हिवरेबाजार शिवारात सीताफळांचा गोडवा

custard-apple
custard-apple

आदर्श गाव हिवरेबाजार (ता.जि. नगर) गावासह पंचक्रोशीत गेल्या पाच वर्षांत सीताफळाचे क्षेत्र वाढत आहे. पाच वर्षांपूर्वी पद्मश्री पोपटराव पवार यांनी गावशिवारात सीताफळाची लागवड केली. या लागवडीचे यश पाहून हिवरेबाजारसह परिसरातील दहा गावांच्या शिवारांत शंभर एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर सीताफळ लागवड झाली आहे. कोरडवाहू पट्ट्यात एक आश्‍वासक पीक म्हणून सीताफळ पुढे आले आहे.

नगर तालुक्यातील पश्‍चिम भागात असलेले आणि नगर शहरापासून सतरा किलोमीटर अंतरावरील हिवरेबाजार या गावाचा देश आणि विदेशात आदर्शगाव म्हणून नावलौकिक आहे. हिवरेबाजार आणि परिसरातील साधारण वीस किलोमीटरचा परिसर तसा दुष्काळी. या भागात संपूर्ण पावसाळ्यात केवळ अडीचशे ते चारशे मिलिमीटर पाऊस पडतो. गावचे सरपंच म्हणून पोपटराव पवार यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्राधान्याने  लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांसह विविध उपक्रम राबवले, त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. त्यामुळे कमी पावसातही गाव शिवारात पुरेशा पाण्याची उपलब्धता असते. कमी पाण्यावर येणाऱ्या इतर हंगामी पिकांसोबत आता या भागातील शेतकरी फळपिकांकडे वळले आहेत. शेतकऱ्यांनी प्रामुख्याने सीताफळ लागवडीला प्राधान्य दिले आहे. 

लागवडीला चालना
दुष्काळी भागाला फायदेशीर असलेल्या सीताफळाची हिवरेबाजारमध्ये पाच वर्षांपूर्वी पहिल्यांदा लागवड केल्यानंतर पोपटराव पवार यांनी एमएमके गोल्डन सीताफळाचे संशोधक शेतकरी नवनाथ कसपटे यांचे गावामध्ये सीताफळ लागवडीबाबत चर्चासत्र ठेवले होते. पोपटराव पवार यांनी केलेली लागवड आणि कसपटे यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हिवरे बाजारसह परिसरातील जखणगाव, हिंगणगाव, वडगाव आमली, टाकळी- खातगाव, तसेच पारनेर तालुक्यातील काळकुप, माळकुप, दैठणे गुंजाळ गाव शिवारांत सीताफळ लागवडीला चालना मिळाली. आतापर्यंत परिसरातील गावांमध्ये शंभर एकरांहून अधिक क्षेत्रावर सीताफळ लागवड झाली आहे.

प्रक्रिया उद्योगाचे नियोजन
हिवरेबाजार आणि परिसरातील गावात सीताफळाची लागवड वाढत आहे. याशिवाय गेल्या दोन वर्षांपासून अन्य भागांतही सीताफळ लागवड वाढत आहे. कोणत्याही पिकाचे उत्पादन वाढले, की त्याचा दर आणि अन्य बाबींवर परिणाम होतो. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. गेल्या दोन वर्षांतील लागवडीचे वाढते चित्र पाहता हिवरेबाजारमध्ये सीताफळ प्रक्रिया उद्योग उभारण्याचे नियोजन पोपटराव पवार यांनी केले आहे.

आमच्या भागात पाऊस कमी असल्याने पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर होतो. दरवर्षी पाण्याचा ताळेबंद मांडूनच पुढील नियोजन केले जाते. अलीकडच्या काळात आमच्या शिवारात फळपिकांची लागवड वाढली असून, त्यात सीताफळाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. गावामध्ये मी पहिल्यांदा सीताफळ लागवड केल्यानंतर आता अनेक शेतकरी सीताफळांकडे वळले आहेत. कमी पाण्यात येणारे आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर म्हणून सध्या सीताफळांकडे पाहिले जात आहे. पीक लागवडीच्या बरोबरीने आम्ही प्रक्रिया उद्योगावरही लक्ष केंद्रित केले आहे. 
— पद्मश्री पोपटराव पवार, 
(कार्याध्यक्ष, आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समिती, महाराष्ट्र राज्य)

दृष्टिक्षेपात हिवरेबाजारमधील शेती
रब्बी ज्वारी- १४६ हेक्टर, खरीप कांदा- १९० हेक्टर, रब्बी कांदा- ४९ हेक्टर, हरभरा- १६५ हेक्टर, भाजीपाला- १४  हेक्टर, चारापिके- ६५ हेक्टर, गहू- १०५ हेक्टर, चाऱ्यासाठी ऊस- ५ हेक्टर, फूल पिके- १० हेक्टर, वाटाणा- ९ हेक्टर, फळबाग ४९ हेक्टर, तूर- १० हेक्टर, मटकी- ३ हेक्टर, हुलगा- ४ हेक्टर, बाजरी- १०९ हेक्टर

हिवरेबाजारात रुजले सीताफळ
शास्त्रशुद्ध जल, मृद्‍संधारणाच्या कामामुळे हिवरेबाजारातील शिवारात शेताला पुरेसे पाणी उपलब्ध होऊ लागले. मात्र शेती आणि वापरासाठी पाण्याचा ताळेबंद मांडत जास्तीचे पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी कमी पाण्यावरील पिके घेण्याकडे येथील शेतकऱ्यांनी कायम प्राधान्य दिले. देशभर हिवरेबाजारचा नावलौकीक करणाऱ्या पोपटराव पवार यांनी २०१५ मध्ये त्यांच्या पाच एकर शेतात सर्वप्रथम सीताफळ लागवडीचा शुभारंभ केला. नवनाथ कसपटे यांनी संशोधित केलेल्या एनएमके गोल्डन सीताफळ जातीची १५ फूट बाय १५ फूट अंतरावर लागवड केली. 

