स्वतःचा ‘कल्टीवेटर’ बनविण्यात यश 

Sunil ghumutkar
Sunil ghumutkar

एखाद्या शेतकऱ्याची नेमकी गरज दुसरा शेतकरीच समजू शकतो आणि असा शेतकरी जर चांगला कारागीर असेल तर त्याच्याकडून होणारे कामही तितकेच चांगले होते. कान्हूर-पठार (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील सुनील बाबूराव घुमटकर यांचा आधुनिक शेती अवजारे बनवण्याचा व्यवसाय आहे. तसा हा व्यवसाय छोटा; पण ह्या भागातील शेतकऱ्यांसाठी बहुमोलाचा. सुनील यांची घरची वडिलोपार्जित २० गुंठे शेती. दोन भाऊ व एक बहीण असा मोठा परिवार. सुनील अवघ्या पाच वर्षाचा असताना डोक्यावरून वडिलाचे छत्र अचानक हरपले. आई अशिक्षित; परंतु आलेल्या संकटाशी दोन हात करून तिने शेतमजुरी करत संसाराचा गाढा नुसताच हाकला नाही तर सर्व मुलांना शिक्षण दिले. सुनीलने पडेल ते काम करत कलाशाखेतील द्वितीय वर्षापर्यंतचे शिक्षण पूर्ण केले; पण त्यानंतर खर्च न पेलवल्याने शिक्षण सोडून पूर्ण वेळ कामधंद्याकडे लक्ष देण्याचे ठरवले. गावातील राजेंद्र लोंढे यांच्या सूचनेनुसार सुनील विज्ञान आश्रम (पाबळ, जि. पुणे) येथे कौशल्य शिक्षणासाठी रुजू झाला. 

शिकण्याची जिद्द, पडेल ते काम करण्याची तयारी आणि मन-मिळाऊ स्वभाव ह्यामुळे सुनील लवकरच विज्ञान आश्रमात रुळला आणि सर्वांचा लाडकाही झाला. विज्ञान आश्रमातील इलेक्ट्रॉनिक्स, गृह-आरोग्य, शेती पशुपालन आणि अभियांत्रिकी ह्या विभागांपैकी अभियांत्रिकी विभाग सुनीलच्या विशेष आवडीचा होता. ह्या विभागामध्ये ‘कमवा आणि शिका’ योजनेमुळे सुनीलला विविध प्रकारची कौशल्ये तर मिळालीच शिवाय, परिसरातील शेतकरी आणि इतर ग्राहकांशी प्रत्यक्ष संवादही साधता आला. अभियांत्रिकी कौशल्य शिकून कमी खर्चात स्वताचा व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास सुनीलला एक वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमातून मिळाला. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर पुढील एक वर्षासाठी, विज्ञान आश्रमातील अभियांत्रिकी विभागात ‘निदेशक आणि सहायक संशोधक’ या कामासाठी उमेदवारी केली. या कालावधीत सुनीलने आश्रमातील ‘शेतकऱ्यांसाठीची कमी खर्चातील अवजारे’ या संशोधक प्रकल्पामध्ये काम केले. दरम्यान, छोट्या शेतकऱ्यांसाठीचा कमी खर्चातील ‘मेक-बुल’ ट्रॅक्टर आणि त्यासाठीच्या अवजारांच्या प्रकल्पाचे काम सुनीलला अनुभवता आले. यातूनच पुढे शेतकऱ्यांसाठीची अवजारांच्या व्यवसायाचे बीज रोवले गेले. 

विज्ञान आश्रम आणि इतर वेल्डिंग व्यवसायातील उमेदवारी करत सुनीलने सुनीलने १९९८ मध्ये ‘माऊली वेल्डिंग फॅब्रिकेशन’ या स्वतःच्या व्यवसायाची सुरवात केली. छोट्या शेतकऱ्यांसाठी एक बैलजोडी वर्षभर सांभाळण्यापेक्षा छोटे ट्रॅक्टर फायद्याचे ठरू शकतात, हे विज्ञान आश्रमातील कामादरम्यान सुनीलच्या लक्षात आले होते; पण असे ट्रॅक्टर अजून बाजारात उपलब्ध नव्हते. म्हणून बैलजोडीसाठीची कमी वजनाची आणि जास्त कार्य क्षमता असणारी अवजारे बनवण्यावर सुनीलने लक्ष केंद्रित केले. त्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या अडचणी, अनुभव समजून घेतले. कमी वजन, कमी किंमत आणि शेतकऱ्यांच्या गरजेनुसार व बदलानुकारी किवा माती-पिकांनुसार जुळवून घेणारी अवजारे बनवणे यात त्याने आपली एक ओळख तयार केली. हे करत असताना बैलजोडीला पर्याय शोधण्याचेही काम सुरूच होते. विज्ञान आश्रम तयार झालेला ‘मेच-बुल’ हा १० एचपीचा छोटा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना दाखवणे, शेतीप्रदर्शनांना भेटी देऊन छोट्या अवजारांचा अभ्यास करणे हा सुनीलचा छंद बनला. त्यातून पुढे गुजरात राज्यातून अशा छोट्या ट्रॅक्टर किवा कल्टीवेटरचे सुटे भाग आणून छोटी ‘प्रायोगिक’ अवजारे सुनील बनवू लागला. प्रत्येक भागातील माती आणि पीक लागवडीची पद्धत वेगळी असते. त्यामुळे गुजरात किवा इतर राज्यांतील ‘कल्टीवेटर’ आपल्या भागात व्यवस्थितपणे चालत नाहीत. शिवाय असे कल्टीवेटर ‘डीलर’च्या मार्फत घेताना त्याची मूळ किंमत वाढत जाते. शिवाय त्यामध्ये काही बिघाड झाल्यास किवा बदल करायचा झाल्यास शेतकऱ्यांना खूप अडचणी येतात. हे लक्षात घेऊन स्वतःचे कल्टीवेटर बनवण्याचे सुनीलने ठरवले. त्यासाठी लागणारे सुटे भाग मिळवून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार पाच ते आठ एचपीपर्यंतचे कल्टीवेटर बनवले जातात. हे कल्टीवेटर बाजारातील इतर ब्रॅंडपेक्षा पाच ते १० हजार रुपये स्वस्त आहेत. स्वतःच्या गावाजवळ कल्टीवेटर विकण्यावर सुनीलचा जोर आहे. इतर जिल्हातील शेतकऱ्यांना ‘विक्रीपश्चात सेवा’ देण्यात अडचणी येत असल्याचे सुनील सांगतो. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार या कल्टीवेटरसाठीची अवजारे विकसित करण्यावर सुनीलने लक्ष केंद्रित केले आहे. सध्या माऊली फॅब्रिकेशनमध्ये दोन-तीन पूर्ण वेळ कामगार आहेत. या व्यवसायातून महिन्याला ४० ते ५० हजार रुपयांचा नफा होतो, असे सुनील अभिमानाने सांगतो. 

संपर्कः सुनील बाबूराव घुमटकर
मु.पो. कान्हूर पठार, ता. पारनेर, जि. अहमदनगर ४१४३०३
 : ७०३०५०९३९५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com