द्राक्ष बागा वाचविण्यासाठी ऐन दिवाळीत धडपड 

द्राक्ष बागा वाचविण्यासाठी ऐन दिवाळीत धडपड 

-अपुऱ्या पावसाने पळशीतील द्राक्ष उत्पादक अडचणीत 
-उत्पादनासह निर्यातीमध्ये मोठी घट होण्याची भीती 

सांगली ः परतीच्या पावसाने ओढ दिली... प्यायला अन्‌ शेतीला तांब्याभर पाणी नाही... पिण्याच्या पाण्यासाठी गावात टॅंकरचा कधी कधी आवाज... निर्यातक्षम द्राक्ष बागा जगविण्यासाठी टॅंकरने पाणी देतो... यंदाची दिवाळी काही आमच्यासाठी भरभराटीची नाही... हंगामात सुमारे 50 टक्के नुकसान होण्याची भीती आहे, असे सांगताहेत निर्यातक्षम द्राक्षाची ओळख असणाऱ्या खानापूर तालुक्‍यातील पळशी गावचे द्राक्ष उत्पादक शेतकरी. 

खानापूर तालुक्‍यातील पळशी हे गाव निर्यातक्षम द्राक्ष बागेसाठी याची मोठी ओळख आहे. पण मॉन्सूनचा पाऊस नाही, परतीचा पाऊस नाही. पळशी गावात परतीचा पाऊस अंदाजे 4 ते 5 मिलिमीटर झाला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. परिणामी, द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत. बागा जगविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. गावात द्राक्षाची छाटणी पूर्ण झाली आहे. द्राक्ष फळ छाटणीनंतरच अपेक्षित फळ धारणा झाली नाही. तसेच त्याची वाढही होत नाही. त्यामुळे आताच अंदाजे 10 ते 15 टक्के उत्पादनात घट दिसू लागली आहे. 

या भागात पहिल्यापासूनच परकीय चलन येते आहे. त्यामुळे यंदा परकीय चलनाला ब्रेक लागणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. निर्यातक्ष द्राक्ष बागेमुळे रोजगारनिर्मिती झाली आहे. नाशिकसह परिसरातील मजूर या ठिकाणी कामाला येतात. त्यांच्यावरही आर्थिक व्यवहावर कुऱ्हाड आली आहे. शेतीला पाणी नाही. तरीसुद्धा बागा जगविण्याची जिद्द या गावातील शेतकऱ्यांकडे आहे. पळशी गावात पिण्यासाठी आणि शेतीसाठी टॅंकरने पाणी दिले जाते आहे. द्राक्ष बागा जगविण्यासाठी गावातील शेतकरी एकत्र येण्यास तयार आहेत. बागेला पाणी मिळविण्यासाठी वर्गणी काढून नेलकरंजी, हिरवे तसेच गावातून पाइपलाइनद्वारे पाणी आणण्यासाठी त्यांची तयारी आहे. मात्र शासनाने उर्वरित पैसे अथवा तत्काळ निधी मंजूर करून द्यावा, अशी मागणी होते आहे. तरच बागा वाचतील आणि परकीय चलन मिळू शकेल. 

आगामी निवडणुकीवर बहिष्कार? 
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका दोन महिन्यांवर आल्या आहेत. गावाला पाण्याची सोय झाली नाही, तर येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची चर्चा गावातील लोकांनी सुरू केली आहे. ग्रामपंचायतीमध्ये याबाबतचा ठराव ग्रामसभेत घेण्यात येणार असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. 

लोकप्रतिनिधी आणि शासनाचे दुर्लक्ष 
पळशी या गावाला परिसरातून पाणी उपलब्ध होऊ शकते. भिवघाटसह अन्य परिसरात शासनाच्या योजना आहेत. त्या योजनेतून पाणी दिले तर आमच्या निर्यातक्षम द्राक्ष बागा वाचू शकतील. पळशीच्या हद्दीत मात्र त्याकडे लोकप्रतिनीधींसह शासनाने दुर्लक्ष केले आहे. 

ग्रामसभेत ठराव घेणार 
परिसरातील गावातून टॅंकरने पाणी न्या. अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. या गावातील विहीर, बोअरवेलला पाइपलाइन करून पाणी दिले जाणार नाही, असे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेत असे ठराव घेणार असल्याची चर्चा पडद्यामागे सुरू आहे. त्यामुळे या गावांची काय भूमिका असणार आहे. याकडेही पळशी गावातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

यंदाच्या हंगामातील मोठे नुकसान होणार आहे. द्राक्ष बागा जगवल्या आहेत. मात्र उत्पादनात घट आतापासून दिसते आहे. त्यामुळे आर्थिक झळ बसणार आहे. 
-पंकज पिसे, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी, पळशी, ता. खानापूर 

परतीच्या पावसावर आमच्या द्राक्ष बागांचे भवितव्य असते. मात्र परतीचा पाऊस फार कमी प्रमाणात झाला आहे. पाण्याची टंचाई वर्षापासून आहे. 
-संभाजी जाधव, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी, पळशी, ता. खानापूर 

निर्यातक्षम द्राक्ष क्षेत्र ः 300 एकर 
हंगामात युरोपला जाणारे कंटेनर ः अंदाजे 300 ते 400 
उत्पादन घटीचा अंदाज ः अंदाजे 50 टक्के 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com