तेजस्विनीच्या साथीने बचतीतून स्वयंनिर्भरतेकडे

ट्रॅक्टरच्या माध्यमातून बचत गटाला शाश्वत उत्पन्नाचे साधन मिळाले आहे.
ट्रॅक्टरच्या माध्यमातून बचत गटाला शाश्वत उत्पन्नाचे साधन मिळाले आहे.

तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या पुढाकारामुळे गंगापूर (जि. औरंगाबाद) तालुक्‍यातील २६ गावांमधील अनेक कुटुंबांना विकासाचा मार्ग सापडला आहे. बचत, पूरक व प्रक्रिया उद्योगांची जोड मिळालेल्या ३४४ महिला बचत गटांनी स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू केली आहे.

लोकांनी, लोकांसाठी चालविलेली संस्था म्हणून कार्य करणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत धर्मदाय आयुक्‍तांकडे तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राची २०१० नोंदणी करण्यात आली. या केंद्राच्या माध्यमातून गंगापूर तालुक्‍यातील २६ गावांमध्ये कामाला सुरवात झाली. या सर्व गावांमध्ये ३,८६१ महिलांचा सहभाग असलेल्या ३४४ महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली. गटांच्या महिलांमधून २६ प्रतिनिधी आणि त्यामधून ११ पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. या पदाधिकाऱ्यांच्या दरमहा बैठका होतात. या बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेतले जातात. पन्नास रुपयांपासून आजमितीला २०० रुपये प्रतिमहिना बचत करणाऱ्या या बचत गटांची बचत साडेतीन कोटी रुपयांपर्यंत पोचली आहे. सुमारे २९० बचत गटांना विविध उपक्रमांसाठी  बारा कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे, अशी माहिती साधन केंद्राच्या व्यवस्थापिका सुनीता सहाने यांनी दिली.

प्रक्रिया उद्योगांतून प्रगती 
तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्रांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ३४४ बचत गटांमधील ३,८६१ महिलांपैकी २,५८३ महिलांनी उद्योगाची दिशा पकडली आहे. यापैकी १,७६० महिलांची शेतीवर उपजीविका आहे, तर ८२३ महिला पूरक उद्योगामुळे स्वावलंबी बनल्या आहेत. एमजीएम कृषी विज्ञान केंद्रातर्फे बचत गटातील महिलांना मार्गदर्शन मिळते.

पुरक उद्योगास सुरवात
  तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राने गंगापूरमध्ये दीड वर्षापूर्वी अडीच लाखांची गुंतवणूक करून बियाणे, खते विक्रीसाठी नोंदणीकृत कृषी सेवा केंद्र सुरू केले. या केंद्राची उलाढाल ३५ लाखांपर्यंत पोचली आहे. कृषी सेवा केंद्रावरून शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीडनाशके योग्य दरात दिली जातात. दोन महिन्यात पैसे दिल्यास कोणतीही व्याजाची आकारणी केली जात नाही. दोन महिन्यांच्यापुढे मात्र दोन टक्‍के व्याजदर आकारला जातो. 
  बचत गटातील ३६ महिलांना ६७ शेळ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचे चांगले साधन तयार झाले आहे. 
  पाच गावांत शालेय साहित्य विक्रीची दुकाने पाच महिलांनी सुरू केली आहेत. याशिवाय शिवणकाम, कुक्‍कुटपालन, मत्स्यव्यवसाय, गोपालन, प्रक्रिया उद्योगातून कुटुंबाला मदत मिळाली आहे.

आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण  
रघुनाथनगर येथील वैभवलक्ष्मी बचत गटाची सुरवात २०१० मध्ये झाली. दर महा ५० रुपये बचत करणारा हा गट आता २०० रुपये बचत करतो. या गटातील महिलांनी स्वत:चे छोटे उद्योग सुरू केले. त्याचबरोबरीने काहींनी बचत गटाच्या आधारे शेतीला कोरडवाहूमधून बागायतीकडे नेले. गटातील प्रत्येक सदस्यांच्या खाती किमान ३० हजार रुपये जमा आहेत. त्यामुळे थोड्या बहूत पैशासाठी परावलंबी असलेल्या महिला आता बचत गटामुळे स्वावलंबी झाल्या आहेत.

