सुभाष शर्मा महाराष्ट्राचे ‘स्मार्ट शेतकरी’

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 मे 2019

‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे.

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे. पुण्याच्या बालगंधर्व नाट्यमंदिरात कौतुकाच्या शब्दसुमनांचा वर्षाव आणि टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रख्यात ग्रामीण साहित्यिक डॉ. राजन गवस व ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या वेळी पुरस्कारार्थी ठरलेल्या बहाद्दर शेतकऱ्यांच्या कर्तृत्वाला संगीत आणि नृत्याच्या तुफानी जल्लोशात अनोखी सलामी दिली गेली.

यवतमाळ जिल्ह्यातील कृषिभूषण शेतकरी शर्मा यांना एक लाख रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे स्वरूप असलेला ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी’ हा सर्वांत मानाचा पुरस्कार घोषित होताच सभागृह टाळ्यांनी दुमदुमले. “मी पर्यावरणपूरक शेती करतो. हा माझा नव्हे, तर माझ्या आईचा सन्मान आहे आणि काळी माती हीच माझी आई आहे. माझ्या शेतीत असलेले लाखो जीवजंतू, पशुपक्षी, झाडे, वेली, राबणारे आदिवासी शेतकरी यांचा हा गौरव आहे,’ असे भावपूर्ण उद्गगार शर्मा यांनी सत्काराला उत्तर देताना काढले. 

साखर आयुक्त शेखर गायकवाड, कृषी आयुक्त सुहास दिवसे, सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, संचालक भाऊसाहेब पाटील, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर महेंद्र पिसाळ, अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, तसेच या सोहळ्याचे प्रायोजकत्व लाभलेल्या मान्यवर संस्थांच्या वतीने रिव्ह्युलीस इरिगेशनचे सल्लागार उमेशचंद्र सरंगी, बोअर चार्जरचे संस्थापक संचालक राहुल बाकरे, महारयत ॲग्रोचे संचालक सुधीर मोहिते, निरामय ॲग्रो सोल्युशन्सचे संचालक डॉ. योगेश चांदोरकर व डॉ. अमृता चांदोरकर, सिस्टिमा बायोचे सीईओ अलेक्स एटन या वेळी उपस्थित होते. पुरस्कार निवड समितीचे सदस्य माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, ‘महाएफपीसी‘चे अध्यक्ष योगेश थोरात, कवयित्री सौ. कल्पना दुधाळ हेही उपस्थित होते.

कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी, राज्यात प्रतिकूल परिस्थितीतून जाणाऱ्या शेतकऱ्यांची निसर्गदेखील परीक्षा घेत असताना कष्ट, कल्पकतेतून स्मार्ट तंत्राची शेती करणाऱ्या या शेतकऱ्यांचा ‘सकाळ ॲग्रोवन’कडून देखण्या सोहळ्यात गौरव केला जात आहे, असे गौरवोद्गार काढले. “राज्यातील प्रयोगशील शेतकरी ही प्रकाशाची बेटं आहेत. या बेटांचा गौरव आज होतो आहे. शेतीच्या भविष्यकालीन वाटचालीत प्रत्येक गोष्टीत शेतकऱ्याला ज्ञानी अर्थातच स्मार्ट व्हावे लागेल,’ असे साखर आयुक्त गायकवाड या वेळी म्हणाले. साहित्यिक डॉ. गवस यांनी, ‘‘आपला शेतकरी ज्ञानीच होता, पण त्याच्या परंपरागत ज्ञानात अडाणी लोकांनी हस्तक्षेप केला. आज कोणत्याही सरकारी कचेरीत गेल्यानंतर शेतकऱ्याचीच मुले शेतकऱ्याचा गळा घोटत असल्याचे दिसते आहे,’ अशा शब्दांत व्यवस्थेवर टीका केली. 

