sakal news agro news Akash chatake blog
sakal news agro news Akash chatake blog

कहो दिल से, ८६०३२ फिरसे !!

ज्वारी झाली
तूर झाली
गहू हरभरा झाला
कांदा लसूण झाला
टमाटी मिरची वांगी झाली
मका झाली
शेंगा झाल्या
हातात घंटा
आता.. कहो दिल से, ८६०३२ फिरसे !!
....
 
८६०३२ काय आहे?
पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र आणि कोईमतूर संशोधन केंद्र याच्या एकत्रित प्रयत्नांनी २००० साली हा उसाचा वाण / जात डेव्हलप करण्यात आली. PZ झोन म्हणजे पेनिनसुलार झोन म्हणजे द्वीपकल्पिय प्रदेशात म्हणजे नदी तलावांनी गुरफटलेल्या भूपृष्टावर लागवडीसाठी कमी पाण्यावर चांगला रिझल्ट देणारी, जास्त रिकव्हरी ची आणि कमी कार्यकाळ असणारी व्हरायटी आहे ही. छत्तीसगड गुजरात कर्नाटक केरळ महाराष्ट्र आंध्र आणि तामिळनाडू च्या पठारी भागाला PZ झोन मध्ये विभागलं आहे आणि तिथे हे बियाणं चालतं म्हणजे उत्तम रिझल्ट मिळतात.
ऊसाच्या उपलब्ध सर्व जातींमध्ये ८६०३२ च्या रसात सुक्रोज चं प्रमाण सर्वात जास्त म्हणजे 20.1% आहे, इतर कोणताच वाण 19% पर्यंत सुद्धा पोहोचलेला नाही. त्यामुळं याची रिकव्हरी इतर जातींच्या तुलनेत भरपूर आहे जी कारखान्यांना फायदेशीर आहे, सोबत कमी पाण्यात जास्त उतार देणारं वाण त्यामुळं शेतकऱ्याच्याही फायद्याचं आहे. संशोधन करून कमी कार्यकाळात, कमी पाण्यावर येणारा सुधारित वाण विकसित केला जात होता आणि आहे, मायक्रो सिंचन ते डायरेक्ट रोपांची लागवड या गोष्टी दुष्काळी भागात फड फुलवायला मदत करतायत.
 
कमाल 315 टन हेक्टरी यील्ड कपॅसिटी आहे याची आयडीयल कंडिशन ला, म्हणजे उत्तम जोपासना "पुरेसं मुबलक पाणी" वेळेवर खतं फवारण्या वगैरे. तथापि सरासरी ५०/६० टनाचा उतार सामान्य शेतकऱ्याला मिळतोच मिळतो. हक्काच्या पाण्याच्या आणि विजेचा नरडा दाबून मायबाप सरकार सगळंच बरबाद करतं. तरी हा वाण तारतो, पाण्याला आबदा झाली तरीही.
 
तूरीचे हाल बघतोय, तूर किंवा इतर सर्व पिके पाठीवर घेऊन फिरावं लागतं श्वास संपेपर्यंत.

आजची FRP ही काढली जाते २०००-२५०० , जीच्यातून फार फार तर एकरी २०-२५ हजार जगायला शिल्लक राहतात. सरासरी क्षेत्र प्रत्येकी(कुटुंबाला) आता ३-४ एकर राहिलेलं आहे, ज्यात सरकारी पाणी-वीज धोरण कृपेने १२०-२०० टन एवढच एव्हजरेज उत्पन्न निघतं, २००० भाव मिळालाच तर ३-४ लाख बिल निघतं, त्यातला १.५ ते २ लाख खर्च केलेला असतो पिकावर, कर्ज काढून. वार्षिक शिल्लक म्हणण्यापेक्षा पुढचं पूर्ण दीड वर्ष घर चालवायला आणि पुन्हा मातीत इन्व्हेस्ट करायला शिल्लक राहिलेले असतात १.५ ते २लाख म्हणजे महिना १० ते १५ हजार मारामार करून. त्यात राबलेले घरातले ५ लोक असतात किमान, म्हणजे प्रत्येकी महिना २००० रुपये सुद्धा मजुरी पडत नाही.
 
