मुंबईतील नोकरी सांभाळून विस्तारली लिंबाची बाग

Vittal-patil
Vittal-patil

मुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात गुढे पाचगणी (जि. सांगली) असा गावापर्यंतचा दीर्घ प्रवास करायचा. प्राधान्याने शेतात जायचं. घरच्या सदस्यांबरोबर कामाला जुंपायचं. आठवडाभरातील कामांचं नियोजन करायचं. रविवारी संध्याकाळी पुन्हा मुंबईला लिंबू घेऊन परतायचं. वाशी मार्केटमध्ये  विक्री करायची. विठ्ठल पाटील यांचा हा जीवनक्रम अखंड सुरू आहे. मुंबईतील नोकरीत व्यस्त असताना, तेथील जीवनशैलीशी जुळवून घेताना गावाकडची ओढ, शेतीशी नाळ त्यांनी कायम ठेवली आहे.

सांगली जिल्ह्यात गुढे पाचगणी (ता. शिराळा) हे गाव चांदोली धरणाजवळ निसर्गाच्या सान्निध्यात डोंगरमाथ्यावर वसलं आहे. इथले बहुतांश लोक उदरनिर्वाहासाठी मुंबईत स्थायिक झाले आहेत. गावातील विठ्ठल पाटील यांची साडेबारा एकर शेती आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी बीएसस्सी बीएडपर्यंत शिक्षण पूर्ण केले. सन २०१५ च्या दरम्यान नोकरीसाठी मुंबई गाठली. सन २०१७ मध्ये ते डॉ. भाभा अणू संशोधन केंद्रांतर्गत नूतन विद्या मंदिर, मानखुर्द येथे सहायक शिक्षक म्हणून नोकरीस लागले. 

आईनं जिद्दीनं घर सावरलं
विठ्ठल सांगतात, की आमची शेती म्हणजे डोंगराळ भागातील. पावसाच्या भरवशावरची. कोणत्या योजनेच्या पाण्याचा लाभ झाला नाही. त्यामुळे ही जमीन विकसित करण्यावर मर्यादा आलेल्या. पठारावरील थोड्या शेतीत वडील भात, ज्वारी, भुईमूग पिकवायचे. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. मी सातवीला असताना वडिलांचं निधन झालं. आम्ही बहीण- भाऊ खचून गेलो. पण आई न खचता जिद्दीने उभी राहिली. कामांना तिने जुंपून घेतलं. आम्ही डोंगरावरील गवत विकायचो. दोन पैसे हाती येऊ लागले. त्यातूनच आईन आम्हाला शिक्षित केलं. मुंबईत वर्षभर नोकरीसाठी फिरावं लागलं. पण हताश झालो नाही. दुसऱ्या बाजूला गावाकडची शेती विकसित करण्याची धडपड सुरू होती.  

कृषी विभागाने तारले 
दरम्यान, विठ्ठल यांचा कृषी सहायक गणेश क्षीरसागर यांचा संपर्क झाला. त्याद्वारे तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी भगवान माने यांची ओळख झाली. आंब्यासह विविध फळपिकांची लागवड करण्याचे त्यांनी सुचवले. पण रानटी जनावरांपासून शेतीचे संरक्षण करणे आव्हानाचे होते. दरम्यान, माती परीक्षण केले. जमीन हलकी असल्याने लिंबाची लागवड करण्याचा सल्ला मिळाला. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत वेंगुर्ला संशोधन केंद्रातून कोकण लेमन वाणाची रोपे आणली. सन २०१५ मध्ये रोजगार हमी फळबाग योजनेतून लागवड केली. कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून व्यवस्थापन सुरू केले. शेततळे योजनेचा लाभ घेतला. 

शेती झाली विकसित 
आज संपूर्ण पाटील कुटुंब म्हणजे विठ्ठल यांच्यासह भाऊ नथुराम, बहीण संगीता, आई कासाबाई बाग विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रसंगी घागरीने पाणी देऊन रोपे जगवली आहेत दरीडोंगरात वसलेल्या बागेत सिंचन व्यवस्था उभारणे आव्हानाचे काम होते. आज लिंबाच्या ९०० झाडांपैकी ४०० झाडांपासून उत्पादन सुरू आहे. 

कासाबाईंचा उत्साह 
कासाबाईंचं आज ६५ वर्षे वय आहे. घरातील काम आटोपून पठारापासून खाली झपाझपा पावलं टाकत त्या लिंबाच्या शेताकडं निघतात. डोंगरात नैसर्गिक झरा आहे. तेथून बागेला पाइपद्वारे पाणी देण्याचं अवघड काम त्या पार पाडतात. डोंगर चढणे आणि उतरणे ही दोन्ही कौशल्याची कामेही लीलया पार पाडतात. सुटीच्या काळात जोडीला मुलगा विठ्ठल असतो. पोटच्या पोरांप्रमाणे कासाबाईंनी बागेचीही निगराणी ठेवली आहे. यांत्रिकीकरणाचं शिक्षण घेतलं. त्यामुळे भात कापणी वा तत्सम कामे त्या व्यवस्थित हाताळतात. 

मार्केट 
विठ्ठल म्हणाले, की व्यापारी शोधणे सर्वांत गरजेचे होते. गणेश क्षीरसागर यांनी त्यासाठी मदत केली. शिवाय वाशी मार्केटमध्येही व्यापाऱ्यांशी चर्चा केली. बाजारपेठेचा अभ्यास केला. हळूहळू लिंबांची मागणी वाढू लागली. मग विक्रीबाबतचा आत्मविश्वास वाढत गेला.

उत्पादन व दर 
  २०१७ : दीड टन- ५५ रुपये प्रति किलो  
  २०१८ : तीन टन- ७० रुपये प्रति किलो 
  २०१९ : सध्या आठवड्याला ८० किलो लिंबांची विक्री. प्रति किलोस १०० रु. दर 

कोकण लेमन वाणाची वैशिष्ट्ये 
  बिन बियांचे वाण 
  साल जाड असल्याने टिकवणक्षमता चांगली 
  लोणच्यासाठी अधिक मागणी. सरबतासाठी तसेच साल वाळवून औषधासाठी वापर 
  बारमाही फळ देणारे पीक 
  अन्य लिंबांच्या तुलनेत अधिक दर

सुट्टीचं नियोजन
शनिवारी सकाळी अकरा वाजता शाळा सुटल्यानंतर विठ्ठल मुंबईहून गावी निघतात. मुक्कामात आईसोबत आठवड्याच्या शेतीकामांची चर्चा होते. तोडणीच्या काळात डोक्यावरून १५ किलोच्या गोण्या डोंगराळ भागातून वाहून नेणं कष्टाचं कामही ते आनंदानं करतात. पुढील आठवड्यातील नियोजन करून सुटी संपवून  मुंबईला परततात. अन्य काळात फोनद्वारे अडचणी सोडवतात. कृषी विभागाची मदत घेतात.

विठ्ठल यांनी कोकण लेमन लिंबू शेतीचा केलेला प्रयोग परिसरासाठी आदर्श आहे. अनेक शेतकरी बाग पाहण्यासाठी आले. त्यांनीही मार्गदर्शन करण्याची मागणी केली. आज भागात सुमारे २५ शेतकऱ्यांनी लिंबाची लागवड केली आहे. 
- गणेश क्षीरसागर, कृषी सहायक

- विठ्ठल पाटील- ८१०८९४४५३६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com