शेतकऱ्यांना फसवणाऱ्या टोळक्यात मीही सामील झालो: राजू शेट्टी

रमेश जाधव
गुरुवार, 25 मे 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडेंच्या मध्यस्थीने आमची अहमदाबादमध्ये भेट झाली. काँग्रेसच्या घोटाळेबाज कारभारापासून जनतेची सुटका करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ द्यावी, असं आवाहन मोदींनी केलं. त्यावर स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय दुष्काळ निवारण आयोगाची स्थापना करावी आणि कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता द्यावी, या तीन मागण्या मान्य असतील तरच पाठिंबा देऊ, अशी भूमिका मी मांडली. त्यावर प्रदीर्घ चर्चा होऊन मोदींनी या मागण्यांविषयी सहमती दाखवली; परंतु आज तीन वर्षे झाली तरीही यातली एकही मागणी पूर्ण झालेली नाही.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा करणाऱ्या मोदी सरकारच्या काळात प्रत्यक्षात शेतकऱ्यांचं कर्ज दुप्पट झालं. मी शेतकऱ्यांना मोदी आणि भाजपची साथ द्यायला लावली, त्याबद्दल माझ्या मनात अपराधी भावना आहे. मी निघालो होतो देवाच्या आळंदीला; पण पोचलो चोराच्या आळंदीला. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळक्यात मीही सामील झालो, मीसुद्धा दोषी आहे. त्याबद्दल मी महात्मा फुले यांची माफी मागितली आणि त्याचं प्रायश्चित घेण्यासाठीच हा आत्मक्लेश सुरू केला आहे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सरकारविषयीची नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर आत्मक्लेश यात्रा संपल्यानंतर सरकारबरोबर राहायचे की नाही याचाही निर्णय करू, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. 

श्री. शेट्टी यांनी २२ एप्रिलपासून पुण्यातून आत्मक्लेश पदयात्रा सुरू केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा या यात्रेचा प्रमुख मुद्दा आहे. त्यासंदर्भात शेट्टी यांच्याशी ‘सकाळ-अॅग्रोवन'ने साधलेला हा संवाद. 

प्रश्न : आत्मक्लेश नेमका कशासाठी? फुलेवाड्यातून आत्मक्लेश यात्रा सुरू करताना तुम्ही म. फुलेंची माफी मागितली, ती कशासाठी? 
राजू शेट्टी : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडेंच्या मध्यस्थीने आमची अहमदाबादमध्ये भेट झाली. काँग्रेसच्या घोटाळेबाज कारभारापासून जनतेची सुटका करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ द्यावी, असं आवाहन मोदींनी केलं. त्यावर स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय दुष्काळ निवारण आयोगाची स्थापना करावी आणि कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता द्यावी, या तीन मागण्या मान्य असतील तरच पाठिंबा देऊ, अशी भूमिका मी मांडली. त्यावर प्रदीर्घ चर्चा होऊन मोदींनी या मागण्यांविषयी सहमती दाखवली; परंतु आज तीन वर्षे झाली तरीही यातली एकही मागणी पूर्ण झालेली नाही. या मुद्यांवर मी पंतप्रधानांकडे वारंवार पाठपुरावा केला. तसेच संसदीय आयुधे वापरून सभागृहातही हे मुद्दे मांडले; परंतु हे प्रश्न सुटत नाहीत. मोदींना एक तर शेतीचे हे प्रश्नच कळाले नाहीत किंवा ते जाणूनबुजून खोटं बोलले, एवढाच अर्थ निघतो. 

प्रश्न : तुम्ही शेतकऱ्यांना मोदी आणि भाजपच्या दावणीला बांधलं, म्हणून तुम्ही प्रायश्चित्त घेताय...पण तुम्ही ती दावण मात्र सोडून देत नाही. असं का? खरं तर सत्ता सोडणं हाच खरा आत्मक्लेश ठरला असता. मग तुम्ही अजून सत्तेला चिटकून का राहताय? 
राजू शेट्टी:
आत्मक्लेश पदयात्रेच्यादरम्यान आम्ही या सगळ्या मुद्यांवर विचारमंथन, आत्मपरीक्षण करणार आहोत. हा आत्मक्लेश पूर्ण तर होऊ द्या. सत्तेत राहायचं की नाही, याचाही निर्णय घेऊ. 

