महागोंडला पाण्यासाठी एकजूट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

उत्तूर (जि. कोल्हापूर) - महागोंड (ता. आजरा) येथील ग्रामस्थांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी श्रमदान करून आंबेओहळ पात्रातील असलेल्या सिंमेट बंधाऱ्यातील गाळ काढला. या उपक्रमामध्ये गावातील १५० ग्रामस्थ सहभागी झाले होते.

उत्तूर (जि. कोल्हापूर) - महागोंड (ता. आजरा) येथील ग्रामस्थांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी श्रमदान करून आंबेओहळ पात्रातील असलेल्या सिंमेट बंधाऱ्यातील गाळ काढला. या उपक्रमामध्ये गावातील १५० ग्रामस्थ सहभागी झाले होते.

आजरा तालुक्‍यात सुमारे १६०० लोकसंख्या असलेल्या महागोंड गावाला लोकवर्गणीतून काढलेल्या विंधण विहिरीच्या पाण्याचा आधार आहे. यापूर्वी चिकोत्रा पात्रातील ३६ लाखांची महाजल योजना तसेच पाझर तलावाचे काम अर्धवट आहे. कित्येक वर्षापासून टंचाईग्रस्त असलेल्या या गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई व पुण्यात राहणाऱ्या ग्रामस्थांनी पाण्याचा प्रश्न श्रमदान आणि लोकसहभागातून निकालात काढण्याचा निश्‍चय केला. मुंबई आणि पुण्यात राहणाऱ्या ग्रामस्थांना एकत्र करून बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत सोळा उपाययोजना सुचविण्यात आल्या. या नंतर गावात सरपंच सुलाताई गुरव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत उपाययोजनांवर चर्चा झाली.

    तातडीची उपाययोजना म्हणून आंबेओहळ पात्रातील असलेल्या सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढणे, नळपाणी पुरवठा योजनेतील जॅकवेल दुरुस्ती, अर्धवट असलेल्या पाझर तलावाचे काम पूर्ण करणे याबाबत सविस्तर चर्चा झाली. सभेमध्ये मजले गावचे सरपंच सिकंदर कोठावळे तसेच शांतीनाथ पाटील, प्रा. गोमटेश पाटील, बाबासाहेब पाटील व बांधकाम खात्यातील निवृत अधिकारी श्री. तोंदले, श्री. घाटगे आणि पाठबंधारे खात्याचे निवृत्त अधिकारी आनंदराव सुतार, कृषी सहायक सतीश कुंभार यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यानंतर ग्रामस्थांनी श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यातील आंबेओहळ पात्रातील सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढला. श्रमदानासाठी पहिल्याच दिवशी सुमारे १५० ग्रामस्थांची उपस्थिती   होती.

Web Title: unity for water in mahagond