टॅबयुक्त शाळेचा ठेवला भैरेवाडी गावाने आदर्श 

विकास जाधव
गुरुवार, 1 जून 2017

राज्यात जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थ्यांची गळती होत असल्याचे दृश्य एकीकडे आहे. त्याचवेळी सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील भैरेवाडी (ता. पाटण) येथील जिल्हा परिषदेची शाळा ग्रामस्थ व शिक्षकांच्या प्रयत्नांतून टॅबयुक्त होण्यास यशस्वी झाली आहे. विद्यालयात प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब देण्यात आले असून, त्यातील विविध ॲप्सद्वारे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागून त्यात प्रगत होण्यास या उपक्रमातून मदत मिळत आहे. 

राज्यात जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थ्यांची गळती होत असल्याचे दृश्य एकीकडे आहे. त्याचवेळी सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील भैरेवाडी (ता. पाटण) येथील जिल्हा परिषदेची शाळा ग्रामस्थ व शिक्षकांच्या प्रयत्नांतून टॅबयुक्त होण्यास यशस्वी झाली आहे. विद्यालयात प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब देण्यात आले असून, त्यातील विविध ॲप्सद्वारे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागून त्यात प्रगत होण्यास या उपक्रमातून मदत मिळत आहे. 

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मोठा डोंगरी दुर्गम भाग आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये तर डांबरी रस्तेही नाहीत. त्यामुळे पावसाळ्यातील किमान तीन महिने ही गावे संपर्कहीन झाल्यासारखी असतात. साहजिकच या गावांपर्यंत अनेक शासकीय सुविधा पोचत नाहीत. भैरेवाडी हे त्यापैकीच एक गाव. गावाची सुमारे १८० लोकसंख्या. तारळे गावापासून पश्चिमेला १२ किलोमीटर अंतरावर डोंगरात हे गाव वसलेले आहे. शेती हाच इथला मुख्य व्यवसाय अाहे. पाण्याची टंचाई असल्याने गावातील अनेक उदरनिर्वाहासाठी मुंबईचा रस्ता धरला. असे असले तरी काही कुटुंबे मात्र या डोंगर दऱ्यांमधून राहून शेती यशस्वी करण्याचे प्रयत्न करीत आहेत.

भैरैवाडीतील समस्या 

पावसाळ्यात जोरदार पाऊस होत असल्याने व रस्ता कच्चा असल्याने या गावात तीन महिने वाहतूक पूर्णपणे बंद होते. यामुळे या कालावधीत लागणाऱ्या साहित्याची तजवीज एकदम करून ठेवावी लागते. गावात कोणतेही शासकीय कार्यालय नसून बसदेखील गावात येत नाही. कधीतरी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आधार घेतला जातो. अन्यथा, पायी प्रवास करावा लागतो. गावात पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची दोन शिक्षकी शाळा आहे. शाळेत मुख्याध्यापक म्हणून विजय लिंगाडे व नितीन सावंत हे सहकारी शिक्षक कार्यरत आहेत. या विद्यालयात १२ विद्यार्थी शिकतात. 

विधायक बदल 

डोंगरी व दुर्गम गावातील या विद्यालयात काहीतरी वेगळे करायचे असा निर्णय शिक्षकांनी घेतला. जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये टॅबचा वापर केला जात आहे. आपणही प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब देऊ शाळा पूर्णपणे टॅबयुक्त करण्याचा विचार करण्यात आला. यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज लागणार असल्याने ग्रामस्थांकडून वर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेण्यात  आला.

यात्रेचे निमित्त साधले 

उत्पादनाचे पर्याय वा स्रोत कमी असल्याने ५० टक्क्यांच्या वर पुरुष मुंबई व पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. महिला बांधकाम किंवा वीटभट्टीच्या कामाला जातात. त्यामुळे दुपारी गावात तशी सामसूमच असते. दहा फेब्रुवारीला ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा गावात भरते. यात्रेसाठी पुणे व मुंबईला कामानिमित्त राहत असलेले ग्रामस्थ गावी येतात. प्रत्येक वर्षी यात्रेत करमणूकप्रधान कार्यक्रम ठेवले जातात. 

