हळदीचा वसमत तालुका

माणिक रासवे
बुधवार, 3 मे 2017

हिंगोली जिल्ह्यातील वसमत ही राज्यातील हळदीची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. देशभरातील विविध उद्योगांना येथूनच हळद पुरवठा होतो. आशियाई देशांनाही येथून निर्यात केली जाते. 

वसमत तालुका पूर्वी परभणी जिल्ह्यात होता. त्या वेळी तालुक्यामध्ये अर्धापुरी तसेच स्थानिक जातीच्या केळीचे मोठे क्षेत्र होते. त्यामुळे केळी उत्पादनासाठी राज्यात जळगावनंतर वसमत तालुका प्रसिद्ध होता. मात्र, गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तुलनेने जास्त पाणी लागणाऱ्या केळी पिकाकडून शेतकरी हळद लागवडीकडे वळले. आता वसमत तालुक्याचा हिंगोली जिल्ह्यात समावेश झाला आहे. 

 • हिंगोली जिल्ह्यातील सर्व म्हणजे पाचही तालुक्यांत हळद लागवड 
 • १-हिंगोली, २- कळमनुरी, ३- वसमत, ४-औंढा-नागनाथ, ५- सेनगाव 
 • जिल्ह्यात होणाऱ्या एकूण हळद लागवडीपैकी- ४५ टक्के क्षेत्र एकट्या वसमत तालुक्यात 
 • कमी पाण्यात तुलनेने किफायतशीर उत्पादन देणारे पीक, तसेच नजीकची बाजारपेठही उपलब्ध त्यामुळे हळद लागवडीखालील क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. 

वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती 

 • सन १९५६ मध्ये स्थापना 
 • सोयाबीन, हरभरा, कापूस, तूर, हळद या प्रमुख पिकांची आवक 
 • एकूण अडत व्यापारी-१०२ 
 • हळदीचे खरेदीदार- १० 
 • सर्व अडतींवर अन्य शेतमालासह हळद खरेदी केली जाते. 
 • बाजार समितीअंतर्गत कुरुंदा येथे उपबाजारपेठ. तेथेही यंदाच्या वर्षापासून हळद खरेदी सुरू करण्यात आली आहे. 

हळद कोठून येते? 
वसमत तालुक्यासह अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, परभणी, लातूर या जिल्ह्यांतील तसेच तेलंगण राज्याचा काही भाग 

आवक 

 • आवक- बाराही महिने सुरू 
 • बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरील ‘वे ब्रीज’वर वाहनांचे वजन करून आवकीची नोंद घेतली जाते. 
 • हळद काढणीनंतर मार्चपासून नवीन हळदीची आवक सुरू 
 • खरिपाच्या पेरणीपर्यंत म्हणजे जूनपर्यंत मोठ्या प्रमाणावर 
 • या काळात दररोज २५०० ते ३००० क्विंटल 

जाहीर लिलाव पद्धतीने सौदे.... 

 • वाढलेली आवक लक्षात घेऊन दोन स्वतंत्र हळद लिलाव कक्ष उभारले आहेत. मार्च ते जून या कालावधीत सोमवार ते शुक्रवार अशी दररोज लिलाव पद्धतीने खरेदी होते. आवक कमी झाल्यानंतर सोमवार, बुधवार, शुक्रवार असे एक दिवसाआड लिलाव होतात. 
 • सर्व व्यापारी-खरेदीदार एकत्र येतात. आवक कमी असल्यास शेतकऱ्यांनी आणलेल्या हळदीचे ढीग लावून लिलावाची बोली केली जाते. आवक जास्त असल्यास हळदीचे नमुने (सॅंपल) पाहून सौदे केले जातात. त्यानंतर शेतकऱ्यास सौदापट्टी देऊन त्यावर भाव नमूद केला जातो. इलेक्ट्राॅनिक काट्यावर वजन होते. 

पेमेंट 
पूर्वी रोखीने पेमेंट व्हायचे. नोटाबंदीच्या काळानंतर आता चेक किंवा ‘आरटीजीएस’ पद्धतीचा अवलंब केला जातो. कुरुंदा उपबाजारपेठेच्या ठिकाणी दर शनिवारी सौदे होतात. 

बाजार समितीचे उपक्रम 

 • शेतकऱ्यांना ‘एसएमएस’द्वारे बाजारभावांची माहिती कळविली जाते. 
 • शेतकरी निवास, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी सुविधा 
 • येत्या काळात पेट्रोल पंप, स्वस्त दरात जेवण, अॅग्रो मार्केटची उभारणी, हमाल निवास, बॅंकिंग सुविधा आदी उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. 
 • गेल्या वर्षी बाजार समितीतर्फे ४५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना बियाणांचे वाटप करण्यात आले. 
 • पाणीपुरवठ्यासाठी गरजू व्यक्तींना मोफत टॅंकर दिले जातात. 