‘सकाळ’ समाजाच्या उत्कर्षासाठी 
सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी पुरस्कारार्थी शेतकऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. “सकाळ माध्यम समूह हा टीका करण्यापेक्षा चांगल्या उपक्रमांचा भागदेखील बनतो. त्यामुळेच ८०० गावे सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून टंचाईमुक्त झाली. राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना कौशल्य प्रशिक्षण आम्ही देत आहोत. ‘ॲग्रोवन''च्या सरपंच महापरिषदेतून शेकडो सरपंचांना प्रशिक्षण दिले गेले. समाजाच्या उत्कर्षासाठी जात, पंथाच्या बेड्या ओलांडून काम करूया. शेतकऱ्यांची उमेद वाढवून महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करूया,’ असे भावनिक आवाहन पवार यांनी केले. अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी प्रास्ताविकात हजारो शेतकऱ्यांना समृद्धी मिळवून देणारा ॲग्रोवन आता १४ वर्षांच्या वाटचालीत कृषी चळवळ बनला आहे, असे नमूद केले. 

कलाकारांनी आणली रंगत
या सोहळ्याचे अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांनी लाजवाब सूत्रसंचालन केले. तसेच, मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार भार्गवी चिरमुले, स्मिता शेवाळे, मंगेश बोरगावकर, सावनी रवींद्र, योगेश सुपेकर यांनी नृत्य, लोकसंगीत, हास्यप्रयोगाने उपस्थित शेतकऱ्यांची सायंकाळ रंगतदार बनवली. पुण्यातील विजयश्री इव्हेंट्सने हा कार्यक्रम सादर केला.

जलव्यवस्थापनात आदर्श काम करणारे गाव किंवा शेतीच्या गटाला पुढील वर्षी एक लाख रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा या वेळी रिव्हुलीस इरिगेशन कंपनीच्या वतीने या कंपनीचे सल्लागार उमेशचंद्र सरंगी यांनी या वेळी केली.

स्मार्ट शेतकरी पुरस्काराचे मानकरी
अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी- सुभाष शर्मा (मु. पो. छोटी गुजरी, ता. जि. यवतमाळ), अॅग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी- विजया रवींद्रराव गुळभिले (दीपेवडगाव, केज, बीड), अॅग्रोवन स्मार्ट सेंद्रिय शेती- शामसुंदर सुभाष जायगुडे (केळवडे, भोर, पुणे), अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक- तात्यासाहेब रामचंद्र फडतरे (रामवाडी, इंदापूर, पुणे), अॅग्रोवन प्रेरणा पुरस्कार- वैशाली सुधाकर येडे (राजूर, कळम, यवतमाळ), अॅग्रोवन स्मार्ट कृषिपूरक व्यवसाय- उत्तम लक्ष्मण डुकरे (औरंगपूर, जुन्नर, पुणे), अॅग्रोवन स्मार्ट संशोधक- पंढरीनाथ सर्जेराव मोरे (सांगवी भुसार, कोपरगाव, अहमदनगर), अॅग्रोवन स्मार्ट  जलव्यवस्थापक शेतकरी- डॉ. दत्तात्रय सहदेव वणे - (मानोरी, राहुरी, नगर) अॅग्रोवन पश्चिम महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी- प्रताप रघुनाथ चिपळूणकर, (शाहुपुरी, कोल्हापूर), अॅग्रोवन उत्तर महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी- प्रशांत वसंत महाजन (तांदलवाडी, रावेर, जळगाव), अॅग्रोवन कोकणचा स्मार्ट शेतकरी- अनिल नारायण पाटील (सांगे, वाडा, पालघर), अॅग्रोवन मराठवाड्याचा स्मार्ट शेतकरी- राजेश मुरलीधर पाटील (निपाणी, कळंब, उस्मानाबाद),अॅग्रोवन विदर्भाचा स्मार्ट शेतकरी- अविनाश बबनराव कहाते (रोहणा, आर्वी, वर्धा)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart Shetkari Subhash Sharma Award Maharashtra