प्रशिक्षण, सुधारित तंत्रातून बदलली पीकपद्धती

विनोद इंगोले
रविवार, 8 जानेवारी 2017

शिवणी बांध (ता. साकोली, जि. भंडारा) येथील रंजना रमेश झोडे यांनी पतीच्या नोकरीमुळे शेती नियोजनात पुढाकार घेतला. धानपट्ट्यात भाजीपाला पिकाच्या माध्यमातून फेरपालटीचे चक्र बसविले. शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे.

साकोलीपासून अकरा किलोमीटर अंतरावरील शिवणी बांध हे झोडे कुटुंबीयांचे मूळ गाव. या गावालगत त्यांची शेती आहे. झोडे कुटुंबीयांनी वडिलोपार्जित अकरा एकर शेतीत भर घालीत हे क्षेत्र अठरा एकरांवर नेले आहे. रमेश झोडे हे शासकीय नोकरीत आहेत. त्यामुळे शेतीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी रमेश यांच्या पत्नी रंजनाताईंवर आली. कौटुंबिक जबाबदारी पार पाडत शेतीमध्ये रंजनाताईंनी आपले वेगळेपण जपले.

पूर्व विदर्भातील काही जिल्हे हमखास पावसाचे जिल्हे असले, तरी काही भागांत पाणीटंचाईचे चटके सोसावे लागतात. त्यामध्ये शिवणी बांध गावाचाही समावेश आहे. अठरा एकर शेतीतील पिकाची पाण्याची गरज भागविता यावी, याकरिता रंजनाताईंच्या शिवारात दोन विहिरी आहेत. परंतु उन्हाळ्यात विहिरी तळ गाठत असल्याने विहिरीत त्यांनी कूपनलिका घेतली. चार एकर शेतीला ठिबक सिंचन करून काटेकोर पाण्याचा वापर सुरू केला. रंजनाताई पीक व्यवस्थापन करताना साकोली येथील कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. उषा डोंगरवार यांचे मार्गदर्शन घेतात. तसेच शेतीविषयक प्रशिक्षणात सहभागी होऊन सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

भाजीपाला लागवडीवर भर ः
पीकबदलाबाबत रंजनाताई म्हणाल्या, की धान पीकपद्धती ही भंडारा जिल्ह्याची ओळख. त्यामुळे आम्हीदेखील धान लागवड करतो. परंतु पारंपरिक धान लागवडीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे धान लागवडीखालील क्षेत्र कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पर्यायी पिकांचा शोध सुरू केला. यातून भाजीपाला लागवड फायदेशीर होईल, असे लक्षात आले. भाजीपाल्यास बारमाही मागणी असते, काही वेळा दर कमी जास्त होतात परंतु ठराविक महिन्यानंतर भाजीपाल्यातून पैसे मिळत राहतात. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून भाजीपाला लागवडीवर भर दिला आहे. सुरवातीला एक एकरावर आम्ही वांगी लागवड केली. साकोली बाजारपेठेत वांग्याची विक्री केली. त्यातूनच चांगले उत्पन्न मिळाल्याने भाजीपाला लागवड क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला. आज माझ्याकडील भाजीपाला लागवडीचे क्षेत्र सात एकरांवर पोचले आहे.

