तूर खरेदी केंद्रांबाबत केंद्राला प्रस्ताव पाठवणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

-पणनमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती 
-१५ मार्चनंतरही केंद्रे सुरू ठेवण्याचे प्रयत्न 

मुंबई, - राज्यात यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. आवक वाढून कमी दर मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी १५ मार्चनंतरसुद्धा किमान आधारभूत किमतीने तूर खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. 

किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या शेतमाल खरेदीसंदर्भात आयोजित आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. बैठकीला पणन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, पणन महामंडळाचे संचालक सुनील पवार, मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक एन. नवीन सोना, नागपूर मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक एस. हरिबाबू, वखार महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक सुधाकर देशमुख, नाफेडच्या मुंबई शाखा व्यवस्थापक श्रीमती वीणा कुमारी, भारतीय अन्न महामंडळाचे सुनील तहालियानी आदी उपस्थित होते. 

देशमुख म्हणाले, की गोदामाच्या क्षमतेचा आढावा घ्यावा. मार्केटिंग फेडरेशन, साखर कारखाने, एपीएमसीची गोदामे उपलब्ध असतील, तर अशा ठिकाणी साठवणुकीची प्रक्रिया सुरू करावी, तसेच खासगी गोदाम घेण्याची आवश्यकता असेल, तर तीसुद्धा घ्यावीत. केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार राज्यात १५ मार्च २०१७ पर्यंत तूर खरेदी केंद्र सुरू ठेवण्याची परवानगी आहे. या वर्षी राज्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी १५ मार्चनंतर ही तूर खरेदी केंद्र सुरू ठेवण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठवावा, अशा सूचनाही मंत्री देशमुख यांनी या वेळी प्रशासनाला दिल्या. 

राज्यात तांत्रिक अडचणीमुळे जी तूर खरेदी केंद्र बंद झाली आहेत आणि ज्या ठिकाणी तुरीची आवक आहे, अशा ठिकाणी खरेदी केंद्रे तत्काळ सुरू करावीत. ज्या ठिकाणी बारदाने उपलब्ध नाही, तिथेही तत्काळ उपलब्धतेवर भर द्यावा. 
-सुभाष देशमुख, सहकार आणि पणनमंत्री 

Web Title: Tur Dal sale central government