‘एक घर-एक फळझाड' उपक्रमातून वृक्ष लागवड

सूर्यकांत नेटके
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे मित्रमंडळी एकत्र आली आणि त्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तरुणांनी पिंपळगाव वाघा (जि. नगर) या गावाची निवड केली. या गावामध्ये ‘एक घर एक फळझाड’ उपक्रम राबवला.

नगर  : वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे मित्रमंडळी एकत्र आली आणि त्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तरुणांनी पिंपळगाव वाघा (जि. नगर) या गावाची निवड केली. या गावामध्ये ‘एक घर एक फळझाड’ उपक्रम राबवला. या उपक्रमातून सुमारे साडेतीनशे झाडांची लागवड करण्यात आली आहे. लावलेली झाडे जोपासले जातात की नाही यावर ही या तरुणांचे लक्ष राहणार आहे.

नगर शहरानजीक असलेल्या केडगाव येथे नोकरी व्यवसाय शिक्षण व अन्य वेगवेगळ्या कारणांनी विविध भागांतील तरुण राहतात. या तरुणांनी विधायक चर्चेसाठी ‘चहा टपरी कट्टा’ तयार केला. या चर्चेतून तरुणांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड करण्याचा घेतला. 

दत्ता उरमडे यांच्या पुढाकारानेच वृक्ष लागवडीसाठी पिंपळगाव वाघा गावाची निवड करण्यात आली. या उपक्रमात ग्रीन लाइफ फाउंडेशन व चहा टपरी कट्टाचे अमोल पवार, सागर अकोलकर, तेजश्री देवढे, अलका क्षेत्रे, करण गोफणे, राजेश मोरे, भूषण गुंड, विवेक उदावंत, संदेश कोल्हे, मनोज पवार, सिद्धू कोतकर यांच्यासह पिंपळगाव वाघा गावातील ग्रामपंचायतीचे उपसरपंच बबन नाट, सदस्य पारुबाई नाट, नुतन उरमुडे, नामदेव शिंदे, भाऊसाहेब नाट यांच्यासह गावकरीही उत्साहाने सहभागी झाले. 

तरुणांच्या पुढाकारातून ‘एक घर, एक फळझाड’ उपक्रमासाठी रक्कम जमा करत साडेतीनशे झाडे गावकऱ्यांना लागवडीसाठी देण्यात आली. यामध्ये केसर आंबा, सीताफळ, जांभूळ, अशोक, वड यासह अन्य झाडांचा समावेश आहे. या उपक्रमाचे गावशिवारात कौतुक होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree planting activities