सध्याच्या पीक लागवडीबाबत रंजनाताई म्हणाल्या, की मी यंदा आॅगस्ट महिन्यात एक एकरावर कारली लागवड केली होती. सुधारित पद्धतीने लागवडीचे नियोजन केले. पाच फूट बाय दोन फूट अंतराने लागवड केली. पाणीबचतीसाठी अाच्छादनाचा वापर केला. लागवड करताना शेणखत आणि कोंबडीखत जमिनीत मिसळून दिले. त्याचबरोबरीने १०ः२६ः२६ हे खत दिले होते. त्यानंतर पीक वाढीच्या टप्यानुसार शिफारशीत विद्राव्य खतांची मात्रा ठिबकद्वारे दिली. दर्जेदार उत्पादनासाठी तज्ज्ञांच्या सल्यानुसार एकात्मिक खत व्यवस्थापन, कीड, रोग नियंत्रणावर भर दिला. कारल्याचे मला एकरी आठ टन उत्पादन मिळाले. विक्री नागपूर बाजारपेठेत केली. प्रतिकिलो १५ ते ३० असा दर मला मिळाला. जमिनीची मशागत, आच्छादन पेपर, बांबू, तारकाठी, फवारणी, मजुरी यासाठी खर्च जास्त प्रमाणात झाला. मासे पकडण्याची जुनी जाळी विकत घेऊन कारल्याच्या वेलीस आधार देण्यासाठी वापर केला. सुधारित तंत्राचा अवलंब केल्याने दर्जेदार उत्पादन मिळाले. पीक व्यवस्थापन खर्च वजा जाता मला कारले पिकातून दीड लाख रुपये नफा मिळाला.

दर वर्षी आॅगस्ट महिन्यात काकडीची वीस गुंठ्यांवर लागवड असते. सुधारित पद्धतीने लागवडीचे नियोजन केले जाते. या पिकासाठी मला सरासरी दहा हजार रुपये व्यवस्थापनाचा खर्च आला. वीस गुंठ्यांतून मला सहा टन उत्पादन मिळाले. नागपूर बाजारात १५ रुपये किलो या घाऊक दरात काकडीची विक्री केली. याचबरोबरीने खरिपात ३० गुंठ्यांवर ढेमसे या पिकाची लागवड असते. या पिकाच्या व्यवस्थापनाचा खर्च बारा हजारांचा होतो. याची विक्री नागपूर बाजारपेठेत केली जाते. कारली, काकडी या पिकांतून चांगले आर्थिक उत्पादन मिळते. सध्या पाच एकरांवर कोहळ्याची लागवड केली आहे. या पिकालाही चांगली बाजारपेठ आहे.

पशुपालनाची जोड ः
रंजनाताईंनी शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. सध्या त्यांच्या गोठ्यात चार जर्सी गायी आहेत. त्यांचा दुग्ध व्यवसाय वाढविण्याचा विचार होता, परंतु मजुरांच्या समस्येमुळे गायींची संख्या मर्यादित ठेवली आहे. मात्र घरापुरते दूध आणि शेतीसाठी पुरेशा प्रमाणात त्यांना शेणखताची उपलब्धता होते.

धानशेतीमध्येही सुधारणा ः
रंजनाताई दर वर्षी बारा एकरांवर कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने धानाची सुधारित पद्धतीने लागवड करतात. याबाबत त्या म्हणाल्या, की बाजारपेठेचा विचार करून वेगवेगळ्या चार जातींच्या लागवडीसाठी निवड करतो. दोन एकर क्षेत्रावरील धानाचे सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन केले जाते. यासाठी सेंद्रिय खते, कीडनाशकांचा वापर करतो. आम्हाला सरासरी एकरी १८ क्‍विंटलपर्यंत भात उत्पादन मिळते. एकरी सरासरी बारा हजार रुपयांचा खर्च होतो. गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे दरही चांगला मिळतो. आम्ही धानाच्या बांधावर तूर लागवडही करतो. उत्पादित तुरीचा वापर घरच्या वापरासाठी होतो.

रंजनाताईंची शेतीमधील वाटचाल दिशादर्शक आहे. येत्या काळात त्यांनी सीताफळ आणि डाळिंब बागेचे नियोजन केले आहे. याचबरोबरीने संरक्षित शेतीच्या दृष्टीने त्यांनी शेडनेट हाउस प्रशिक्षणही पूर्ण केले आहे. पारंपरिक शेतीकडून सुधारित आणि संरक्षित शेतीकडे त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे.

संपर्क ः रंजना झोडे ः ९४०५५१३९०१

Web Title: ranjana zode's success story