महाराष्ट्रातील माजी सैनिकांचं असं एक गाव, ज्यापासून घ्यावी सर्वांनीच प्रेरणा

संतोष मुंढे
Wednesday, 27 January 2021

औरंगाबाद जिल्ह्यातील नाचनवेल-कोपरवेल व आडगाव (पिशोर) या दोन्ही गावांनी स्वातंत्र्यपूर्व  काळापासून देशसेवेचा वारसा आजगायत जपला आहे. सेवानिवृत्तीनंतर येथील अनेक सैनिकांनी शेतीलाच प्राधान्य दिले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील नाचनवेल-कोपरवेल व आडगाव (पिशोर) या दोन्ही गावांनी स्वातंत्र्यपूर्व  काळापासून देशसेवेचा वारसा आजगायत जपला आहे. सेवानिवृत्तीनंतर येथील अनेक सैनिकांनी शेतीलाच प्राधान्य दिले आहे. सामाजिक कार्य व गावविकासातही त्यांनी मोलाचा हातभार लावला आहे. 

गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे

ख्यातनाम कवी कै. सुरेश भट यांच्या कवितेतील हे शब्द आठवले की देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणारे सैनिक डोळ्यासमोर उभे राहतात. औरंगाबाद जिल्ह्यातील नाचनवेल-कोपरवेल आणि त्यापासून चार किलोमीटरवरील आडगाव (पिशोर) अशी दोन्ही गावं सैनिकांची म्हणून समोर येतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशसेवेचा वसा जपणारी गावं म्हणून त्यांची ओळख आहे.  सैन्यात वेळोवेळी आपल्या कामगिरीतून गौरव मिळविलेले येथील सैनिक सेवानिवृत्तीनंतर आता शेतीत रमून तेथेही आपली कामगिरी दाखवीत आहेत. त्यांच्याकडे पाहिलं तरी ''जय जवान जय किसान'' चा नारा आपसूकच तोंडी येतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिंदे यांची शेती
नाचनवेल कोपरवेल येथील भीकन माणिकराव शिंदे कारगिल युद्धानंतर २००३ मध्ये सैन्यातून निवृत्त झाले. अंबाला, उधमपूर, सिकंदराबाद तसेच देशाच्या विविध सीमा व दुर्गम ठिकाणी १९ वर्षे त्यांनी सेवा दिली. आज वडिलोपार्जित सात एकरांला अडीच एकरची जोड देऊन ते पूर्णवेळ शेतकरी झाले आहेत. शेती अधिक उत्पादनक्षम बनविण्यासाठी विहीर खोदली. खरिपात कपाशी, मका, तूर, भुईमूग तर रब्बीत  गहू हरभरा, मका, बाजरी, सूर्यफूल अशी विविधता ते जपतात. दोन संकरित गायी  व दोन शेळ्यांचे पालन करतात. दुधातून ताजा पैसा हाती येतो. 

दोन्ही बंधूंची सुट्टीत शेती 
नाचनवेल-कोपरवेल येथीलच मनोज (अलाहाबाद) व सुधाकर (नगर) हे दळवी बंधू सैन्यात हवालदार पदी कार्यरत आहेत. शेतीत दिवसरात्र कष्ट उपसणारे वडील सोमनाथराव व आई विमलबाई यांना सुट्टीच्या काळात दोघेही शेतीत शक्य ती मदत करतात. सुट्ट्यांचे नियोजन १९ वर्षांपासून त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न असतो. आधीच्या पाच एकर शेतीला तीन एकरांची जोड आहे. दोन म्हशीही आहेत. 

Image may contain: 2 people, sky, outdoor and nature, text that says "सकाळ"

नाचनवेल-कोपरवेल येथील माजी सैनिक भीकन शिंदे (उजवीकडे) मुलगा व शेतीत राबणाऱ्या खिल्लार जोडीसह.
----------------------------------------

शेतीलाच प्राधान्य  
अडगाव (पिशोर) येथील काशिनाथ पाटीलबा सुस्ते यांनी २१ वर्षे सैन्यदलात सेवा दिली. त्यानंतर रिझर्व्ह बॅंकेत (मुंबई) नोकरीची संधी मिळाली. परंतु इतकी वर्षे गावाबाहेर राहिल्याने त्यांनी शेती करण्याचा मार्ग निवडला. वडिलोपार्जित १२ एकराला १० एकर विकत घेतलेल्या शेतीची जोड दिली. पाण्याचे महत्त्व ओळखून चार विहिरी, पाइपलाइन, दोन शेततळी व पंधरा एकरांवर ठिबक केले. पीकबदल साधत कपाशी, मका सोबत सुधारित पद्धतीने आले लागवड सुरू करत प्रयोगशील शेतकरी म्हणून ते आता शेतीत रमले आहेत.

