जळगावात भाजीपाला आवकेत घट

चंद्रकांत जाधव
मंगळवार, 25 जून 2019

 कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात वांगी वगळता भाजीपाल्याची आवक कमी होती. दरही स्थिर राहिले.

जळगाव  - कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात वांगी वगळता भाजीपाल्याची आवक कमी होती. दरही स्थिर राहिले. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल २००० ते ४५०० रुपये दर मिळाले. भेंडीलाही २२०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. 

गवारीची प्रतिदिन एक क्विंटल आवक झाली. कूस असलेल्या गवारीला चांगला उठाव होता. तिला ५५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. गिलक्‍यांची आवक स्थिर होती. आवक पाचोरा, जळगाव, एरंडोल भागांतून झाली. प्रतिदिन चार क्विंटल आवक होती. गिलक्‍यांना प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवक जामनेर, पाचोरा, जळगाव भागांतून झाली. १३ क्विंटल प्रतिदिन सरासरी आवक राहिली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल २००० ते ४५०० रुपये दर होता. भेंडीची आवक एरंडोल, धरणगाव, पाचोरा, जामनेर भागातून झाली. भेंडीला प्रतिक्विंटल २२०० ते ४००० रुपये दर मिळाला. भेंडीची प्रतिदिन सहा क्विंटल आवक झाली. 

लहान काटेरी वांग्यांची प्रतिदिन ११ क्विंटल आवक झाली. त्यांना सरासरी २१०० रुपये प्रतिक्विंटल कमाल दर राहिले. आवक स्थिर राहिली. जामनेर, पाचोरा, जळगाव व औरंगाबादमधील सिल्लोड, सोयगाव भागातून आवक झाली. कोथिंबीर, पालक यांची आवकही कमी झाली. कोथिंबिरीची प्रतिदिन तीन क्विंटल आवक, तर  कमाल ४००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळाले. पालकाला कमाल १५०० रुपये प्रतिक्विंटलचे दर होते. कलिंगडाची आवक स्थिर होती. त्यास प्रतिक्विंटल ७५० ते ११०० रुपये दर मिळाले. खरबुजाची आवक मात्र रोडावली. त्यास प्रतिक्विंटल २००० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. आवक प्रतिदिन दोन क्विंटल एवढी झाली. 

निर्यातीच्या केळीला भाव
निर्यातीच्या दर्जेदार केळीला रावेर, मुक्ताईनगर भागात प्रतिक्विंटल ११०० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. दर्जेदार केळीची आवक याच भागात अधिक आहे. दुय्यम दर्जाच्या केळीचे दर दबावात आहे. या केळीला प्रतिक्विंटल ७०० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. केळीची आवक मागील आठवड्यातही प्रतिदिन ३२५ ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) एवढी होती. कमी दर मिळत असल्याची तक्रार यावल, रावेर, मुक्ताईनगर भागांत कायम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vegetables Incoming decreased in jalgaon