हळदीपासून अौषधी कुरकुमीनची निर्मिती

TURMERIC
TURMERIC

यंदा सात टनांची परदेशी निर्यात 
शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित मुरके बंधूंचा प्रक्रिया उद्योग 
लातूर जिल्ह्याचे मूळ रहिवाशी असलेल्या उच्चशिक्षित मुरके बंधूंनी हळदीपासून कुरकुमीन पावडर तयार करण्याचा उद्योग थाटला आहे. संशोधक वृत्ती, धाडस, भविष्यातील शेती व बाजारपेठ अोळखण्याचा दृष्टिकोन व ज्ञान आदी गुणांच्या जोरावर व्यवसायाला गती देताना कुरकुमीनला देशातील व परदेशातील मार्केटही मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. 
रमेश चिल्ले 

हळदीचे औषधी महत्त्व प्राचीन काळापासून सर्वांना ज्ञात आहे. विविध राज्यांत हळदीची लागवड होते. महाराष्ट्रातील विशिष्ट भागही हळदीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. मात्र बाजार समितीत विक्री किंवा हळदीपासून विविध पदार्थ निर्मिती एवढ्यावरच आपल्याकडील हळद शेती मर्यादीत आहे. मात्र याही पुढे जाऊन लातूर जिल्ह्यातील डॉ. सचिन व ब्रह्मानंद या मुरके बांधवांनी हळदीतील कुरकुमीन वेगळे करून त्याला मार्केट देण्याचा प्रयत्न करून आपल्या उद्योजकवृत्तीचे दर्शन घडवले आहे. 

मुरके बंधूंचा परिचय 
अहमदपूर तालुक्यातील हाडोळती हे मुरके यांचे मूळ गाव. येथे कुटुंबाची सुमारे वीस एकर कोरडवाहू शेती अाहे. ओमप्रकाश मुरके यांना तीन मुले. त्यातील डॉ. सचिन बीएएमएस असून त्यांचा मुंबई-वसई येथे वैद्यकीय व्यवसाय आहे. त्यांचे दुसरे बंधू ब्रह्मानंद हे रसायनशास्रातील ‘एम.एससी’ पदवीधारक अाहेत. त्यांनी विविध कंपन्यांत दहा वर्षे संशोधन आणि विकास विभाग व प्रक्रियेचा अनुभव घेतला आहे. दोघा भावांकडे मिळून आयुर्वेदिक, रसायनशास्त्र यातील तांत्रिक ज्ञान व अनुभवाची भक्कम बैठक आहे. 

उद्योगाचे होमवर्क 
हळदीत असलेल्या कुरकुमीन घटकाला देशात-परदेशात असलेली मागणी दोघा बंधूंनी अभ्यासली. देशातील काही कुरकुमीन प्रक्रिया उद्योगांना भेटी देण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी गेटच्या आत प्रवेशही मिळाला नाही. प्रकल्प खर्च, भांडवल, निर्यात, मिळणारा दर अशा सर्व बाबींचा काही वर्षे सूक्ष्म अभ्यास केला. डॉ. सचिन सांगतात, की पूर्वी राज्यात कुरकुमीन प्रक्रियेची काही युनिटे सुरू झाली. पण कालांतराने ती बंद झाली. त्यातील त्रुटी लक्षात घेतल्या. सर्व अभ्यासाअंती मुरके बंधूंनी प्रक्रिया उद्योग उभारण्याचे नक्की केले. लातूर एमआयडीसी क्षेत्रात तो उभारलादेखील. 

मुरके यांचा उद्योग दृष्टिक्षेपात 
- मागणीनुसार उत्पादन सुरू ठेवता येते. 
- हळदीचा कच्चा माल सांगली, सातारा, सेलम, इरोड (तमिळनाडू), आसाम, मेघालय आदी भागातून आणला जातो. येत्या काळात हिंगोली जिल्ह्यातील सुमारे ५०० शेतकऱ्यांसोबत कच्च्या मालासाठी करार करण्याचा विचार आहे. 
- शंभर किलो हळदीवर प्रक्रिया केल्यास दीड किलो कुरकुमीन मिळते. मुरके यांच्या उद्योगात दररोजची बॅच एक टन उत्पादनाची असते. 
- कुरकुमीन पावडर सुकवून, प्रतवारी करून २५ ते ५० किलोच्या ड्रममध्ये पॅकिंग करून ठेवली जाते. ती जास्तीत जास्त अठरा महिने साठविता येते. कच्च्या मालावर प्रक्रिया करून अंतिम उत्पादन तयार होण्यापर्यंत ३० ते ३५ दिवस लागतात. 
- जागा, मशिनरी व अन्य अशी आर्थिक गुंतवणूक किमान दोन कोटी रुपयांची. 
- हंगामात दोन शिप्टमध्ये काम चालते. या उद्योगामुळे सुमारे १० ते १५ जणांना स्थानिक रोजगार मिळाला आहे. गावाकडील तीन कुटुंबे युनिटवरच खोल्या बांधून रहातात. आज दुसरीकडे नोकरी केलेल्या ब्रह्मानंद यांनीच अन्य लोकांना रोजगार मिळवून दिला ही नक्कीच उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल. 