शेतमाल तारण योजना.... 
बाजारभाव कोसळल्यास शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसते. तेजी येईपर्यंत शेतकऱ्यांना माल साठवून ठेवता यावा, तसेच गरजांच्या पूर्ततेसाठी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी शेतमाल तारण योजना सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आजवर ६६ लाख रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे. 

देशभरात पुरवठा..... 

 • वसमत तसेच परिसरात हळद पावडरची निर्मिती करणारे सुमारे पाच-सहा उद्योग 
 • कोलकता, दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान 
 • मसाला उद्योग, आर्युवेदिक औषधे, सौंदर्यप्रधाने निर्मिती आदी उद्योग 
 • निर्यात- पाकिस्तान, बांगलादेश, मलेशिया 

हळदीची आवक (क्विंटल) (वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती) 

वर्षे हळद आवक 
२०१४-१५ २,७०,८९१ 
२०१५-१६ १,८८,८७६ 
२०१६-१७ १,६३,९८९ 
२०१७ -गुरुवारपर्यंत २७,००० 

‘ई-नाम’मध्ये बाजार समितीची निवड झाली असून, त्यासाठी ३० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. ‘वन कमोडिटी मार्केट’ संकल्पनेंतर्गत हळद खरेदी, प्रक्रिया, ब्रॅंडिंग करून विक्री करण्यासाठी माॅडेल बाजारपेठ विकसित केली जाणार आहे. त्यासाठी पणन मंडळाकडे १६ एकर जागेची मागणी केली आहे. 
- एस. एन. शिंदे, सचिव, कृऊबा, वसमत ९४२२८७२९७२ 

शेतकऱ्यांना जास्तीतजास्त दर मिळावा, यासाठी तसेच लवकर वजनमाप व्हावे यासाठी बाजार समिती नेहमीच प्रयत्नशील असते. लिलावाच्यावेळी मी स्वत: उपस्थित राहतो. गेल्या पाच वर्षांत ग्रामीण भागातील अनेक तरुणांनी अडत व्यवसाय सुरू केले आहेत. कुरुंदा येथील बाजारपेठेत आठवड्यातील दोन दिवस हळदीचे लिलाव सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. 
- चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे-पाटील, सभापती, कृऊबा, वसमत ९८२२७४१५५४ 

शेतकऱ्यांत हळद लागवडीच्या गादीवाफा पद्धतीचा प्रसार करण्यामध्ये तत्कालीन तालुका कृषी अधिकारी डी. बी. काळे यांचे कार्य महत्त्वाची ठरले आहे. त्यातून उत्पादनात वाढ झाली आहे. 
- जी. बी. पवार, तालुका कृषी अधिकारी, 

माझी चार एकर शेती असून, दरवर्षी हळद घेतो. हळदीचे व्यवहार चोख असल्यानेच 
वसमत मार्केटला प्राधान्य देतो. 

- मारुती जाधव, बोराळा, ता. वसमत. उत्तमराव देशमुख, कचरू वारे, बारड, जि. नांदेड. 

बाजार समितीत पूर्वी रोखीने व्यवहार होत. आता व्यापारी चेकने पैसे देतात. 
- वैजनाथ हेगडे, शेतकरी, रेवलगाव, ता. वसमत. 

पंचवीस वर्षांपासून हळदीच्या व्यापाऱ्यात आहे. या ठिकाणी येणारी ९० टक्के हळद सेलम जातीची, तर १० टक्के कडाप्पा जातीची असते. संपूर्ण देशभरातील मसाले उद्योगांना येथून हळद पाठवली जाते. 
- बन्सिलाल अक्करबोटे, ज्येष्ठ व्यापारी, वसमत. 

हळदीबरोबर शेतकरी कोचादेखील घेऊन येतात. त्यात कुरकुमीनचे प्रमाण अधिक असल्याने हळदीपेक्षा जास्त दर मिळतो. येथील बाजारपेठेत वर्षाला १५०० ते २००० क्विंटल कोचाची खरेदी होते. 
- श्याम चव्हाण, व्यापारी वसमत. 

एकूण खरेदीपैकी २५ टक्के हळद पाकिस्तान, बांगला देश, मलेशिया, आखाती देशांत पाठवली जाते. 
- श्याम मुरक्या, व्यापारी, वसमत

Web Title: Vasmat is famous for turmeric production