिक पीक घेतले जाते. जुन्या काळातील बीएस्सी केमिस्ट्रीची पदवी घेतलेले पोपटलाल नावंदर हे गावातील प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांची वीस एकर शेती आहे. 

जांभळाची लागवड
दुष्काळ, पाणीटंचाई, दरांचा बेभरवसा आदी बाबींची वेळीच चाहूल घेत पोपटलाल यांनी पीकपद्धतीत बदल करण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने बाजारात मागणी असलेले, मात्र कमी स्पर्धा असलेले पीक निवडण्याला प्राधान्य दिले. त्यातून जांभूळ हे पीक महत्त्वाचे वाटले. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या कोकण बहाडोली या जातीची लागवड करण्याचे ठरवले. पालघर येथील शासकीय नर्सरीतून रोपे आणली.

जांभूळ व अन्य शेती व्यवस्थापन - दृष्टिक्षेपात
पोपटलाल यांनी पत्नी सौ. शैलजा यांच्या समर्थ साथीने शेतीचे सारे व्यवस्थापन सांभाळले.

आज मेकॅनिकल इंजिनिअर असलेला मुलगा अजय व एम.कॉम असलेल्या सून स्वरा शेतीचे व्यवस्थापन सांभाळतात.

जांभळाचे दोन टप्पे. १५ वर्षांची व १२ वर्षांची झाडे. एकूण झाडे - ५००   लागवडीचे अंतर ३० बाय ३० फूट

उत्पादन खर्च कमी करण्यावर भर

शेतातील गवत, पालापोचाळा कुजवून त्याचा खत म्हणून वापर

पाणी बचतीसाठीही त्याचा उपयोग, त्यातून खताची आणि कष्टाची बचत होते.

जांभळाची तोडणी करण्याच्या काळात दीड महिना पंचवीस महिला व पाच पुरुष मजुरांना रोजगार मिळतो.

नियमित कामांसाठी चार मजूर

नावंदर कुटुंबही सातत्याने शेतीत राबते. सकाळी सहा वाजता कामांची सुरवात होते. रात्री आठपर्यंत चौघेही राबतात.

जांभूळ उत्पादन व दर
साधारण आठ वर्षांनंतर व्यावसायिक उत्पादन सुरू

सध्या प्रतिझाड (वयोमानानुसार) - ५० ते १०० किलो व कमाल २०० किलोपर्यंत उत्पादन

पुणे बाजारपेठेत क्रेटद्वारे माल स्वतःच्या वाहतूक व्यवस्थेतून पाठवण्यात येतो.

मिळणारे दर (प्रतिकिलो) किमान- ७० रुपये, सरासरी ८० ते १०० रुपये व कमाल १५० रुपये.

जांभळाचा हंगाम - १५ जून ते जुलैअखेर.

मात्र मागणी चांगली व नियमित.

सेंद्रिय घटकांनी वाढवली गुणवत्ता 
रासायनिक खतांचा वापर २० टक्क्यांपर्यंतच. वर्षभरातून एकदा गांडूळ खत, कोंबडी खत, हिरवळीचे खत आदींचा जांभळाच्या प्रतिझाडाला ५० किलोप्रमाणे वापर. शिवाय, वेस्ट डी कंपोजरचाही वापर.

शेणखतासोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर. परिणामी दर्जेदार फळे मिळतात. जमिनीचा पोत वाढला असून उत्पादनातही वाढ झाली आहे.

गांडूळ खतनिर्मितीचे शेताचच युनिट. प्रतिबॅच सुमारे एक टन उत्पादन.   उसापेक्षा कितीतरी कमी पटीने जांभळाला पाणी लागते असे पोपटलाल सांगतात. दोन विहिरींद्वारे पाणी उपलब्धता. सर्व क्षेत्राला ठिबक सिंचन. उन्हाळ्यात प्रतिझाड आठ दिवसांनी पन्नास लिटर पाणी.

टंचाईच्या काळात पाणी हप्ता लांबला तरी धोका नाही.

यंदा राज्यात दुष्काळात अनेक भागांत फळझाडे जळून गेली. मात्र, जांभळाची मुळे अत्यंत खोल जात असल्याने प्रतिकूल स्थितीतही ती तगून राहतात असे अजय नावंदर सांगतात.

शैलजाताईंचा गौरव - जांभूळ व फळबाग शेतीत नाव मिळवलेल्या सौ. शैलजा नावंदर यांचे सामाजिक कार्यातही योगदान आहे. महिला सक्षमीकरणासाठी जनसेवा फाउंडेशनमध्ये त्यांनी दोन वर्षे काम केले आहे.

यापूर्वी सेंद्रिय शेतीत कृषिभूषण, जिल्हा परिषदेचा आदर्श शेतकरी, साईरत्न, तसेच २०१४ मध्ये जागतिक अन्न संघटनेतर्फे मॉडेल फार्मर ऑफ इंडिया आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पोपटलाल यांनी शेतीच्या जोरावरच उच्चशिक्षण दिलेल्या आपल्या मुलींपैकी एक अमेरिकेत, एक ओमान येथे विवाहानंतर वास्तव्यास आहे. एक अभियंता मुलगी पुणे येथे आहे. 

फळबाग केंद्रित शेती
पोपटलाल यांच्याकडे सुमारे तीस वर्षांहून अधिक वयाची चिकूची झाडे आहेत. सध्या प्रतिझाड ५०० ते ८०० किलोपर्यंत मोठ्या संख्येने फळे लगडलेली पाहण्यास मिळतात. स्थानिक बाजारपेठेत त्यांची दहा ते पंधरा रुपये प्रतिकिलोने विक्री करतात. सुमारे पाच एकरांत साडेसात वर्षे वयापासून ते एक वर्ष वयापर्यंतची लखनौ ४९ जातीच्या पेरूची लागवडही मिडो ऑर्चर्ड पद्धतीने पाहण्यास मिळते. एकूण सुमारे ४५०० झाडे आहेत. पेरूचे प्रतिझाड १५ ते २० किलो उत्पादन मिळते. २० ते २५ रुपये प्रतिकिलो दर मिळतो.

पेरूची शासकीय परवाना असलेली रोपवाटिकादेखील आहे. वर्षाला पन्नास हजार रोपेनिर्मितीची त्यांची क्षमता आहे. एका एकरात दहा वर्षांपूर्वी नारळाच्या १०० झाडांची लागवड केली आहे. प्रतिझाडापासून वर्षभरात साधारणतः शंभर शहाळे मिळतात. शहाळ्यांची वीस रुपये प्रतिनगाप्रमाणे विक्री होते. एकंदरीत फळबागेने कुटुंबासाठी मोठा आर्थिक स्रोत तयार केला आहे. 

आगामी नियोजन
  जांभळाचा ज्यूस, बियांची पावडर तयार करण्याचे नियोजन, त्यासाठी पल्परची खरेदी केली आहे.
  दर्जेदार रोपेनिर्मितीही करण्याचा मानस नावंदर परिवाराने जांभूळ शेतीतून आदर्श निर्माण केला आहे. शेतकऱ्यांनी असा बदल स्वीकारावा यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न आहेत. 
  सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी, संगमनेर
- अजय नावंदर, ८९७५८९६६०६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com