रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरणीला वेग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

शेंदूरवादा (ता.गंगापूर) परिसरातील मुरमी, दहेगाव, शहापूर, गुरुधानोरा, भगतवाडी या गावांमध्ये परतीच्या पावसाने जेमतेम हजेरी लावली आहे. पावसाअभावी खाली राहिलेल्या शेतात किमान रब्बीची ज्वारी तरी येईल या आशेने रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरणीला वेग आला आहे.

शेंदूरवादा - शेंदूरवादा (ता.गंगापूर) परिसरातील मुरमी, दहेगाव, शहापूर, गुरुधानोरा, भगतवाडी या गावांमध्ये परतीच्या पावसाने जेमतेम हजेरी लावली आहे. पावसाअभावी खाली राहिलेल्या शेतात किमान रब्बीची ज्वारी तरी येईल या आशेने रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरणीला वेग आला आहे. या परिसरात गोकुळाष्टमीपासून ज्वारीच्या पेरण्यांना सुरवात केली जाते. मात्र, यंदा ऐन पावसाळ्यात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी पेरण्या कराव्यात का नाही, अशा द्विधावस्थेत होता. काही शेतकऱ्यांनी पाऊस पडेल, या आशेने ज्वारीच्या पेरण्या केल्या; मात्र पाणीटंचाईचे सावट अधिक गडद झाले. त्यामुळे ज्वारीच्या दुबार पेरण्यांचे संकट शेतकऱ्यांवर आले.

दमदार पावसाअभावी खरीप हंगामातील बाजरीच्या देखील पेरण्या नगण्यच झाल्या. त्यातच पावसाने ओढ दिल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र, परतीच्या पावसाने शेवटच्या टप्प्यात जेमतेम हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी आनंदी आहे. त्यांनी रब्बी हंगामातील पेरण्यांना सुरवात केली आहे, तर काही भागांत पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. परतीचा पाऊस समाधानकारक झाला नसला, तरी या पावसामुळे जनावरांचा चारा थोडाफार उपलब्ध झाला आहे. पण भूगर्भातील पाणीपातळी जैसे थे आहे. शासनाने तत्काळ पिण्यासाठी पाण्याचे नियोजन करून शेतीसाठी पाण्याच्या दीर्घकालीन उपाययोजना कराव्या अशी मागणी कारभारी दुबिले, संजय सुकासे, भाऊसाहेब निकम, ज्ञानेश्वर सुकासे, अण्णासाहेब पारदे, करीम पठाण, आनंदा निकम, भीमराज ठोकळ, साहेबराव नीळ, फकिरा म्हस्के, सूर्यभान चापे, बिलाल शेख यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. 

खरिपात क्षेत्र गुंतले
पूर्वी रब्बी पिकासाठी क्षेत्र रिकामे ठेवले जात होते. आता खरिपाचे पीक घेतल्यानंतर रब्बी पीक घेण्यावरही अनेक शेतकरी भर देत आहेत. सध्या कपाशीचे क्षेत्र वाढले असून, त्यात रब्बीचे क्षेत्र गुंतले आहे. काही शेतकरी खरिपातील पिकांची वाढ न झाल्याने ते काढून रब्बीची ज्वारी पेरणी करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sowing of rabi crops