वायसर बनविण्याचा उद्योग
रघुनाथनगरच्या वैभवलक्ष्मी बचत गटाने वर्षभरापूर्वी वायसरनिर्मिती उद्योग सुरू केला. गटातील सुनीता मासाळ, उज्‍ज्वला सुकासे, गिता सुकासे, ताराबाई गवारे या महिला उद्योगाची जबाबदारी सांभाळतात. गटाने वायसरनिर्मितीसाठी तीस हजारांची यंत्रणा खरेदी केली. परिसरातील उद्योजक गटाला कच्चा माल पुरवितात. यंत्राच्या साह्याने गटातील महिला वायसर तयार करतात. गटातील माधुरी बर्वे यांच्या लाॅँड्रीचा व्यवसायाने गती घेतली आहे. सविता सुकाशे शिवणकामातून कुटुंबाला आधार देताहेत. लता वाकडे यांनी बचत गटातून मिळालेल्या आर्थिक आधाराने साडेतीन एकर जमीन बागायती केली. ताराबाई गवारेंनी शेळीपालनास सुरवात केली आहे.

ट्रॅक्‍टर देतोय बचत गटाला आधार
रघुनाथनगर येथील डॉ.आंबेडकर महिला बचत गटाने दर महिना ५० रुपये बचतीस सुरवात केली. ती आता ११० रुपये प्रतिमहिन्यावर पोचली आहे. गटातील प्रत्येक महिलांच्या खात्यावर सुमारे ४२ हजार रुपये जमा आहेत. पाच वर्षांपूर्वी बचतीच्या भरवश्‍यावर गटाने अनुदानावर ट्रॅक्‍टर घेतला.  सुरवातीला थोडबहूत काम मिळत असल्याने ट्रॅक्टर थांबून राहायचा. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना दररोज पाचशे रुपयेप्रमाणे भाडेतत्त्वावर दिला जातो. त्यामुळे गटाला अर्थार्जनाचे शाश्वत माध्यम तयार झाले.

म्हैसपालनातून प्रगती 
रघुनाथनगर येथील सुंदरबाई भीमराव आमराव यांनी १५ वर्षांपूर्वी अडीच हजारांची एक वगार घेतली. ती मोठी झाल्यानंतर दहा हजारांत विकली. मिळालेल्या पैशातून पुन्हा चार वगारी खरेदी केल्या. त्यापासून आता त्यांनी बारा म्हशीपर्यंत गोठा वाढविला आहे. सध्या त्यांच्याकडे ९ म्हशी दुधात असून गंगापुरात दररोज ३५ लिटर दूध थेट ग्राहकांना विकले जाते. महिला गटात सहभागी झाल्याने बचतीची सवय लागली. या बचतीमुळे आर्थिक प्रगती झाली. दुग्धव्यवसायातून खर्च वजा जाता त्यांना अपेक्षित नफा मिळत आहे.

डाळमिल, गिरणी कुटुंबाचा आधार
रघुनाथनगरमधील शांतिगिरी महिला बचत गटातील सदस्यांनी दरमहा ५० रुपये बचत सुरू केली. ती आता ११० रुपयांवर पोचली आहे. याच गटातील नंदा शिवाजी ठोंबरे यांनी डाळमिल, गिरणी सुरू केली. सर्व प्रकारच्या डाळी त्यांच्या डाळमिलवर तयार होतात. जोडीला खारीक-खोबरे बारीक करण्याच्या उद्योगातून त्यांना वर्षाकाठी किमान १५ ते २० हजार मिळतात. शिवाय परंपरेने सुरू असलेल्या पिठाची गिरणीची जोड त्यांना आहे.

- सुनीता सहाने, ९४२३७१९५११

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com