प्रश्न : राजू शेट्टींचं खरं दुखणं वेगळंच आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय. तुमची त्यावर काय प्रतिक्रिया आहे? 
राजू शेट्टी: हे दुखणं काय आहे, ते सांगावं ना मुख्यमंत्र्यांनी. माझं मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान आहे, की त्यांनी या विषयाचा खुलासा करावा. नुसतं मोघम बोलू नये. मी त्यांच्याकडे कोणती फाइल घेऊन गेलो का, कोणत्या बिल्डरसाठी त्यांचे उंबरठे झिजवले का, कोणत्या प्रस्तावासाठी आग्रह धरला का, काही मागण्या केल्या का याचं स्पष्ट उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं. विनाकारण डिवचायचे हे उद्योग आहेत. त्यात काही तथ्य नाही. 

प्रश्न : मुख्यमंत्री कर्जमाफी आणि कर्जमुक्ती असा शब्दच्छल करतायत का? 
राजू शेट्टी: प्रश्नच नाही! ते शब्दच्छलच करतायेत. शेतकऱ्यांची लूट हे सरकारचं अधिकृत धोरण आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाइतकाही भाव मिळू द्यायचा नाही, हे धोरण राबवून आतापर्यंतच्या सरकारांनी शेतकऱ्यांची जी लूट केली, त्याचा एकत्रित आकडा काढला तर तो शेतकऱ्यांवर असलेल्या कर्जापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरचं कर्ज अनैतिक आहे. उलट सरकारच शेतकऱ्यांना देणं लागतं. म्हणून कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती करावी, अशी आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री केवळ शब्दच्छल करून विषय भरकटवत आहेत. शेतकऱ्यांवरच्या अनैतिक कर्जाचं पितृत्व सरकार स्वीकारणार की नाही, याचं उत्तर त्यांनी द्यावं. यंदा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरातील तूर उत्पादक शेतकऱ्यांचं २ लाख ९३ हजार कोटी रुपयांचं नुकसान झालंय. कांद्याचं एक लाख कोटीचं नुकसान झाले आहे. सगळ्या प्रमुख पिकांमध्ये हे असं नुकसान आहे. जे नुकसान झालंय, तेवढं शेतकऱ्यांवर कर्ज आहे का? कर्जाची रक्कम नुकसानीच्या तुलनेत छोटी आहे. सरकारच्या धोरणांमुळे शेतीधंदा कायम तोट्यात राहतो, तो फायद्याचा होत नाही, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. 

प्रश्न : तुम्ही आत्मक्लेश यात्रा जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तुमच्याशी संपर्क साधला का? 
राजू शेट्टी: नाही. मुख्यमंत्र्यांना सध्या अभ्यासातून वेळ मिळत नसेल बहुधा. 

प्रश्न : सध्या मुख्यमंत्र्यांशी तुमचे संबंध कसे आहेत? 
राजू शेट्टी: मी सध्या सगळे संबंध तोडून टाकलेत. आत्मक्लेश करतोय. 

प्रश्न : तुमच्या आंदोलनाची आगामी दिशा काय आहे? 
राजू शेट्टी: आत्मक्लेश यात्रेतल्या चर्चा, विचारविनिमयानंतर पुढची स्ट्रॅटेजी जाहीर करू. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, ही मागणी तडीस लावण्यासाठी आंदोलन आणखी तीव्र करू. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक संघटना यात्रा काढत आहेत. त्यांची मोट बांधायचं कामही हळूहळू सुरू होईल, तसेच देशपातळीवर शेतकऱ्यांचा प्रभावी दबावगट निर्माण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. देशभरातील समविचारी लोकांशी माझी त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.

Web Title: Raju Shetty interview on BJP, Narendra Modi and Devendra Fadnavis