तरीही इतर पिकात पूर्ण बरबाद होतो शेतकरी, लयाला लागतो त्या मानाने ऊस जगायला आधार देतो.
....
 
तुळशीच्या लग्नाला फिरू फिरून कुठं स्वस्त मिळतंय बघून ऊस विकत आणणारे ऊसबागायती चं व्यवस्थापन ते ऊसाचे तोटे यावर भाषण देतेयत, ऊस उत्पादक हा व्हिलन ठरवला गेला आहे.
 
“म्हणजे समजा तुम्ही पत्रकार अधिकारी तलाठी कलेक्टर शिक्षक प्राध्यापक
सी.ए. डॉक्टर फोटोग्राफर इंजिनिअर कामगार उद्योजक कन्सल्टंट वकील विचारक समाजशेवक लेखक कलाकार राजकारणी वगैरे वगैरे वगैरे वगैरे हायेत.

तुम्हाला तुमच्या ऑफिसात प्लांट वर स्टुडिओत शाळेत कॉलेजात घरी क्लिनिक चेंबर फर्म पक्ष कार्यालय वगैरे मध्ये यिऊन कुणी सांगितलं,

‘पत्रकारिता नासलीय ती सोड
कंपनी मधलं केमिकल धोकादायक आहे पर्यावरणाला जॉब सोड
डॉक्टरकी खुनी झालीय बंद कर प्रॅक्टिस
शिक्षण प्रशासन क्षेत्र पैशानं बरबटलंय राजीनामा दे
कुणीही फोटो काढायलंय फोटोग्राफी सोड
फिल्म लाईन वासानेनं अनीतीनं बरबटलीय एक्टिंग डायरेक्शन वगैरे सोड
न्याय अन्याय भ्रम आहे वकिली सोड
समाजसेवा करून गल्ला भरायले समाजसेवा सोड
राजकारण गटार आहे राजकारण सोड
असं सगळं तुम्हाला कोण म्हणलं तर तुम्ही पायातलं काढून हाणाल का नाही??’

मग ऊस पिकवू नका म्हणणाऱ्यांचं आम्ही काय करावं??
 
“बियाणं खतं ड्रीप लाईट फवारण्या औषधं मजुरी हे काहीच उधरीवार नसतं. सर्व प्रोसेस मध्ये शेतकरी त्या मजुरांना, त्या खताच्या दुकानदारांना, ट्रान्सपोर्ट वाल्याला, आडत्याला, व्यापाराला, ठिबक वाल्याला पोसतो. हो पोसतो. एक शेतकरी मेला कि या सर्वांच एक गिर्हाईक कायमचं जातं. हे आज नाही आणखी १० वर्षांनी शेतकरी म्युझियम मध्ये दाखवावा लागेल तेव्हा लक्षात येयील, फार दूर नाही काळ. (सेंद्रिय शेती करा वगैरे जोक सांगणाऱ्याने पिकवून खावं, हे सल्ले देऊ नयेत.)
 
“जो शेतकरी परवा मार्केट मध्ये येऊन गेला तो काल नव्हता, कालचा उद्या असणार नाही. राहिलेला माल शेतात सडवला गेला पण मार्केट चा रस्ता पुन्हा कोणी पकडला नाही या उपर येणाऱ्या वर्षात या पिकांचा भाव कितीही चढला तरी एवढा खर्च करून तो पिकवायची हिम्मत शेतकरी करणार नाही. एक एक शेतकरी बरबाद होऊन आयुष्यातून उठतोय.
 
ऊस पिकवनं बंद करा हे नोकरी सोडा म्हणण्यासारखं आहे.
एक व्यक्ती दिवसभरात टॉयलेट मध्ये जेवढं पाणी फ्लश करते तेवढ्या पाण्यात गुंठाभर रान पाणी पिऊन होतं ..
हिशोब द्यायचाच झाला तर..
....
 