यासाठी लोकवर्गणी करून मोठा खर्च केला जायचा. त्याऐवजी शाळेतील मुले सांस्कृतिक कार्यक्रम करतील अशी संकल्पना मांडण्यात आली. ती ग्रामस्थांना आवडली. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमही चांगला करून रंगत आणल्याने त्यांना बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाचे निमित्त साधून मुलांना टॅब देण्याचे महत्त्व लिंगाडे यांनी ग्रामस्थांना पटवून दिले. अन्य कार्यक्रमांसाठी संकलित होणाऱ्या लोकवर्गणीतील २५ टक्के निधी शाळेसाठी खर्च करूया, असा विचार मांडण्यात आला. यामध्ये भैरवनाथ ग्रामस्थ व जनजागृत्ती क्रीडा मंडळ, मुंबई यांनी पुढाकार घेतला. 

बघता बघता निधी जमला 

यात्रेच्या दोनच दिवसांत गावातील लोकवर्गणीतून ६५ हजार रुपयांचा निधी जमा झाला. या भागातील भूमिपुत्र व बालभारती संस्थेचे संचालक डाॅ. सुनील मगर यांनी एक व शेजारील ढोरोशी गावातील केंद्रप्रमुख-सुरेश मगर यांनी प्रत्येकी एक अशा एकूण १२ टॅब्सची खरेदी करण्यात आली. शिल्लक निधीतून फर्निचर, लाइट फिटिंग,  मेमरी कार्ड आदी साहित्याची खरेदी झाली. विस्तार अधिकारी पी. जी. मठापती यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रोजेक्टर दिला. हे प्रयत्न पाहून ढोरोशी ग्रामपंचायतीनेही टॅबला लागणारे उपयुक्त साहित्य व १२ खुर्च्या दिल्या. विद्यालयातील दोन्ही शिक्षकांनीही अार्थिक हातभार लावला.   

टॅबवरील शिक्षण

शाळेतील मुलांना आता टॅबवरील शिक्षण दिले जात आहे. टॅबमध्ये ६० हून अधिक शैक्षणिक ॲप्लिकेशन्स (ॲप्स) सेट करण्यात आले आहेत. यामध्ये मजेशीर गणिते, इंग्रजी भाषा कशी आत्मसात करावी, इंग्रजी व्याकरण, करमणुकीचे विविध उपक्रम आदींचा समावेश आहे. मुले सरावाने टॅबचा वापर करू लागली आहेत. प्रत्येकाककडे स्वतंत्र टॅब असल्याने जास्त वेळ वापर करणे शक्य झाले आहे. गणित, विज्ञान असे सर्व प्रकारचे धडे टॅबवर गिरवले जात आहेत. सध्या सगळीकडे दप्तरांच्या ओझ्याने मुले त्रस्त असताना भैरेवाडीच्या विद्यालयाने टॅबचा वापर करत दप्तराविना शाळेचा आदर्श घालून दिला आहे.

विद्यार्थी म्हणतात 
माझ्या टॅबमध्ये मी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करते. यात विविध प्रकारची गाणी, गोष्टी आहेत. टॅबयुक्त शाळेत शिकत असल्याचा मला आनंद होत आहे.
- धनश्री आरेकर, इयत्ता पाचवी 

टॅबमधील ॲप्सद्वारे दिल्या जाणाऱ्या शिक्षणामुळे मुलांच्या एकाग्रतेत वाढ होत आहे. प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरेल.
- नितीन सांवत, शिक्षक

टॅबयुक्त शाळा करण्याचा विचार मांडल्यावर ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. चांगली लोकवर्गणी जमली. त्यातूनच टॅब्सची खरेदी करणे शक्य झाले. मुले त्याद्वारे उत्तम प्रकारे शिक्षण घेत आहेत.  
- विजय लिंगाडे, मुख्याध्यापक, भैरेवाडी शाळा.

दुर्गम भागात आपली शाळा संगणकीकृत करावी हा उद्देश होता. दप्तराविना शाळा ही संकल्पना राबविण्याचा विचार होता. ग्रामस्थ व शिक्षकांच्या प्रयत्नातून त्यास यश आले. 
- आर. पी. निकम विस्तार अधिकारी, पंचायत समिती, पाटण.

 विजय लिगांडे, ९४२३२४७८५३
 नितीन सावंत, ९९२१४५८७३९

Web Title: satara news zp school