यंदा भात, सोयाबीन, ऊस लागवडीवर भर देणार

संदीप नवले
सोमवार, 28 मे 2018

पुणे - जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यातील पश्‍चिम पट्यात भात रोपवाटिकांची तयारी, पूर्व पट्यात शेताच्या नांगरटी सुरू आहेत. यंदा भात, सोयाबीन आणि ऊस लागवडीवर भर देण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या आर्थिक अडचणी भेडसावत आहेत. त्यामुळे पीककर्ज घेऊन खरिपाचे नियोजन करावे लागणार असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

पुणे - जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. सध्या जिल्ह्यातील पश्‍चिम पट्यात भात रोपवाटिकांची तयारी, पूर्व पट्यात शेताच्या नांगरटी सुरू आहेत. यंदा भात, सोयाबीन आणि ऊस लागवडीवर भर देण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या आर्थिक अडचणी भेडसावत आहेत. त्यामुळे पीककर्ज घेऊन खरिपाचे नियोजन करावे लागणार असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

गेल्या वर्षी वेळेवर पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात पेरण्यादेखील वेळेवर झाल्या होत्या. भात पट्यात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काही प्रमाणात उत्पादनात घट झाली होती. पूर्व पट्ट्यातील शिरूर, बारामती, पुरंदर, दौंड, इंदापूर तालुक्‍यांत सुरवातीला पावसाने काही प्रमाणात ओढ दिली होती. मात्र, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला. त्यामुळे उत्पादनात चांगली वाढ झाली. आता मॉन्सून दाखल होण्यासाठी काही दिवस बाकी असल्याने खरिपाची जोरदार तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. भात पट्ट्यात अनेक ठिकाणी शेत भाजणीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी नांगरटीची, तर काही ठिकाणी भात रोपवाटिका टाकण्याची कामे सुरू झाली आहे. 

पुणे जिल्ह्यात खरिपाची तयारी सुरू झाली असताना शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत निविष्ठांचा पुरवठा मात्र संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. सध्या भात पट्ट्यात भात बियाणाचा ५० तर सोयाबीन बियाणाचा २० ते ३० टक्के पुरवठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणांचा तुटवडा भासत असून खरेदी करताना अडचणी येत आहेत. कृषी विभागाकडून वेळेवर पुरवठा झाला नाही तर शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडेल अशी स्थिती आहे.    

अर्थिक अडचणींची शक्‍यता
शासनाने कर्ज माफी दिल्यामुळे जिल्ह्यात अजूनही पीककर्जाची प्रक्रिया सुरळीत झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात आर्थिक अडचणी येण्याची शक्‍यता आहे. त्यातच बॅंकेने पीककर्ज वसुलीसाठी नोटिसा काढल्या असल्याने शेतकरी द्विधा मनःस्थितीत आहेत. जुन्नर, आंबेगाव भागांत शेतकऱ्यांना पीककर्ज दिले जात असले तरी त्यासाठी कालावधीत पुन्हा कर्ज भरण्याच्या सूचना देण्यात येत आहे. 

जुन्नर तालुक्‍यातील बल्लाळवाडी येथील हर्षल आहेर म्हणाले, की माझ्याकडे एकूण पाच ते सहा एकर शेती आहे. पावसाचा अंदाज चांगला असल्यामुळे मशागतीची कामे सुरू आहेत. खरिपात सोयाबीनची तीन एकरांवर, झेंडूची एक एकरावर तर टोमॅटोची दोन एकरांवर लागवड करणार आहे. पाण्यासाठी एक विहीर आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई भासते. गेल्यावर्षी ‘जलयुक्त’ची कामे झाल्याने यंदा बऱ्यापैकी पाणी उपलब्ध आहे. आर्थिक अडचणी आहेत. त्यामुळे पीककर्ज घेऊन खरिपाचे नियोजन करावे लागणार आहे. पीककर्ज मंजूर झाले आहे. परंतु अद्याप पीककर्ज घेतलेले नाही. साधारणपणे एक लाख रुपयांपर्यंत पीककर्ज घेणार आहे. गेल्यावर्षी खरीप हंगाम बऱ्यापैकी गेला होता. परंतु यंदा शेतीमालास असलेल्या कमी दरामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

माझी एकूण आठ ते दहा एकर शेती आहे. सध्या शेतात नांगरणी सुरू आहे. खरिपात भात लागवडीवर भर देणार आहे. येत्या चार ते पाच दिवसांत भात लागवडीसाठी रोपवाटिका टाकणार आहे. त्यासाठी चांगले बियाणे मिळाले तर त्याचा वापर करणार अन्यथा घरेचच बियाणे वापरणार आहे. 
- नीलेश शिंदे, पिंपळोली, ता. मुळशी, जि. पुणे. 

चार ते पाच एकरांवर शेवंतीची लागवड करणार आहे. त्याचबरोबर उसाचीही लागवड करणार आहे. सध्या उसासाठी मशागतीची कामे सुरू असून शेवंतीची लागवड येत्या आठ दिवसांत करणार आहे. 
- भाऊसाहेब दोरगे, यवत, ता. दौंड, जि. पुणे.

Web Title: rice soybean sugarcane planting