प्रत्येक शेतकऱ्याला एक तारणारं पीक प्रत्येक ठिकाणी असतं, कापूस सोयाबीन तूर डाळिंब त्यातलीच.
दुष्काळाचं कारण देऊन सरकार ने 5 लाख टन कच्च्या साखरेच्याआयातीवरचा असणारं ४०% आयातशुल्क हे शून्य % केलेलं आहेआणि हे नवीन आयातधोरण ऊस उत्पादकांना सर्वांसोबत नुकसानीत नेऊन उभं करणार आहे. हेच तुरीच्या बाबतीत केलं गेलंय, हेच गव्हाच्या बाबतीत केलं गेलं !
.....
साखर कारखाने नव्हते तेव्हाही पर्यायी गुळ आणि इतर बायप्रोकडक्ट होतेच.
मिनी शुगर प्लांट ते इथेनॉल प्लांट हा समूहाने मिळून करायचा डाव आहे आता.
ऊस पगार आहे,
हमी आहे जगण्याची.
सगळं मातीत गेलं तरी ऊस तारतो.
५-५० हजार जगायला राहतात.
आणि तो हक्क कोणताच कृषी भूषण असुद्या किंवा कृषितद्न्य पाणीतद्न्य समाजसेवक विचारवंत वगैरे काढून घेऊ शकत नाही.
आज मी आत्महत्या करत नाही किंवा माझ्या घरादारावर वेळ आली नाही ती उसामुळे.
आमची घरं चालवायची हमी आहे ती
योग्य अयोग्य वाद पोटापुढे अस्तित्वापुढे गौण आहे.
कोणी काय नोकरी करावी हे आम्ही कधी सांगितलं नाही त्यामुळं काय पिकवावं हे ऐकून घेऊ शकत नाही. ज्याला वाटतं ऊस नसावा त्याने ऊसाएवढं उत्पन्न माझ्या अकाउंट वर जमा करावं आणि मग चर्चेला यावं.
पोट भरतं हो ऊसाने शेतकऱ्याचं. 
अंग झाकायला घरा दाराला कापड मिळतं.
ते मिळवुन द्यायची हमी द्या,
पेटवून देतो बागायत कायमची.

आज मी इंटरनेट वापरू शकतो
अफोर्ड करू शकतो
शिकलो शिक्षण अफोर्ड केलं
मागची पिढी शिकली 
पुढचीही शिकेल जगेल तगेलं
कशामुळं??
ऊस , बागायत आणि सहकार .
पोट भरलंय माझं म्हणून मी मान ताठ करुन डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो, जर ऊस नसता तर माझ्या त्या अगणित पिढ्यांसारखा खाली मान घालून काम करत राहिलो असतो पोटासाठी.
मी वर केलेली मान सलतेय तुम्हाला, कळतंय मला.
माझ्या मागच्या पिढीनं सुखानं टेकवलेली पाठ सलतेय तुम्हाला, कळतंय मला.
अरं ७५ वर्षाचा म्हातारा रात्रपाळीत पोरासंग दारं धरतो ते मजा म्हणून?
कष्ट नाहीत?
माणूस म्हणून मला माझ्या पिढ्याना मान्यता मिळाली ऊसामुळं.
तुम्ही पर्याय शोधताय मला आणि माझ्या देशभर उसात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राबणाऱ्या प्रत्येक बांधवाला पुन्हा गुलाम बनवण्याचा.
विचार उपाशी पोटी येत नसतात लोकहो.
त्यामुळं उपाशी राहायचं दुःख विचारावंत समजू शकत नाहीत किंवा रोगर ची चव सुद्धा.
ऊसावर चर्चेच्या नावाखाली माझ्या घशात रोगर घालायचा डाव आखू नका. 
पचवू शकतो तेही.
.....
ती म्हणली ऊस गोड कसा होतो..
तिला म्हणलं कर्ज काढून उधार उसनवारी करून
लेकाराबाळाच्या हट्टाचा गळा दाबून
हि 3200-3600 रुपये क्विंटल ची युरिया नावाची कित्येक क्विंटल तुरट साखर ऊसात,
लाख-लाख रुपयाच्या कैक लिक्विड डोसासोबत फॉस्फेस्ट 10-26-26 सोबत मिळून टाकली,
की त्या मेलेल्या मारलेल्या भावनांचं मिश्रण होतं,
अन मग त्या बांबूच्या आत्म्याला ऊस हुण्यापुरती गोडी चढते.. 
पेरलेल्या स्वप्नांची..
त्याच्या स्वाभिमानाची..
तिच्या नवसाची..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com