उन्हाळ्यातील केळी बागेचे व्यवस्थापन

उष्णलाटांपासून केळी बागेचे संरक्षण करण्यासाठी वारारोधक कुंपण  महत्त्वाचे असते.
उष्णलाटांपासून केळी बागेचे संरक्षण करण्यासाठी वारारोधक कुंपण महत्त्वाचे असते.

उष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी होते, बाष्पीभवनाचा वेग वाढतो. याचा विपरित परिणाम झाडांच्या वाढीवर व घड पोसण्यावर होतो. वेगवान वाऱ्यामुळे झाडांची पाने फाटतात. परिणामी प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते.

महाराष्ट्रामध्ये केळी पिकाची जून महिना (मृगबाग) आणि ऑक्टोबर महिन्यात (कांदे बाग) लागवड केली जाते. उन्हाळ्यात मृगबाग ही घड निसवणीची अवस्था पूर्ण करून घड पक्वतेच्या आणि कांदे बाग मुख्य शाखीय वाढीच्या अवस्थेत असते. उन्हाळ्यातील सरासरी तापमानात होणारी वाढ, वादळी वारे व गारपीट यामुळे केळी बागांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे उन्हाळ्यात केळी बागांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्‍यक असते.

अधिक तापमान व तीव्र सूर्यप्रकाशाचा होणारा परिणाम 
    तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर झाडांची प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते. तीव्र सूर्यप्रकाशामुळे पानांची पश्‍चिमेकडील कडा करपते.
    नवीन लागवड केलेल्या रोपांच्या पानांची सुरळी होऊन पाने उमलत नाहीत. पाने पांढरी राहून करपली जातात. करपलेल्या ठिकाणी काळे डाग उमटले जातात.
    तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर झाडांमधील पाण्याचे होणारे उत्सर्जन बाष्पीभवनाद्वारे वेगाने होते. झाडांमधील विकर आणि संप्रेरकांची कार्यक्षमता कमी होते. बऱ्याच वेळा ते नष्ट होतात.
    उन्हाळ्यात जमिनीचे तापमान वातावरणातील तापमानापेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने अधिक असते. यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत जातो. याचा झाडाच्या अन्नद्रव्य शोषून घेण्याच्या क्रियेवर विपरीत परिणाम होतो. मुळांची वाढ खुंटते.
    वातावरणातील आर्द्रता २० ते १० टक्के पर्यंत खालावते. या सर्व बाबींचा परिणाम केळीच्या एकूण वाढीवर होतो. वाढ खुंटते.
    घड निसवणीच्या अवस्थेत असताना निसवण पूर्णपणे न होऊन घड अडकतात, बाहेर पडत नाही. निसवलेल्या घडातील वरच्या बाजूच्या फण्या तीव्र सूर्यप्रकाशामुळे करपतात आणि वाळून जातात. घडांचा दांडा काळा पडून घड सटकण्याचे व फण्या गळण्याचे प्रमाण वाढते. झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण वाढते.

उष्ण लाटा 
    उष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी होते, बाष्पीभवनाचा वेग वाढतो. याचा विपरीत परिणाम झाडांच्या वाढीवर व घड पोसण्यावर होतो.
    वेगवान वाऱ्यामुळे झाडांची पाने फाटतात. परिणामी प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते. वादळी वारा व गारपिटीमुळे झाडांची पान फाटून पूर्णंत नष्ट होतात, घड पडतात, घड व खोडावर जखमा होतात, झाडे उन्मळून पडतात.

बागांचे व्यवस्थापन 
लागवड हंगाम आणि अंतर 

    मृगबहारातील लागवड जून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच करावी. लागवड उशिरा म्हणजेच ऑगस्ट पर्यंत केल्यास, घड निसवण्याचा कालावधी मार्च-एप्रिल मध्ये येतो. या काळात अधिक तापमान आणि कमी आर्द्रतेमुळे घड अडकण्याची तसेच व्यवस्थित पोसले न जाण्याची दाट शक्यता असते.
    महाराष्ट्रातील प्रमुख केळी लागवड क्षेत्रात उन्हाळ्यात सरासरी तापमान ४२ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक असते. या दृष्टिकोनातून केळीची लागवड शिफारस केलेल्या १.५ बाय १.५ मीटर अंतरावर करावी. जेणेकरून उन्हाळ्यात बागेचे तापमान वाढणार नाही. बागेची आर्द्रता टिकून राहील.
    शिफारशीपेक्षा अधिक अंतरावर लागवड केल्यास घड सटकणे आणि झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण वाढते.

वारारोधक कुंपण 
    सर्वच फळबागांच्या व्यवस्थापनामध्ये वारारोधक कुंपणाची भूमिका महत्त्वाची असते. उन्हाळ्यात वाहणाऱ्या उष्णलाटांपासून केळी बागेचे संरक्षण करण्यासाठी वारारोधक कुंपण खूप महत्त्वाचे असते.
    केळीला इतर वृक्षांसारखे खोड नसते. केळीचा जमिनीवरील भाग पाने तसेच पानांच्या देठाचा असतो, यालाच ‘आभास खोड’ असेही म्हणतात. केळीची मुळे उथळ असतात. याकरिता केळी लागवड केल्यानंतर त्वरित बागेच्या चारी बाजूंनी वारारोधक झाडांची लागवड करावी.
    वारारोधक झाडांची लागवड बागेच्या बाहेरील कड्याच्या ओळीपासून २ मी. अंतर सोडून करावी. लागवडीसाठी शेवरी, गजराज गवत, बांबू या झपाट्याने वाढणाऱ्या पिकांची दोन ओळींची दाट लागवड करावी. या सजीव कुंपणाची वाढ उन्हाळ्यापर्यंत पूर्ण होते.या कुंपणामुळे बागेचे तापमान, आर्द्रता टिकून राहते. बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. केळीच्या झाडाची पाने कमी प्रमाणात फाटतात. घड सटकणे आणि झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण कमी होते.

- प्रा.एन.बी.शेख, ०२५७ २२५०९८६ (केळी संशोधन केंद्र, जळगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com