पंधरा वर्षे सैन्यात सेवा देऊन निवृत्तीनंतर राज्य परिवहन मंडळात जवळपास २० वर्षे नोकरी केली. आता पूर्णवेळ शेती करतो आहे. पूरक उद्योगाचा शोध घेत आहे. 
देवराव भूजंगराव शिंदे, नाचनवेल
 ७७२०९९३४४४ 

 
Image may contain: people playing sport, tree, sky, basketball court, plant, outdoor and nature, text that says "सकाळ"
आडगाव (पिशोर) येथील श्री क्षेत्र माळोबाई संस्थान परिसरात माजी सैनिकांनी गावकऱ्यांसह केलेली वृक्ष लागवड.

------------------------------------------
आमची दोन्ही मुलं फौजी आहेत. सुट्टीत घरी आले की ती आमची काळजी घेतात. घरातील व शेतीकामांना हातभार लावतात. आई -वडिलांसाठी यापेक्षा वेगळं समाधान काय असतं?
विमलबाई सोमनाथ दळवी, (सैनिक मनोज दळवी यांच्या आई) - मनोज दळवी  ९९७५९७६०८१ 

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

नाचनवेल- कोपरवेलविषयी महत्त्वाचे

 • साडेचार हजार लोकसंख्येचे गाव
 • सैनिकांचा वारसा स्वातंत्र्यपूर्व १९३९ पासूनचा.
 • गावातील सैन्यात पहिले भरती होणारे सैनिक म्हणजे (त्यावेळचे ग्वाल्हेर संस्थान) सैनिक बाळकृष्णणराव दगडूजी शिंदे. त्यांनी गरीब मुलांसाठी वसतीगृह व आठवडी बाजार सुरू केला. 
 • दुसरं महायुद्ध, १९६२, १९६५, १९७१ व कारगिल युद्धात कर्तव्य बजावलेले सैनिक गावाने दिले.
 • शंभरावर आजी-माजी सैनिक कॅप्टन, सुभेदार, नायक, हवालदार, सैनिक आदी पदांवर कार्यरत
 • गावातील श्री भीकनशहावली अवलिया संस्थान सामाजिक एकात्मतेचं प्रतीक
 • गावातील सैनिकांचा सार्वजनिक, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग. सैनिक भवन उभारणी, बोअरवेल उभारण्यात योगदान 
 • विद्यार्थ्यांना घडविली सैनिक सराव केंद्राची सहल.
 • ''नेव्ही’, ‘आर्मी’ मध्ये कॅप्टनपद भूषविणारे कॅप्टन प्रकाश किसनराव थोरात यांनी ‘डिवाएसपी’चे पदही भूषविले. सन २००४ ते ०८ या  काळात मुंबई मनपा सहाय्यक आयुक्‍तपद भूषविण्याची संधीही  त्यांना मिळाली.
 • माजी सैनिक गजानन पिंपळे हे गजानन सिक्‍युरीटी सर्व्हिसेसच्या माध्यमातून रोजगार देण्याचे काम करतात काम.
 •  गावकरी व सैनिकांकडून होतो शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान 
 • शहिदांच्या स्मरणार्थ वृक्ष लागवड
 • अडगाव (पिशोर) गावाविषयी 
 • सुमारे पावणेदोनशे आजी- माजी सैनिक 
 • सैन्य, त्यानंतर पोलिस दलात ‘डीवायएसपी’ पदावरून निवृत्त झालेल्या स्व. फकिरराव भोसले यांना तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून ‘गार्ड ऑफ ऑनर 
 • तत्कालीन ग्वाल्हेर संस्थानातही सैनिक म्हणून बाळासाहेब माधवराव भोसले यांनी दिली सेवा.
 • सन २००५ पासून १५ सैनिकांचा ‘जय जवान जय किसान’ बचत गट. सदस्य तसेच गरजू शेतकऱ्यांना अडचणीत मदत.
 • गावाचे आराध्य दैवत श्री क्षेत्र माळोबाई संस्थानच्या परिसरात जवळपास साडेपाचशे वृक्षांची लागवड यात वड, लिंब, जांभूळ, सीताफळ, रामफळ, चिंच आदींची लागवड. 
 • संस्थानाला उत्पन्नाचा स्रोत व पाण्याच्या सोयीत मदत

काशिनाथ पाटीलबा सुस्ते 
  ९६०४६२१५७८ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soldiers after retirement farming Nachanvel-Koparvel Adgaon Pishore villages Aurangabad district