लागवड उन्हाळी भुईमुगाची...

सुधारित पद्धतीने भुईमुगाच्या शिफारशीत जातींची लागवड करावी.
सुधारित पद्धतीने भुईमुगाच्या शिफारशीत जातींची लागवड करावी.

उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी टीएजी २४ आणि एसबी ११ या जातींची निवड करावी. जानेवारीच्या १५ ते २० तारखेच्या दरम्यान पेरणी करावी. उशिरात उशिरा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पेरणी पूर्ण करावी.

उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. ज्या जमिनीत वाळू आणि सेंद्रिय घटकांचे योग्य प्रमाणात मिश्रण आहे अशा जमिनीत भुसभुशीतपणा अधिक असतो. त्यामुळे आऱ्या जमिनीत सहजपणे घुसतात, शेंगा चांगल्या पोसल्या जातात. 

खत व्यवस्थापन -
    जमिनीत शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी भरखत शेतात पसरून द्यावे. त्यापासून झाडास लागणारी अन्नद्रव्य हळूहळू मिळतात. जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचा साठ वाढून जलधारण शक्ती वाढते.  
    माती परीक्षणानुसार २५ किलो नत्र (११० किलो अमोनियम सल्फेट किंवा ५५ किलो युरिया) आणि ५० किलो स्फुरद (३०० किलो सिंगल सुपर फाॅस्फेट) प्रती हेक्टरी द्यावे. जमिनीला आवश्यक असल्यास प्रती हेक्टरी ३० किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावा. पालाशचा अतिरिक्त वापर टाळावा.  
    शेंगा चांगल्यारीतीने पोसण्यासाठी कॅल्‍शियमची आवश्यकता असते. त्याकरिता पीक ५० टक्के फुलोरावस्थेत असताना हेक्टरी ३०० ते ५०० किलो जिप्सम तासाच्या दोन्ही बाजूला सरळ ओळीमध्ये द्यावे. जिप्सममधून २४ टक्के कॅल्‍शियम व १८ टक्के गंधक पिकास मिळते. डीएपी हे खत वापरले असेल तर पिकाला जिप्सम देणे अत्यंत आवश्यक आहे. माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. 

बीज प्रक्रिया 
    थायरम ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे.
    पेरणीच्या दिवशी दहा किलो 
बियाण्यास २५० ग्रॅम रायझाोबियम जिवाणू संवर्धक आणि स्फूरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. याचबरोबरीने मर रोग प्रवण क्षेत्रामध्ये प्रती किलो बियाण्यास ट्रायकोडर्मा व्हिरीडी ४ ग्रॅम अशी प्रक्रिया करावी.

पेरणीची वेळ
    थंडी कमी होण्यास सुरवात झाल्यावर म्हणजेच जानेवारीच्या १५ ते २० तारखेच्या दरम्यान पेरणी करावी.
    उशिरात उशिरा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पेरणी पूर्ण करावी. पेरणी उशिरा झाल्यास पीक काढणीच्या वेळेस मोसमी पावसात सापडते. 
    उपट्या प्रकारातील जातीत सुप्तावस्था नसल्याने शेंगाना मोड येऊन नुकसान होते. तसेच खरीप पीक पेरणीस उशीर झाल्याने त्या हंगामातील पिकांवर देखील विपरीत परिणाम होतो.

पेरणीची पद्धत
    पेरणी सरी वरंबा पद्धत किंवा सपाट वाफा पद्धतीने पेरणी करावी. पेरणी टोकण पद्धतीने करताना एका ठिकाणी एकच बी पेरावे. 
    बियाण्याची उगवणशक्ती कमी असल्यास दोन बियाण्यातील अंतर कमी करावे. पेरणी दोन ते अडीच इंच खोल करावी. उगवण झाल्यानंतर खांडण्या ताबडतोब भरून घ्याव्यात. पेरणीनंतर हलके पठालण करून बी झाकावे. त्यामुळे पक्षी बी खाणार नाहीत. उगवण चांगली होण्यास मदत होईल. 
    टीएजी २४ जातीचे बियाणे ३० बाय १० सें. मी. अंतरावर पेरावे. म्हणजे हेक्टरी झाडांची संख्या ३.३३ लाख एवढी येईल.
     एसबी ११ या जातीचे बियाणे ३० बाय १५ सें. मी. किंवा ४५ बाय १० सें. मी. अंतरावर पेरावे.

सुधारित जाती
    उन्हाळी भुईमूग मे महिन्याअखेर पर्यंत निघणे आवश्यक असते. त्याकरिता ११० ते ११५ दिवसांत परिपक्व होणाऱ्या उपट्या प्रकारातील जातीची निवड करावी.
    उन्हाळी हंगामाकरिता टीएजी २४ आणि एसबी ११ या जातींची निवड करावी. 
    टीएजी २४ ही जात लवकर (उन्हाळी हंगामात ११० ते ११५ दिवसांत) परिपक्व होते. झाड मध्यम उंच आणि कमी प्रमाणात पसरते, शेंडेमर रोगास प्रतिकारक असून यामध्ये सुप्तावस्था नाही, पर्णिका लहान आकाराच्या असून गडद हिरव्या रंगाच्या असतात. शेंगाची चोच, जाळी आणि खाच मध्यम असून शेंगेत २-३ दाणे असतात. दाण्याचा रंग गुलाबी व उतारा ७०-७२ टक्के आहे.जमिनीचे व पाण्याचे योग्य नियोजन केल्यास वाळलेल्या शेंगाचे सरासरी उत्पादन प्रतिहेक्टरी २४.२६ क्विंटल मिळते. 
    सर्वसाधारणपणे हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे लागते, परंतु बियाण्याचे प्रमाण ठरविताना पेरणीकरिता निवडलेली जात, हेक्टरी झाडांची संख्या, १०० दाण्यांचे वजन, बियाण्याची उगवणशक्ती याचा विचार करावा. 
    शक्यतोवर खरीप हंगामातील बियाणे उन्हाळी हंगामात पेरणीकरिता वापरावे. शेंगा पेरणीपूर्वी खूप अगोदर फोडू नयेत. चांगले दाणे निवडून पेरणी करावी. शक्यतो स्वतःकडेच चांगले बियाणे तयार करावे.
  
- डाॅ. एम. वाय. लाडोळे, ९०११०२१२८३ (तेलबिया संशोधन विभाग डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com