दर्जेदार रेशीम कोष हीच ‘देवठाण्या`ची ओळख

silk
silk

गोदावरी नदीकाठी वसलेले देवठाणा हे हजार लोकवस्तीचे गाव. हे गाव आता परभणी जिल्ह्यात रेशीम कोष उत्पादक गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे. या गावात ३२५ शेतकरी खातेदार आहेत. खोल काळी कसदार, सुपीक जमीन असलेले ३१० हेक्टर शिवार आहे. त्यामध्ये २०० हेक्टर बागायती तर उर्वरित ११० हेक्टर जिरायती जमिनीचे क्षेत्र आहे. सिंचनासाठी विहीर, कूपनलिकेची उपलब्धता आहेत. बागायतीमध्ये ऊस, हळद, कापूस आणि जिरायतीमध्ये कापूस, सोयाबीन, मूग, तूर आदी पिकांची लागवड असते. गेल्या दोन वर्षांतील दुष्काळी परिस्थितीमुळे सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध झाले नाही. मात्र अवर्षणाच्या स्थितीत कमी पाण्यावर येणाऱ्या तुती पिकामुळे शेतकऱ्यांना रेशीम कोष उत्पादन घेता आले. अन्य पिकांच्या उत्पादनात पाण्याअभावी मोठी घट आली. मात्र रेशीम कोष उत्पादनातून गावातील शेतकरी दुष्काळातही टिकून राहिले. 

रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा - 
सन २०१०-११ गावातील मधुकर जोगदंड यांच्यासह काही शेतकऱ्यांनी तुती लागवड केली. त्यांना कोष उत्पादनातून महिन्याकाठी पगाराप्रमाणे चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागले. सध्या १९ जुन्या शेतकऱ्यांकडे २० एकर तर यंदा ३८ नवीन शेतकऱ्यांनी ३८.५० एकरवर तुती लागवड केली आहे. आता देवठाणा शिवारामध्ये ५८.५० एकर क्षेत्रावर तुती लागवड झाली आहे. 


१) गावातील शेतकऱ्यांनी व्ही-१ या तुती वाणाची लागवड केली आहे. दोन जोडओळीतील अंतर पाच फूट, दोन ओळीतील अंतर तीन फूट, दोन झाडांतील अंतर दोन फूट आहे. सुरवातीच्या काळात प्रवाही तसेच नंतर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब शेतकरी करतात. 
२) सुरवातीची काही वर्षे शेतकरी कोलार गोल्ड या जातीच्या रेशीम कीटकांच्या कोषाचे उत्पादन घेत होते; परंतु बायव्होल्टाईन रेशीम कीटकापासून मिळणाऱ्या कोषात धाग्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे शेतकरी गेल्या चार वर्षांपासून बायव्होल्टाईन रेशीम कोषाचे उत्पादन घेत आहेत. 
३) दोन एकर क्षेत्रावर तुती लागवड केलेल्या शेतकऱ्यांना दर महा सरासरी दीड ते दोन क्विंटल कोष उत्पादन मिळते. 

संगोपन गृहातील व्यवस्थापन - 
१) रेशीम कीटकांच्या संगोपनासाठी २२ फूट रुंद बाय ५० फूट लांब आकाराची (लांबी पूर्व-पश्चिम) संगोपनगृहे उभारली आहेत. चौहोबाजूंनी तीन फूट उंचीची विटांची भिंत घेतली आहे. 
२) लोखंडी खांबावर टिन पत्र्याचे शेड आहे. विटांच्या भिंतीवर हिरव्या रंगाचे शेडनेट लावले आहे. काही शेतकऱ्यांनी शेडच्या जमिनीवर फरशी घातलेली आहे. 
३) शेडमधील तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस, आर्द्रता ६० ते ६५ टक्के राखली जाते. त्यासाठी हिवाळ्यात शेडनेटला समांतर प्लॅस्टिक कागद लावला जातो. उन्हाळ्यामध्ये पोते लावून ते ठिबकद्वारे भिजविले जाते. 
४) बांबू किंवा लोखंडी अॅंगलच्या साह्याने तयार करण्यात आलेल्या रॅकवर नाॅयलाॅन जाळीचे कप्पे तयार करून त्यावर रेशीम कीटकांचे संगोपन केले जाते. साधारणपणे २२ - २५ दिवसांनंतर अळ्या पूर्णपणे परिपक्व झाल्यानंतर रेशीम कोष बनविण्यास सुरवात करतात. त्या वेळी प्लॅस्टिक चंद्रिकेवर अळ्या सोडल्या जातात. अंडीपुंजापासून ते कोष पक्व होईपर्यंत अळ्यांना २६ दिवस लागतात. काही शेतकरी बाल कीटक संगोपनगृहातून १० दिवसांच्या चॉकी घेतात. त्या अळ्यांचे वैयक्तिक शेडमध्ये १६ दिवस संगोपन करतात. 
५) काही शेतकऱ्यांनी प्लॅस्टिक कागद तसेच जुन्या साड्यांचा वापर करून संगोपनगृहाचा खर्च कमी केला आहे. 
६) शेतकऱ्यांनी संगोपनगृहातील स्वच्छतेवर भर दिला आहे, त्यामुळे दर्जेदार कोषांचे उत्पादन मिळते. 
७) कर्नाटकातील बेंगलुरू जवळील रामनगर येथे रेशीम कोष बाजार पेठ आहे. देवठाणा गावातील शेतकरी नांदेड किंवा परळी या ठिकाणाहून नांदेड-बेंगलुरू रेल्वेगाडीने रामनगर येथे कोष घेऊन जातात. कोशाच्या प्रतवारीनुसार शेतकऱ्यांना सरासरी २५० रुपये ते ३५० रुपये किलो याप्रमाणे दर मिळतो. 

