भाताचे एकरी सात टन विक्रमी उत्पादन

rice farming
rice farming

रत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य यांनी लागवड तंत्रज्ञानाच्या सुधारित पद्धतींचा अवलंब करीत भाताची हेक्टरी उत्पादकता सर्वोच्च पातळीवर नेली आहे. २०१६ मध्ये ३२ गुंठ्यांत प्रयोग करताना १० गुंठ्यांत १९२ किलो (एकरी सात टन ६८० किलो) उत्पादन घेतले. दरवर्षी एकरी ६.८ ते सात टन अशीच उत्पादकता टिकवत त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांसमोर आदर्श तयार केला आहे. 

कोकणात तुकड्या-तुकड्यांत भाताचे उत्पादन घेतले जाते. काळानुसार इथले शेतकरी सुधारित वा संकरीत वाण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता व गुणवत्ता वाढवू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या एका टोकाला वसलेल्या दुर्गम अशा रीळ येथील मिलिंद वैद्य हे त्यापैकी एक शेतकरी आहेत. त्यांची सुमारे १५० गुंठे शेती आहे. भात हेच त्यांचे मुख्य पीक असते. पूर्वी पारंपरिक पद्धतीने भात व्हायचा. त्याचा घरापुरता वापर होई. भातानंतर भाजीपाला लागवडीतून मिळणारे आर्थिक उत्पन्न घरखर्चासाठी वापरले जाई. आंबापिकाचाही आर्थिक आधार होताच.

उत्पादनवाढीचे प्रयत्न
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, कृषी अधिकारी यांच्यासह प्रगतिशील शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर १९९६ च्या सुमरास वैद्य यांनी आधुनिक पद्धतींचा अवलंब सुरू केला. त्या वेळी गुंठ्याला ४० किलो भात मिळत होते. जुन्या बियाण्यांबरोबर सुधारित आणि संकरित बियाणे वापरण्यास सुरवात केली.

सर्वोच्च  उत्पादनाचा अनुभव 
वैद्य दरवर्षी एकरी साडेसहा ते सात टनांच्या आसपास उत्पादन घेतात  सन २०१६ मध्ये सुमारे ३२ गुंठ्यांत संकरित वाण व सगुणा तंत्राचा वापर वैद्य यांनी केला.  सगुणा पद्धतीमुळे मशागतीवरील तसेच खतांवरील खर्चात ५० टक्के बचत होते. पावसाने ओढ दिल्यास उत्पादनावर फार परिणाम होत नाही. या प्रयोगात दहा गुंठे क्षेत्रात १९२ किलो उत्पादन मिळाले. त्यावरून पुढे हेक्टरी १९२ क्विंटल (१९.२ टन) असे उत्पादनाचे गणित काढण्यात आले. ते एकरी सात टन ६८० किलो होते. 

या प्रयोगातील निरीक्षणे
सर्वसाधारण लोबींमध्ये १५० ते १७० दाणे व सरासरी लोंबीची लांबी सात इंच राहू शकते. या प्रयोगात ती १४ इंचांपर्यंत गेली. 
प्रति लोंबी दाण्यांची संख्या ४०० ते ४५० पर्यंत तर काही लोंब्यांना ते कमाल ८६४ पर्यंत मिळाले. 
एका चुडाला सरासरी ४० फुटवे होते. काही ठिकाणी ते कमाल ८४ पर्यंत मिळाले. हातात मावणार नाहीत एवढी त्यांची संख्या होती. 

सुधारित व्यवस्थापन- ठळक बाबी
  मृग नक्षत्रावर पेरणी केल्यानंतर साधारण १८ दिवसांनी रोपे लावणीयोग्य होतात. वैद्य यांनी सगुणा तंत्रज्ञाव, चारसूत्री पद्धती तसेच अन्य वेगवेगळ्या पद्धतींचे प्रयोग केले आहेत. उत्पादन खर्च कमी करण्याबरोबर उत्पादनवाढ कशी होईल हे त्यातून पाहिले. 
  चिखलणीनंतर शेण, गूळ, गोमूत्र यांची स्लरी देण्यावर भर
  पावसाचा अंदाज घेऊन पंधरा दिवसांनी आणखी एक स्लरीचा हात
  जमिनीतील नत्र वाढविण्यासाठी पत्री पेंडीचा वापर चिखलणीवेळी
  भाताला नत्र आवश्यक. युरियाचा गुंठ्याला दीड किलो असा वापर
  आवश्यकतेनुसार गांडूळ खताचा उपयोग
  रोपे सशक्त व्हावीत यासाठी भाताचे तूस जाळून त्याची राख चिखलणीवेळी मिसळण्यात येते. त्यात पोटॅश व सिलिका असते. त्याचा उपयोग रोपांची ताकद वाढविण्यासाठी होतो. त्यामुळे उत्पादकता वाढते.
  पूर्वी जुने तांबडा तांदळाचे बियाणे वापरले जायचे. आता सुधारित व संकरित वाणांचा वापर 
  बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन लागवडीचे नियोजन 
  भातक्षेत्राच्या बांधावर वरी, उडीद यांची लागवड. त्यातून रसशोषक किडींपासून बचाव.
  यामध्येच झेंडूचीही लागवड. विक्रीतून मिळणार उत्पन्न किरकोळ खर्चासाठी उपयोगी. 
  दरवर्षी वाणांची बदल तसेच फेरपालटीवर भर 
  प्रति किलो १९.५० रु. दराने तांदळाची विक्री. परिसरातील संघाला पुरवण्यावर मुख्य भर.

भडसावळे यांनी केली प्रसंशा 
सगुणा तंत्राच्या भात लागवडीचे प्रणेते शेखर भडसावळे म्हणाले की साधारण दोन वर्षांपूर्वी वैद्य यांच्या भातशेतीला मी भेट दिली. त्यावेळी त्यांच्या प्रयोगशीलतेला प्रत्यय घेतला आहे. माझ्या माहितीनुसार जगातील सर्वाधिक नऊ टनांपर्यंत भात उत्पादन चीनने घेतले आहे. वैद्य यांचे उत्पादन देखील त्याच्या जवळपास गेले आहे असे म्हणता येईल. 

रब्बीसह आंबा, नारळ, सुपारीतून उत्पन्न
ऑक्टोबर सुरू झाला की कोथिंबीर, मुळा, पालक, काकडी, स्वीटकॉर्न, सूर्यफूल, शेंगदाणा यांची लागवड करण्यास सुरवात होते. गेल्यावर्षी कोथिंबिरीची विक्री खंडाळा, जयगड बाजारपेठेत करून ३० ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न कमावले. रब्बी हंगामातील पिकेही एक ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून देतात. मार्च महिन्यापासून आंबा हंगामाला सुरवात होते. सुमारे आठशे कलमे असून तीन हजार पेट्या मुंबई, दिल्ली, नाशिकसह अनेक ठिकाणी घरपोच पाठवण्यात येतात. या व्यवसायातून सुमारे २० लाख रुपयांची उलाढाल होते. खर्च वगळता सुमारे तीस टक्के नफा मिळतो. नारळ, सुपारी यांची प्रत्येकी शंभर रोपे असून वर्षाला त्यातून दोन लाख रुपये उत्पन्न मिळते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com