शेतीला शास्त्रीय ज्ञानासह विक्री कौशल्याची जोड

शेतीला शास्त्रीय ज्ञानासह विक्री कौशल्याची जोड

शहरात भाजीपाला महाग मिळत असला तरी शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळत नाही. शेती म्हणजे नुसता बेभरवशाचा धंदा असे सर्वच म्हणत असतात. मात्र, शेतीला शास्त्रीय ज्ञानाची जोड व विक्रीसाठी अर्थशास्त्राची जोड दिली तर नोकरीसाठी शहरांकडे धाव घेण्याची गरज नाही, हे नगर जिल्ह्यातील पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथील सचिन काशिनाथ लोखंडे ह्या तरुणाने दाखवून दिले आहे. 

सचिन लोखंडे यांने २०१४ मध्ये रसायन शास्त्रातील पदवी घेतल्यानंतर गोव्यातील एका नामांकित औषधनिर्मिती कंपनीमध्ये नोकरी सुरू केली. प्रतिमाह १४,५०० रु. पगाराच्या या नोकरीला चिकटून शहरात स्थायिक होण्याचा सरळ सोपा मार्ग सचिनही निवडू शकला असता. पण, त्याला रोज एकच काम करताना नोकरीतील स्पर्धा व राजकारण यांचा लवकरच वीट आला. आपल्या वडिलोपार्जित ६.५ एकर  शेतीतच आपल्या शिक्षणाचा उपयोग करण्याचा विचार त्याच्या मनात सुरू झाला. एका बाजूला दरमहा ठरावीक रक्कम बिनधास्त देणारी नोकरी आणि बेभरवशाची शेती यातून निवड करायची होती. याच वेळी सचिनला विज्ञान आश्रम (पाबळ) येथील आधुनिक शेती आणि शेती पूरक-व्यवसाय करू इच्छिणाऱ्यां ग्रामीण युवकांसाठी ‘उद्योजकता विकास शिष्यवृत्ती’ योजनेची माहिती मिळाली. त्याने विज्ञान आश्रमातील माती परीक्षण लॅबमध्ये काम सुरू केले. ६०० शेतकऱ्यांच्या मातीचे नमुने तपासले, त्यांची पीक पद्धती जाणून घेतली. शेती-पशुपालन विभागात १०० पेक्षा अधिक मुलांना आधुनिक शेतीचे धडेही दिले. विज्ञान आश्रमातील हा दोन वर्षांचा अनुभव त्यांच्या घरची शेती व्यावसायिक करताना खूप मोलाचा ठरला. २०१७ मध्ये पूर्ण वेळ शेती करण्याच्या हेतूने सचिन मूळ गावी पारगाव सुद्रिक येथे परतला. 

सर्वात प्रथम सचिनने शेतासाठी वर्षभर पुरेल असे पाण्याचे नियोजन केले. त्यासाठी ४० लाख लिटर क्षमतेचे शेततळे आणि ठिबक सिंचनाची सोय केली. शाश्वत पाण्याची सोय होताच, लिंबबागेचे शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन सुरू केले. उन्हाळ्यातील बहरासाठी खत आणि पाणी व्यवस्थापन करत बागेतील झाडांच्या संख्येत दुपटीने वाढ केली. लिंबातून मिळणारे उत्पादन जास्त भरवशाचे असले तरी त्यातून मिळणारा नफा कमी असल्याचे त्याच्या लक्षात आले. मग सचिनने भाजीपाला पिकाकडे मोर्चा वळवला. सर्व प्रथम खर्चाचे नियोजन केले. शेताच्या बांधावरील बांबूच्या साह्याने २ गुंठे क्षेत्रामध्ये रोपवाटिका तयार केली. त्यात लाल भोपळा (डांगर) रोपे तयार केली. या रोपांची लागवड ०७ जुलै २०१८ रोजी शेतात केली. काटेकोरपणे खत व पाण्याचे नियोजन केल्याने १२० दिवसांमध्ये ११.५ टन इतके उत्पादन मिळाले. बाजारात भोपळ्याचे दर अत्यंत कमी मिळत असल्याचे लक्षात येताच स्वतः आठवडी बाजारात विक्री केली. एकूण ८,८३६ रु खर्च वजा-जाता सचिनला ८० हजार ५०० रु निव्वळ नफा मिळाला. या अनुभवाचा फायदा घेत शेतातील लिंबाची विक्रीही ‘शेतकरी ते ग्राहक’ अशी करत सुमारे ८५ हजार रु. अधिक नफा मिळवला. 

नफा अधिक करण्यासाठी खर्च कमी करणे आवश्यक असल्याचे सचिनला जाणवले. विद्राव्य खतांचा वापर केला उत्पादन चांगले मिळत असले तरी खर्चामध्ये मोठी वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले. हा खर्च कमी करण्यासाठी ठिबकद्वारे ‘जीवामृत’ वापरण्यास सुरवात केली. याची सुरवात लिंब बागेपासून केली. जीवामृतामुळे मातीतील सेंद्रिय कर्ब वाढून, उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते. त्याचा पिकांचा अधिक फायदा होते. जीवामृत तयार करण्यासाठी आवश्यक शेण आणि गोमूत्रासाठी दोन गायी विकत घेतल्या. गेल्या वर्षामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतील उत्पादन कमी राहिले असले तरी सचिनने हार मानलेली नाही. येत्या वर्षभरात शेतीला जोड म्हणून सेंद्रिय खतांचे उत्पादन सुर करणे, २० गुंठे क्षेत्रावर व्यावसायिक रोपवाटिका करणे आणि लिंबाबरोबर १.५ एकर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड करण्याचे नियोजन सचिनने केले आहे.  
शेतीत कष्ट व जोखीम अधिक असली तरी शास्त्रीय पद्धतीने करून उत्पादनाची विक्री स्वतः करण्याचे धोरण त्याने ठेवले आहे. यातून नोकरीपेक्षा जास्त समाधान आणि आर्थिक फायदा मिळू शकतो हे सचिन आपल्या ३ वर्षांच्या अनुभवावरून नक्कीच सांगतो.   

 सचिन काशिनाथ लोखंडे, ९५५२९२७९६८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com