कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजन

Rabi-Crop
Rabi-Crop

कोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा पडणाऱ्या पावसावर आणि जमिनीच्या खोलीवर अवलंबून असतो. बांधबंदिस्ती केलेल्या क्षेत्रात जमिनीची मशागत करताना नांगरणी, कुळवणी, पेरणी आणि कोळपणी या सारखी मशागतीची कामे उतारास आडवी करावी. त्यामुळे ओलावा साठविण्यास मदत होते.जमिनीतील ओल उडून जाऊ नये म्हणून पेरणी झाल्यानंतर आच्छादन करावे. मारवेल,अंजन,खस, सुबाभूळ या वनस्पतींचा बांधासारखा वापर केल्यास  पावसाचे पाणी अडविले जाऊन जमिनीत ओलावा साठविण्यास मदत होते. दुबार पीक पद्धतीचा अवलंब केल्यास फायदा होतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रब्बी हंगामातील पेरणीचा योग्य कालावधी 
 कोरडवाहू रब्बी हंगामातील पिकांची पेरणीचा १५ ऑक्टोबर पर्यंत करावी.  उशिरा पेरणी झाल्यास (ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात) २५ ते २८ टक्क्यांनी उत्पादन घटते.
 ज्वारीची पेरणी लवकर म्हणजेच १५ सप्टेंबरच्या अगोदर किंवा १५ ऑक्टोबर नंतर केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. म्हणून ज्वारीची पेरणी  १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत करावी. 
 करडईची पेरणी योग्य वेळी करणे फार महत्त्वाचे आहे. लवकर पेरणी  (सप्टेंबरचा पहिला पंधरवडा) केल्यास पानावरील ठिपके या बुरशीजन्य रोगामुळे नुकसान होते आणि पर्यायाने उत्पादनात घट येते.या उलट उशिरा पेरणी केल्यास (ऑक्टोबरचा दुसरा पंधरवडा) पीक वाढीच्या अवस्था थंडीच्या काळात आल्यामुळे माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि उत्पादनात घट येते. करडईची पेरणी सप्टेंबरचा दुसरा पंधरवडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.
 हरभऱ्याची पेरणी २५ सप्टेंबर नंतर जमिनीतील ओल कमी होण्यापूर्वी करावी.
 सूर्यफुलाची पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात  करावी.

जमिनीची निवड
 ज्वारी,सूर्यफूल,करडई आणि हरभरा  या पिकांसाठीसाठी मध्यम ते भारी(खोल),उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. हरभरा पिकास हलकी अथवा भरड,पाणथळ,चोपण किंवा क्षारयुक्त जमीन लागवडीसाठी निवडू नये.

पेरणीचे अंतर व बियाणे  
 योग्य अंतरावर पेरणी केली नाही तर तणांचा प्रादुर्भाव वाढतो आणि आंतरमशागतीस अडचणी निर्माण होतात. पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. बी जास्त खोलवर पडणार नाही, खूप  दाट पडणार नाही याची काळजी घ्यावी.   
 ज्वारी पेरणी ४५  x १५-२० सें.मी  अंतरावर  करावी. हेक्टरी १० ते १२ किलो बियाणे वापरावे.
 करडई पेरणी ४५ x २० सें.मी अंतरावर करावी. हेक्टरी १० ते १२ किलो बियाणे वापरावे.
 मध्यम जमिनीत सूर्यफुलाचे पेरणी  ४५ x ३० सें.मी अंतरावर आणि भारी जमिनीत ६० x ३० सें.मी अंतरावर करावी. हेक्टरी ८  ते १० किलो बियाणे वापरावे. 
 हरभरा पेरणी ३० x १० सें.मी अंतरावर करावी. जाती परत्वे ७० ते १०० किलो बियाणे वापरावे. 

जातींची निवड 
अवर्षण प्रवण भागात अवर्षणाचा कालावधी लहान-मोठा नेहमीच असतो,म्हणूनच अवर्षणाचा ताण सहन करू शकणाऱ्या, कमीत कमी कालावधीत येणाऱ्या जातींची निवड करावी. 

रब्बी ज्वारी 
 हलकी जमीन (खोली ३० सें.मी पर्यंत) -  फुले अनुराधा, फुले माऊली       मध्यम जमीन (६० सें.मी.पर्यंत) - फुले सुचित्रा,फुले चित्रा, फुले माऊली, परभणी मोती, मालदांडी३५-१
 भारी जमीन (६० सें.मी.पेक्षा जास्त ) - फुले वसुधा, फुले यशोदा, सीएसव्ही-२२, पीकेव्ही-क्रांती,  परभणी मोती. संकरित जाती-सीएसएच १५, सीएसएच १९.
 करडई - एस एस एफ ७०८, फुले करडई-७३३, फुले चंद्रभागा(एस एस एफ-७४८)                                                      
 हरभरा - विजय, आणि दिग्विजय या जाती  मर रोग प्रतिकारक्षम असून जिरायती,बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य.
 सूर्यफूल - फुले भास्कर, भानू  

- डॉ.आदिनाथ ताकटे,९४०४०३२३८९,  (मृद शास्त्रज्ञ,एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com