सुरू झाले मिनी चाॅकी सेंटर...... 
गावातील मुंजाभाऊ जोगदंड यांनी मिनी चाॅकी रेअरिंग सेंटर सुरू केले. यामुळे नवीन रेशीम शेतकऱ्यांना तयार रेशीम कीटकाच्या अळ्या मिळणार आहेत. यामुळे कीटक संगोपनाचा कालावधी १० दिवसांनी कमी होऊन कमी दिवसांत कोष उत्पादन घेणे शक्य झाले. 
 

देवठाणा येथील रेशीम कोश उद्योग स्थिती (क्षेत्र - एकर) (कोष - प्रति किलो), (उत्पन्न - रुपये) 

वर्षे -----शेतकरी-- तुती क्षेत्र--- अंडीपुंज--- कोष उत्पादन--- रक्कम 
२०१२-१३ ६ ८ १७०० ११२० ३,४७,२०० 
२०१३-१४ १३ १८ ७००० ३८८१ १२,४१,९२० 
२०१४-१५ २१ २४.७५ १२,१५० ७१९० २५,८८,४०० 
२०१५-१६ २८ ३२.७५ १६,१०० ७७७५ २७,९९,००० 
२०१६-१७ ५७ ५८.५० ९३५० ७४६८ २७,६३,१६० 

शेतकऱ्यांचे अनुभव 
दरमहा शाश्वत उत्पन्न - 
माझी वीस एकर शेती आहे. त्यामध्ये ऊस, हळद, तूर, सोयाबीन लागवड असते. त्याचबरोबरीने दीड क्षेत्रावर चिकू लागवड आहे. पाच वर्षांपूर्वी मी प्रथम रेशीम शेती सुरू केली. सध्या चार एकर तुती लागवड आहे. अन्य पिकांचे सहा महिने किंवा वर्षाला उत्पादन मिळते. मात्र दरमहा दोन ते अडीच क्विंटल रेशीम कोषांचे उत्पादन मिळते. दरमहा व्यवस्थापन खर्च वजा जाता सरासरी ४० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या दुष्काळात दुसरे कोणतेही पीक आले नाही; परंतु रेशीम कोष उत्पादनातून गेल्या वर्षी मला सव्वादोन लाख रुपये उत्पन्न मिळाले. रेशीम शेतीमुळे मुलाला चांगले शिक्षण देणे शक्य झाले. 
संपर्क - मधुकर जोगदंड - ९७६४६७१९२८ 

पाच वर्षांपासून रेशीम शेती करीत आहे. सध्या दोन एकरांवर तुती लागवड आहे. मी बारमाही उत्पादन घेतो. एप्रिल-मे महिन्यात कोषाची आवक कमी झाल्यानंतर चांगला दर मिळतो. रेशीम शेतीमुळे दोघा भावांना रोजगार मिळाला. गतवर्षीची दुष्काळात तीन पिके घेतली, त्यातून दीड लाख रुपये उत्पन्न मिळाले. 
- सुरेश जोगदंड 

कमी खर्चात संगोपनगृह उभारले. अडीच एकर तुतीपासून वर्षाला ८ ते ९ वेळा रेशीम कोष उत्पादन घेतो. 
अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळते. 
- कालिदास जोगदंड 

अडीच एकर तुतीपासून महिन्याकाठी ५० हजारांचे कोष उत्पादन घेतो. गतवर्षी दुष्काळामध्ये दोन पिकांतून ९५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. 
- सुधारकर आवरगंड 

आर्थिक स्थिती सुधारली 
काही वर्षांपूर्वी शिवारात उसाचे क्षेत्र जास्त होते. दुष्काळामुळे ते कमी झाले. रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले, गावात सुधारणा झाली आहे. लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. 
- गिरीधर जोगदंड (सरपंच, देवठाणा) 

शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाची सोय - 
देवठाणा येथे यंदा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकरी समूहाच्या माध्यमातून तुती लागवड करण्यात आली आहे. जिल्हा रेशीम विकास अधिकारी ए. व्ही. वाकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली 
शेतकऱ्यांसाठी विविध प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येते. रेशीम शेतीमुळे दर महिन्याला पगाराप्रमाणे खात्रीशीर उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू लागले आहे. 

संपर्क - 
गोविंद कदम (प्रकल्पाधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय, परभणी ) - मो.९४२३०३२४३९ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com