आफ्रिकन बोअर शेळी संगोपन व्यावसायिकदृष्ट्या ठरले फायदेशीर  

अभिजित डाके 
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

पलूस (जि. सांगली) येथील सिसाळ कुटुंबाचा शेळी-मेंढीपालन हा तसा मूळचाच व्यवसाय; मात्र हवामानाला अनुकूल व बाजारपेठेतील मागणी यांचा विचार करून नव्या पिढीतील अमर सिसाळ यांनी व्यावसायिक शेळीपालनाला सुरवात केली. आज आफ्रिकन बोअर पद्धतीच्या शेळीपालनातून वर्षाला चांगले उत्पन्न मिळवण्यात अमर यशस्वी झाले आहेत. शिवाय वडिलोपार्जित गावरान शेळ्यांचा व्यवसायही सुरू ठेवून अतिरिक्त उत्पन्न जोडले आहे.

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुका द्राक्ष, ऊस यासह भाजीपाला पिकांसाठी राज्यात प्रसिद्ध असलेला तालुका आहे. याच पलूसमध्ये राहणारे सिसाळ कुटुंब पिढीजात शेळी-मेंढीपालनात आहे.घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताची होती. कुटुंबातील आजच्या पिढीतील अमर यांच्या आजोबांनी आपल्या जिद्दीवर संपूर्ण कुटुंबाची धुरा सांभाळली. शेळीपालनावरच कुटुंबाचा प्रपंच चालायचा. आजही घरचा हा व्यवसाय सुरू आहेच. अमर यांनीदेखील शेळीपालनाचे धडे आजोबांकडूनच घेतले.  
 
भागीदारीत अपयश  
अमर वडील माणिक आणि आजोबा सिद्धू यांच्यासोबत शेळी विक्री-खरेदीसाठी जनावरांच्या बाजारात सातत्याने जायचे. त्यामुळे कोणत्या जातीच्या शेळीला मागणी अधिक आहे. त्यांना दर किती मिळताे यांचे ज्ञान होत गेले; मात्र अजून व्यवसायाची दिशा पक्की होत नव्हती. सन २००९-१० च्या दरम्यान अमर यांनी एका भागीदारास सोबत घेऊन शेळीपालनास सुरवात केली. यामध्ये प्रामुख्याने देशी शेळीचे संगोपन करण्यास सुरवात केली. दोघा मित्रांनी सुमारे तीन वर्षे सुसूत्र पद्धतीने व्यवसाय केला; मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे भागीदारी काही अडचणींमुळे थांबवावी  लागली.
स्वतंत्र व्यवसायाची उभारणी 
 
भागीदारी तर थांबली. आता विचार सुरू झाला, की आपल्याला हाच व्यवसाय पुन्हा उभा करायचा आहे. त्यानुसार नियोजन सुरू केले. जागा अपुरी असल्याने फार्म कुठे उभा करायचा, असा प्रश्‍न उपस्थित झाला. घसमोरची मोकळी जागा निश्चित केली. आता सर्वच गोष्टी पहिल्यापासून सुरवात करण्याची गरज होती. याला वेळ लागणारच होता; परंतु जिद्दीने कामाला सुरवात केली. आफ्रिकन बोअर जातीची शेळी आणली. हळूहळू संख्या वाढवत नेली. अवघ्या सहा महिन्यांच्या काळात पुन्हा नव्या जोमाने व्यवसायाची उभारणी सुरू केली. आधीच्या काळापासून होत असलेल्या व्यवसायाच्या निमित्ताने अनेकांशी संपर्क आला होता. काही शेतकरी शेळ्या घेऊनही गेले होते. मित्रांनीही व्यवसायात साथ दिली. आज चिकाटी ठेवल्यानेच पुढचा पल्ला गाठणे अमर यांना शक्य झाले आहे. 

विक्री व्यवस्थापन 
मुख्यतः पैदासासाठी विक्री. बकरी ईदसाठीही 
नियोजन प्रतिकिलोप्रमाणे 
बोकड- ८०० रुपये, साधारण तीन महिन्यांत वजन सुमारे १५ ते २० किलोपर्यंत होते. त्या वेळी विक्री.
पाटीची विक्री एकहजार रुपये प्रतिकिलोप्रमाणे 
वर्षाला ३५ पर्यंत नगांची विक्री 
गेल्या आठवड्यात चिपळूण येथे १० पाटी आणि सहा बोकड यांची विक्री 
 
आफ्रिकन बोअरची निवड का? 
बाजारात मागणी अधिक, अपेक्षित दर मिळतो. 
काटक जात. या जातीत रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो 
वजन अधिक प्रमाणात मिळते 

अमर यांचा व्यवसाय दृष्टिक्षेपात 
मोठ्या व लहान शेळ्या- एकूण सुमारे ५४ 
बोकड- सहा 
खुराकाचे काटेकोर व्यवस्थापन जबाबदारी  
बंदिस्त शेळीपालन 
२५ बाय ४५ फूट लांब, यात २५ फूट रुंद व ११ फूट लांब असे चार कप्पे, प्रत्येक कप्प्याला गेट प्रत्येक लहान कप्प्यात लहान शेळ्या 
सकाळी सात वाजता शेड स्वच्छता 
आठवड्यातून एकदा शेळ्यांची तपासणी 
वर्षातून दोन वेळा पीपीआर, लाळ्या खुरकूत आदी रोगांसाठी लसीकरण 

दुग्ध व्यवसायही जोडीला 
केवळ शेळीपालनावर न थांबता एक जाफराबादी म्हसदेखील दावणीला आणली. सध्या गोठ्यात दहा म्हशी असून, त्यातील तीन दुधाळ आहेत. दुग्ध व्यवसायाची जबाबदारी अमर यांचे वडील माणिक पाहतात. दोन्ही वेळचे दूधसंकलन सरासरी २५ ते३० लिटर होते. तालुक्‍याचे ठिकाण असल्याने दूध डेअरीत न घातला रतीब घालण्यात येते. त्यातून लिटरला ५० रुपये असा दर मिळतो. डेअरीपेक्षा दोन पैसे उत्पन्न यातून अधिक मिळते.  

लेंडी खतातून उत्पन्न
वर्षाला सुमारे १० ते १२ ट्रॉली लेंडी खत मिळते. प्रतिट्रॉली चार हजार रुपये उत्पन्न त्यातून मिळते.

Web Title: sangli news agrowon