भांडवल उभारणीचे प्रयत्न 
सन २०१४ मध्ये पुण्याच्या सहकारी बॅंकेने अर्थसाह्य देण्याचे मान्य केले. मात्र नवीन दीड- दोन कोटी रुपयांच्या मशिनरी घेणे परवडणारे नव्हते. म्हणून गुजरात व मुंबईहून जुन्या वापरलेल्या मशिनरी अर्ध्या किंमतीवर घेण्याचे ठरले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली युनिटची उभारणी केली. बॅंकेने मशिनरी पुरते कर्ज दिले. बाकी पैशांची व्यवस्था करणे अवघड होऊ लागल्याने आत्येभाऊ संजय मलशेट्टी यांनी मोठी मदत केली. आज तेही युनिटचे भागधारक आहेत. शिवाय व्यवस्थापक व ‘पर्चेसिंग’ विभागाची सारी जबाबदारी सांभाळतात. 

प्रयत्नांती मार्केट मिळवले 
कुरकुमीनला मार्केट मिळवणे हेच सर्वात महत्त्वाचे दिव्य काम अाहे. स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर असल्याने सचिन यांना या क्षेत्रातील विविध कंपन्या माहीत होत्या. परदेशातील मार्केटचाही त्यांनी अभ्यास केला आहे. उद्योग सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने उत्पादनवाढ व विक्री त्यांनी साध्य केली. 
मागील दोन वर्षांत त्यांनी दोन अौषधी कंपन्यांना प्रत्येकी एक टन तर एका कंपनीला सहा टन कुरकुमीन पावडरची विक्री केली. 

कंपनीतर्फे परदेशात विक्री 
यंदा २५० टन हळदीवर प्रक्रिया करून ६ ते ७ टन कुरकुमीनचे उत्पादन केले. एका कंपनीला हे उत्पादन दिले. संंबंधित कंपनीने हे उत्पादन परदेशात निर्यात केल्याचे डॉ. सचिन म्हणाले. पुढील वर्षी ५०० टन मालावर प्रक्रिया करून १० ते १२ टन उत्पादनाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. कुरकुमीनला साधारण पाच हजार, साडेपाच हजार ते सहा हजार रुपयांपर्यंत दर आहे. दरात कायम चढउतार होत राहतात. चीन, म्यानमार आदी देश आपले स्पर्धक असून ते आपल्यापेक्षा कमी दरांत अन्य देशांना कुरकुमीन विकतात, असे डॉ. सचिन म्हणाले. 

कुरकुमीनचे महत्त्व 
डॉ. सचिन म्हणाले, की हळदीत सुमारे ३ ते साडेतीन टक्के कुरकुमीन आढळते. सेलम, राजापुरी, अलेप्पी, रोमा, प्रतिभा आदी जाती प्रक्रियेसाठी महत्त्वाच्या आहेत. कुरकुमीन हा कर्करोगाला प्रतिबंध करणारा अौषधी घटक असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. विविध विकारांवर त्याचा उपयोग आहेच. शिवाय सौंदर्यप्रसाधने व खाण्याचा रंग या कारणासाठीही त्याचे अौद्योगीक महत्त्व आहे. दक्षिणेतील राज्यात मोठ्या क्षमतेची कुरकुमीन निर्मितीची युनिटस आहेत. लातूरसारख्या भागात असा शेतीपूरक उद्योग मुरके बंधूंनी उभारल्याने या भागातील हळद उत्पादकांचा आत्मविश्वास निश्चित वाढणार आहे. 

कुरकुमीन व्यवसायात जोखीम मोठी आहे. मार्केटिंग आव्हानाचे आहे. खरेदीदार कंपन्यांची शाश्वती नाही. त्यामुळे केवळ याच उत्पादनावर अवलंबून न राहाता झेंडू, अश्वगंधा, सोनामुखी आदी विविध अौषधी वनस्पतींपासून अौषधे तयार करून त्यांचीही विक्री करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 
भांडवल गुंतवणूक, खर्च, संशोधन या गोष्टींशिवाय यश हाती लागत नाही. 
डॉ. सचिन मुरके 

संपर्क : डॉ. सचिन मुरके - ९२२०९६३४३६ 
ब्रह्मानंद मुरके - ९५६१७ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com