सीताफळ लागवडीबाबत माहिती देताना प्रसन्न पोपटराव पवार म्हणाले, की आमची जमीन हलकी, मध्यम प्रकारची आहे. या जमिनीत आम्ही पाच वर्षांपूर्वी सीताफळ लागवड केली. या लागवडीला माती परीक्षणानुसार ८० टक्के सेंद्रिय आणि २० टक्के रासायनिक खतांचा वापर करतो. पहिली दोन वर्षे जूनमध्ये जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी ताग, धैंचा या हिरवळीच्या पिकांचीही लागवड केली होती. सेंद्रिय खतामध्ये प्रामुख्याने शेणखत, स्लरीचा वापर केला जातो. तसेच गरजेनुसार ठिबक सिंचनामधून विद्राव्य सेंद्रिय खत, जिवाणूसंवर्धक दिले जाते. याशिवाय पाण्यामध्ये गोमूत्र मिसळून साधारण तीन फवारण्या करतो. तसेच ठिबक सिंचनातूनही गोमूत्र दिले जाते. या वर्षी हिवरेबाजार शिवारात सर्वाधिक पाऊस झाला. या काळात बागेत पाणी साचून झाडांचे नुकसान होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. सततच्या पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही याकडेही लक्ष दिले. योग्य व्यवस्थापन आणि सेंद्रिय खतांच्या वापरामुळे फळांची गुणवत्ता आणि आकारही चांगला मिळाला आहे.  गेल्या वर्षीपासून फळांचे अपेक्षित उत्पादन सुरू झाले. गेल्या वर्षी पाच एकरांतून १० टन उत्पादन मिळाले. यंदाच्या हंगामातील फळांचे उत्पादन नोव्हेंबरपासून सुरू झाले असून, डिसेंबरपर्यंत चालेल. पहिल्या टप्प्यात आम्हाला सहा टन सीताफळाचे उत्पादन मिळाले आहे. यंदा एकूण १६ टन उत्पादनाची अपेक्षा आहे.  

उत्पादकांचा गट
सीताफळ विक्रीबाबत आशिष पवार म्हणाले, की आमच्या गावातील दहा शेतकऱ्यांनी २५ एकरावर सीताफळ लागवड केली आहे. या दहा शेतकऱ्यांचा मिळून सीताफळ उत्पादक गट तयार झाला आहे. या गटामुळे पीक व्यवस्थापन आणि विक्रीचे नियोजन सोपे जाते. पुण्यातील गुलटेकडी आणि मुंबईतील वाशी बाजारपेठेत आम्ही सीताफळे विक्रीस पाठवितो. यंदाच्या हंगामात आम्हाला प्रति किलोस सरासरी ५० ते ९० रुपये प्रति किलो दर मिळत आहे. आतापर्यंत सहा टन सीताफळांची विक्री केली आहे. दर आठ दिवसांनी तोडणी केल्यानंतर प्राथमिक प्रतवारी करून क्रेटमधून थेट व्यापाऱ्यांना सीताफळे पाठवली जातात. दोन, तीन शेतकरी मिळून सीताफळाची वाहतूक केली जाते. व्यापारी वजनानंतर पट्टी करून दरानुसार रक्कम खात्यावर जमा करतात. 

सीताफळात घेतले आंतरपीक
पाच एकरांतील सीताफळ लागवड क्षेत्रात आंतरपीक म्हणून पहिली चार वर्षे कांदा, मूग आणि हरभऱ्याचे आंतरपीक पवार यांनी घेतले. याबाबत प्रसन्न पवार म्हणाले, की आंतरपिकामुळे सीताफळ लागवड, ठिबक सिंचन आणि खत व्यवस्थापनाचा खर्च निघून गेला आहे. साधारणपणे पहिली चार वर्षे आंतर पीक म्हणून खरीप कांदा दोन एकर, मूग तीन एकर आणि हरभरा तीन एकर, तसेच झेंडू लागवड आम्ही केली होती. कांद्याचे १२० क्विंटल, मुगाचे १२ क्विंटल आणि हरभऱ्याचे २० क्विंटल उत्पादन आम्हाला मिळाले होते. आम्ही गेल्या तीन वर्षांपासून सीताफळाची रोपे तयार करत आहोत. या वर्षी साधारण पाच हजार रोपे तयार आहेत. दोन वर्षांपूर्वी आम्ही दीड एकरावर कोकण बहाडोली या जांभळाच्या जातीची लागवड केली. गेल्या वर्षी अडीच एकर क्षेत्रावर १४ फूट बाय ८ फूट अंतरावर फुले पुरंदर आणि एनएमके गोल्डन सीताफळ जातीची लागवड केली आहे.

  प्रसन्न पोपटराव पवार, ७७४१९८५५५३
  अशिष गोपिनाथ पवार, ९५५२७४८४८४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com