टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूस

‘एफएओ’ने प्रसारित केलेला टोळधाडीच्या मार्गक्रमणाचा नकाशा.
‘एफएओ’ने प्रसारित केलेला टोळधाडीच्या मार्गक्रमणाचा नकाशा.

पुणे - देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या टोळधाडीने मे महिन्यात धुडगूस घातला आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाना, गुजरात, पंजाब, दिल्ली आणि महाराष्ट्रात टोळधाडीने शिरकाव केला असून पिके फस्त करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेशात सर्वाधीक नुकसान झाले आहे. आधीच लॉकडाउनमुळे शेतीला मोठा फटका बसला असताना आता हे नविन संकट शेतकऱ्यांपुढे आले आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात लॉकडाउन सुरु आहे. लॉकडाउमध्ये वाहतुक सुविधांचा अभाव आणि स्थलांतरावर बंदी आल्याने त्याचा सर्वाधीक फटका शेतीला बसला आहे. काढणीअभावी शिल्लक राहिलेला भात आणि गहू आता पूर्वमोसमी पाऊस आणि अम्फान वादळाने हातचा गेला. काही भागातील शिल्लक राहिलेल्या पिकांचा आता टोळधाडीने फडशा पाडण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या हंगामात डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत टोळधाडीने आक्रमण झाले होते. त्यानंतर लगेच दोन महिन्यानंतर पुन्हा हे संकट दाखल झाले आहे. इराण आणि पाकिस्तानमधील बलुचिस्तान येथे जन्मलेले आणि परिपक्व झालेले हे टोळ राजस्थानमध्ये दाखल होऊन इतर राज्यांमध्ये पसरले आहेत.

राजस्थानमधील १८ जिल्ह्यांमध्ये म्हणजेच अर्ध्या राज्यात टोळधाडीने आक्रमण केले आहे. तर, उत्तर प्रदेशातील १७ जिल्ह्यांत टोळधाडीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच मध्यप्रेदशातील ८ जिल्ह्यांमध्ये थैमान घालण्यास सुरवात केली आहे. राजस्थान आणि हरियानातून टोळ दिल्लीमध्ये प्रवेश करत आहेत. टोळधाडीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्राच्या चार टीम आणि राज्य कृषी विभाग मिळून किडनाशक फवारणी करत आहेत.

देशात एरव्ही नोव्हेंबरपर्यंतच राहणारे टोळ फेब्रुवारीपर्यंत होते. शास्त्रज्ञांच्या मते देशातील पोषक वातवारणामुळे असे घटले. तसेच मे मध्ये त्यांचे आगमन झाले.

काय आहे टोळधाड?
टोळ ही एक विध्वंसक कीड आहे. टोळांच्या एक थवा हा एक किलोमीटर ते शेकडो किलोमीटरपर्यंत असू शकतो. एक किलोमीटरच्या एका थव्यात जवळपास ८ कोटी टोळ असतात. एक टोळ जवळपास दोन ग्राम किंवा त्याच्या वजनाएवढी हिरवी वनस्पती फस्त करू शकतो. टोळधाड एका दिवसांत १३० किलोमीटरपर्यंत प्रवास करु शकते. ‘एफएओ’च्या मते, ‘‘चार कोटी टोळांचा एक थवा ३५ हजार लोकांना पुरेल एवढे अन्न एका दिवसांत फस्त करतो. प्रतिमानसी २.३ किलो अन्न गृिहत धरण्यात आले आहे. म्हणजेच ८० हजार ५०० किलो अन्न एक टोळांचा थवा एका दिवसांत फस्त करु शकतो.

या पिकांना धोका
अनेक राज्यांमध्ये सध्या उन्हाळी मूग, कापूस, उडिद, मका, मिरची, भाजीपाला आणि फळबागा पिके शेतकऱ्यांनी जिवापाड जोपासली आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, टोळधाडीवर वेळीच नियंत्रण आणले नाही आणि टोळ असेच विस्तारत राहिल्यास हि सर्व पिके टोळ फस्त करतील, यामुळे शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपयांचा फटका बसेल. त्यामुळे टोळधाडीवर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. 

राजस्थानमधील १८ जिल्हे प्रादुर्भावग्रस्त
राजस्थानधील जवळपास निम्म्या जिल्ह्यांमध्ये टोळधाडीचा प्रादुर्भाव झाला आहे. जवळपास १८ जिल्ह्यांमध्ये टोळधाडीने शिरकाव केला असून राज्य कृषी विभागाने शेतकऱ्यांना टोळ नियंत्रणासाटी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने त्यावर नियंत्रण मिळविणे अवघड झाले आहे. गेल्यावेळी राज्यात केवळ ११ जिल्ह्यांत टोळधाडीचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र सध्या जैसलमेर, बारमेर, जालोर, सिरोही, सिकार, जाधपूर, अजमेर, जयपूर, दौसा, धोलपूर, करौली, पाली, गंगापूर, हनुमानगड, चित्तोडगड, झुनझुनू, अलवार, राजसमंद या जिल्ह्यांमध्ये टोळधाडीने धुडगूस घातला आहे. 

शहरांमध्येही उच्छाद
टोळधाड आतापर्यंत ग्रामिण भागात, त्यातही शेत शिवारांमध्ये येत होती. मात्र आता टोळधाडीने शहरी भागांंकडेही आपला मोर्चा वळविला आहे. राजस्थानधील जयपूर, दाऊसा आणि अजमेर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात टोळांनी शिरकाव केला आहे. शहरांमध्ये टोळनियंत्रणासाठी कीडनाशकांची फवारणी करणे शक्य होत नाही. कारण हे कीडनाशक मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे टोळ शहरांच्याबाहेर येत नाही तोपर्यंत त्यावर फवारणी करणे शक्य नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

उत्तर प्रदेशातील १७ जिल्ह्यांमध्ये धोका
राजस्थानमधील दाऊसा जिल्ह्यातून उत्तर प्रदेशातील जवळपास १७ जिल्ह्यांमध्ये टोळधाड शिरकाव करत आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा, अलिगड, मथुरा, बुलंदशहर, हाथ्रस, इताह, फिरोजाबाद, मैनपुरी, इटावाह, फारुखाबाद, औरैया, जालौन, कानपूर, झाशी, माहोबा, हामीरपूर आणि ललितपूर या जिल्ह्यांमध्ये टोळधाडीचा धोका निर्माण झाला आहे. ‘‘राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाना या राज्यांच्या सिमेलगच्या जिल्ह्यांना टोळ नियंत्रणासाठी उपाय सुचविले आहेत. तसेच शेतकरी सुचविण्यात आलेली कीडनाशके ट्रॅक्टर स्प्रेअर, पॉवर स्प्रेअपरद्वारे फवारू शकतात,’’ असे राज्य कृषी विभागाने सुचविले आहे.

मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत शिरकाव
टोळधाडीने पश्‍चिम मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिरकाव केला आहे. राज्यातील मंदसोर जिल्ह्यातील मल्हारगड भागात टोळधाडीने मोठे नुकसान केले. उज्जैन जिल्ह्यातही अनेक पिकांचा फडशा टोळांनी पाडला आहे. तसेच पानभीर, उज्जैन, मंदसोर, निमूच, अगार-मालवा आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये टोळधाडीने शिरकाव केला आहे. ‘‘शेतकऱ्यांनी ड्रम अथवा इतर साहित्याचा वापर करून मोठा आवाज करावा किंवा कृषी विभागाने सुचविलेल्या रसायनांची फवारणी करावी,’’ असे कृषी विभागाने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com