सोयाबीन बीजोत्पादनातील ‘आदर्श’

आदर्श गटातील शेतकऱ्यांचा सोयाबीन बीजोत्पादन प्लॉट पाहताना अधिकारी व शेतकरीवर्ग.
आदर्श गटातील शेतकऱ्यांचा सोयाबीन बीजोत्पादन प्लॉट पाहताना अधिकारी व शेतकरीवर्ग.

सातारा जिल्ह्यातील नेवेकरवाडी येथील आदर्श शेतकरी सहकारी बचत गटाने सोयाबीन बीजोत्पादनाचा मार्ग निवडला. बागायती व जिरायती शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन कृषी विद्यापीठाच्या विविध वाणांचे बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात सातत्य ठेवले. दर्जेदार पीक व्यवस्थापनातून खात्रीशीर बियाण्याची निर्मिती करून परिसरातील शेतकऱ्यांत त्याबाबत खात्रीशीर ओळख तयार करण्यात हा गट यशस्वी झाला आहे.

सातारा जिल्ह्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या लगत असलेले नेवेकरवाडी (ता. जावली) हे सुमारे ११०० लोकवस्ती असलेले गाव. धोम धरणाचा उजवा कालवा गावच्या लगत भागातून गेल्याने बागायत शेती करण्याचे प्रमाण वाढले आहे. गावातील जयवंत किसन निकम हे उच्चशिक्षित प्रगतशील शेतकरी आहेत. एम. ए. (अर्थशास्त्र) हे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ नोकरीचा प्रयत्न केला. मात्र, काही काळानंतर पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. नेवेकरवाडी व शेजारील भिवंडी गावात त्यांचे प्रत्येकी अडीच एकर क्षेत्र आहे. सुरवातीस ते पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी टॅक्ट्रर खरेदी केला. शेती बागायत करण्यासाठी धोम उजवा कालव्यावरून एक किलोमीटर पाइपलाइन केली. सुरवातीच्या काळात उसाचे पीक घेतले जायचे. दरम्यान कृषी सहायक सुनील चौधरी यांची भेट झाली. त्यांनी गटशेतीचे फायदे सांगितले. तेथून निकम यांच्या कल्पनाशक्तीला अधिक चालना मिळाली.

शेतकरी आले एकत्र 
निकम यांच्या पुढाकारातून गावातील काही शेतकरी एकत्र आले. त्यातून आदर्श शेतकरी सहकारी बचत गटाची स्थापना झाली. सर्वांच्या चर्चेतून सोयाबीनचे बीजोत्पादन हा मुद्दा पुढे आला. आपण खात्रीशीर बियाणे तयार केले तर परिसरातील शेतकऱ्यांना जागेवरच ते उपलब्ध होईल. तसेच आपल्याही उत्पन्नात वाढ होईल असा सूर त्यातून निघाला. बीजोत्पादन सुरू झालेच. शिवाय २०१३ च्या दरम्यान गटाची आत्माकडे नोंदणीही झाली.  

बीजोत्पादनाला आली गती 
बीजोत्पादनासंबंधी जिल्हा बीज प्रमाणीकरण कार्यालयाकडे नोंदणी झाली. विक्रीचा परवानाही गटाने मिळवला. सर्व कायदेशीर व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्या. गटात सुमारे ११ शेतकरी आहेत. प्रत्येकाचे बीजोत्पादन क्षेत्र निश्‍चित झाले. पीक व्यवस्थापन सुरू झाले. 

मदत व मार्गदर्शन
‘आदर्श’ गटात सचिव मारूती मानकर, उपाध्यक्ष संदीप शिर्के, ज्ञानेश्वर सपकाळ, संतोष सपकाळ, विकास मोहिते, साहेबराव नेवेकर, मयुर नेवेकर, विश्वास सपकाळ, बबन शिर्के, दत्तात्रय पवार आदींचा समावेश आहे. जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी कैलास धुमाळ, श्री. काझी, कृषी सहायक रोहिणी जोशी, कृषी सहायक सुनील चौधरी आदींचे मार्गदर्शन मिळते. 

फायदेशीर बीजोत्पादन 
गटाचे अध्यक्ष निकम दरवर्षी सुमारे दोन ते तीन एकरांत बीजोत्पादन घेतात. प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी एकरी दहा क्विंटल  उत्पादन मिळते. बियाणे प्रती क्विंटल ७००० ते ९००० रुपये दराने विकण्यात येते. त्यासाठीचा उत्पादन खर्च किमान ३५०० रुपये असतो. प्रक्रिया, वाहतूक हे खर्च वेगळे असतात. साधारण १५०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल नफा मिळू शकतो. पूर्वी सर्वांचे मिळून १० टनांपर्यंत एकूण बियाणे उत्पादन असे. अलकडील काळात ते तीन टनांपर्यंत असल्याचे निकम यांनी सांगितले.

‘आदर्श’ गटाचे बीजोत्पादन (ठळक बाबी) 
  बीजोत्पादनाचा सुमारे पाच वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. 
  मुख्य पीक सोयाबीन. गहू बीजोत्पादनाही अनुभव घेतला. 
  जिल्हा बीज प्रमाणीकरण कार्यालयाकडे रीतसर नोंदणी. काढणी, मळणी झाल्यावर बियाणे तासगाव तालुक्यातील कवठे एकंद येथे प्रक्रियेसाठी पाठवले जाते. तेथेच प्रतवारी होते.
  त्यानंतर बियाण्याचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळा तपासणी पाठवण्यात येतात. 
  त्यानंतर टॅगिग होते. सर्व विक्री गटामार्फत स्थानिक शेतकऱ्यांना होते. 
  मिळणारे उत्पन्न बचत गटाच्या खात्यावर जमा झाल्यावर प्रत्येक शेतकऱ्याना चेकद्वारे रक्कम दिली जाते. 
  राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विविध वाणांची निवड.
  डीएस २२८, जेएस ९३०५, जेएस ३३५, एमएयूएस-७१, केडीएस ३४४, ७२६ या वाणांचा समावेश. 
  जिरायती, बागायती, पीक पक्व होण्याचा कालावधी, शेतकऱ्यांची मागणी यानुसार या वाणांचे क्षेत्र.
  पायाभूत व प्रमाणित असे दोन्ही प्रकारे बीजोत्पादन. 
  तयार झालेल्या बियाण्याची स्वतःच्या शेतात लावण करूनही होते तपासणी. 
  बीजोत्पादन प्लॅाटमध्ये आंतरपीक घेतले जात नाही.
  कमी क्षमतेच्या मळणी यंत्राचा होतो वापर.  
  तयार बियाण्याचे २५ किलो बॅगेद्वारे पॅकिंग. 
  त्यांची एकमेकांवर थप्पी लावली जात नाही. 
  बचत गटाच्या सदस्यांना बीजोत्पादनाबद्दल मार्गदर्शन. 

- जयवंत निकम, ९८५०९६८९४२ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com